सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – सकल हिंदु समाज

श्री गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये वाजवली आणि वाहतूक कोंडी केली, ही कारण देत पोलिसांकडून गुन्हे नोंद !

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – येथील ‘वाय.पी. पोवार नगर मित्र मंडळा’च्या श्री गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये वाजवली, तसेच वाहतूक कोंडी केली, असे कारण देत जुना राजवाडा पोलिसांनी कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. तथापि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही मशिदींवरील भोंगे हटवण्याचे, मजारींचे अवैध बांधकाम पाडण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवत नाही; मात्र केवळ हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुकीत कायद्याचे कारण पुढे करून कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, अशी भावना सकल हिंदु समाजाची निर्माण झाली आहे. तरी यापुढील काळात हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुका काढण्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध केला जाऊ नये, तसेच गणेशोत्सव मंडळावर नोंदवलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले.  याविषयीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरस्कर, सेवाव्रत प्रतिष्ठानचे श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, युवासेनेचे श्री. भाऊ चौगुले, श्री. सुशील भांदिगरे आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. आबा जाधव उपस्थित होते.