कारखाना माझ्‍या कह्यात मिळाला पाहिजे ! – शालिनीताई पाटील, संस्‍थापिका अध्‍यक्षा, जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना

कारखान्‍यातील अनधिकृत व्‍यवहाराला आव्‍हान देणारी याचिका मुंबई उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट !

मुंबई – जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्‍याची किंमत १०४ कोटी रुपये असतांना हा कारखाना गुरु कमोडिटीला कवडीमोल भावात विकण्‍यात आला असून यात अनधिकृत आर्थिक व्‍यवहार झाला आहे. या व्‍यवहाराला आव्‍हान देणारी याचिका ६ सप्‍टेंबर या दिवशी उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट केली आहे. याची सुनावणी खंडपिठासमोर होणार आहे. मी कारखान्‍याची संस्‍थापक अध्‍यक्षा असून हा कारखाना माझ्‍या कह्यात मिळाला पाहिजे. कारखान्‍यातील अनधिकृत व्‍यवहाराला आळा घालण्‍यासाठी मी हे पाऊल उचलले आहे, अशी माहिती कारखान्‍याच्‍या संस्‍थापिका अध्‍यक्षा श्रीमती शालिनीताई पाटील यांनी येथे दिली.

गुरु कमोडिटी हे आस्‍थापन राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांची आहे. गुरु कमोडिटीने वर्ष २०१० मध्‍ये हा साखर कारखाना ६२ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतला. त्‍यामुळे तक्रार आल्‍यानंतर ‘ईडी’ने याचे अन्‍वेषण केले होते, तेव्‍हा अनधिकृत आर्थिक व्‍यवहार झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले होते. अजित पवार यांचे नावही तक्रारीत होते; मात्र वर्ष २०२१ मध्‍ये त्‍यांचे नाव यातून वगळण्‍यात आले. ही गोष्‍ट त्‍यात नमूद केली आहे. अजित पवार हे महाराष्‍ट्र सहकारी बँकेचे संचालक होते, तेव्‍हा काही लाख रुपयांचे वार्षिक उत्‍पन्‍न असलेल्‍या गुरु कमोडिटीज आस्‍थापनाला अब्‍जावधी रुपये किमतीचा जरंडेश्‍वर साखर कारखाना अनधिकृतपणे विकण्‍यात आला. ‘ज्‍या आस्‍थापनाची ऐपत ४ आण्‍याची आहे, ते आस्‍थापन १०० रुपये किमतीचा कारखाना कसा विकत घेऊ शकते ?’ असा प्रश्‍न शालिनीताई पाटील यांनी याचिकेत केला आहे.