गोवा : म्हार्दोळ पोलीस निरीक्षकांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा पोलीस महासंचालकांचा आदेश

बाणस्तारी येथील भीषण अपघाताचे प्रकरण

पणजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) – बाणस्तारी येथील भीषण अपघाताच्या प्रकरणी सहआरोपींना कह्यात घेण्यास अपयशी ठरल्याने पोलीस महासंचालकांनी म्हार्दोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या विरोधात प्राथमिक अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क हे प्राथमिक अन्वेषण करणार आहेत. या प्रकरणातील सहआरोपीला का कह्यात घेण्यात आले नाही ? याचे अन्वेषण याद्वारे करण्यात येणार आहे.

मद्यधुंद अवस्थेत वाहन हाकल्याने बाणस्तारी येथे झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार झाले होते आणि अन्य काही जण गंभीररित्या घायाळ झाले होते. प्रारंभी या प्रकरणाचे अन्वेषण म्हार्दोळ पोलिसांनी केल्यानंतर नागरिकांच्या मागणीमुळे हे प्रकरण पुढे अन्वेषणासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपुर्द करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी अपघात झाला त्या वेळी स्वत: वाहन चालवत असल्याची पोलिसांना खोटी माहिती देणारा चालक गणेश लमाणी आणि तशी माहिती देण्यास त्याला प्रवृत्त केलेले ‘आप’चे नेते अमित पालेकर यांना कह्यात घेण्यासाठी प्रयत्न चालवले.

हे प्रकरण पुढे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडे पोचले असता खंडपिठाने यावर पुढील शेरा मारला होता. ‘या घटनेत पुरावे नष्ट केले, चुकीची माहिती दिली, मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आदी सर्व प्रकार म्हार्दोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झाले, तरीही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.’ न्यायालयाच्या या टिपणीनंतर पोलिसांनी प्राथमिक अन्वेषणाचा आदेश दिला आहे.