गोवा : धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून तिघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

वेळ्ळी येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जन्माष्टमीच्या फलकांची नासधूस करून ग्रामस्थांशी गैरवर्तणूक केल्याचे प्रकरण

मडगाव, ७ सप्टेंबर (वार्ता.) – रंगाळी, वेळ्ळी येथे लावण्यात आलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या फलकांची नासधूस करणे आणि ग्रामस्थांशी गैरवर्तणूक करणे या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी रंगाळी, वेळ्ळी येथील ‘नव युवक संघ ट्रस्ट’चे अध्यक्ष प्रमोद जुवेकर यांनी काँग्रेसच्या समर्थकांनी मंडळाच्या सदस्यांशी गैरवर्तणूक केल्याचे आणि भगवान श्रीकृष्ण यांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. ‘या वेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते मद्यप्राशन करून आले होते’, असेही तक्रारीत नमूद केले आहे. (मद्याच्या धुंदीत असे कृत्य केल्याचे काँग्रेसवाले सांगतील; पण त्यांना मद्यधुंद अवस्थेत जन्माष्टमीचेच फलक फाडण्याचे भान कसे रहाते ? याचीही पोलिसांनी चौकशी करावी ! – संपादक) भाजपचे नेते सावियो रॉड्रिग्स यांनी या प्रकरणी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याने पोलिसांचे आभार मानले आहेत.

संपादकीय भूमिका

  • तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवण्याच्या केलेल्या विधानाला पाठिंबा देणार्‍या काँग्रेसवाल्यांनी जन्माष्टमीच्या फलकांची नासधूस केली यात नवल नाही !
  • सरकारने याची गंभीर नोंद घेऊन कारवाई करावी !