सरकारने आरक्षणाचा अध्‍यादेश आणावा,अन्‍यथा आजपासून पाणी सोडणार ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम !

मनोज जरांगे पाटील

जालना – राज्‍यशासनाने कुणबी आरक्षणासाठी समिती नियुक्‍त केलेली असतांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील मात्र उपोषणावर ठाम आहेत. ‘सरकारच्‍या प्रतिनिधींनी भेटण्‍यास येतांना मराठा आरक्षणाचा अध्‍यादेश घेऊन यावे. सरकारचे येणारे शिष्‍टमंडळ मराठ्यांच्‍या विजयाचा कागद घेऊन येईल याविषयी मला शंका नाही. त्‍यांनी हा निर्णय घेतलाच असेल; पण आरक्षणाचा अध्‍यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. उद्यापासून पाणी सुटले म्‍हणून समजा’, अशा शब्‍दांत मनोज जरांगे पाटील यांनी ४ सप्‍टेंबर या दिवशी राज्‍य सरकारला चेतावणी दिली आहे.

मनोज जरांगे म्‍हणाले की, विनाकारण केवळ बैठकांचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुर्‍हाळ हे आता आरक्षणासाठी लढणार्‍या पिढीला अपेक्षित नाही. सरकारने काही सकारात्‍मक निर्णय घेतले असतील, तर त्‍यांचे लोक येऊन सांगतील. आमची एकही मागणी आतापर्यंत कार्यवाही स्‍तरावर गेलेली नाही, कारण त्‍या सर्व प्रक्रियेत मीही आहे. आरक्षणाविषयी अद्याप निर्णय झालेला नसावा असे एकूण लक्षात येत आहे. मराठा बांधवांना मारणार्‍यांना निलंबित करा. केवळ सक्‍तीच्‍या रजेवर पाठवू नका. आमच्‍यावरील गुन्‍हे मागे घ्‍या, अशी मागणीही त्‍यांनी केली.