मुंबई – नवीन शिक्षण धोरणांनुसार मराठी भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतला. त्यामुळे सर्व विद्यापिठांतील विज्ञान आणि वाणिज्य शाखांची पुस्तके विद्यार्थ्यांना मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी विद्यापिठांना सप्टेंबरपर्यंतची समयमर्यादा दिली आहे.
१. मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि विद्यापीठ येथे इंग्रजी अभ्यासक्रम आत्मसात् करण्यास अडचण येते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन शासनाने मातृभाषेतून शिक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये अभ्यासक्रम समजण्यास साहाय्य होईल.
२. शिक्षण विभागाच्या या सूचनेमुळे विद्यापिठांना पुढील दोन आठवड्यांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील १० पुस्तके भाषांतरीत करावी लागणार आहेत.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात मातृभाषेतून उपलब्ध होणार पुस्तके !
मुंबई आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) कडून विद्यापिठांना मराठीत भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मुंबई आयआयटी समवेत सामंजस्य करारही केले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने विद्यापिठांना भाषांतर करण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र अर्धे शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आले, तरीही विद्यार्थ्यांना भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे ही पुस्तके लवकरात लवकर विद्यापिठांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत.
शिक्षण विभागाकडून परिपत्रपक !
उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे. त्या माध्यमातून त्यांनी विद्यापिठांना निर्देश दिले आहेत.