हिंदुस्थानच्या दृष्टीने विचार करता २३ ऑगस्ट २०२३ हा दिवस ‘ऐतिहासिक दिवस’ ठरला. या दिवशी हिंदुस्थानचे ‘चंद्रयान ३’ हे ‘विक्रम लँडर (अवतरक)’ चंद्राच्या भूपृष्ठावर अवतरले. आजपर्यंत जगातील कोणत्याही देशाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या क्षेत्रात पदार्पण करता आले नाही. हिंदुस्थानने मात्र हा मान संपादन केला आहे. याचा देशातील सर्व नागरिकांना अभिमान आहे. हा सुवर्णक्षण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात उगवला, हीच आपल्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे.
ज्या दिवशी हे चंद्रयान चंद्रावर अवतीर्ण झाले, त्या वेळी देशाचे पंतप्रधान विदेशात होते. त्यामुळे त्यांना आपल्या देशातील शास्त्रज्ञांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करता आले नाही. म्हणून विदेश दौर्याहून हिंदुस्थानच्या भूमीवर उतरताच पंतप्रधानांनी सकाळी ६ वाजता शास्त्रज्ञांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांचे कौतुक केले, अभिनंदन केले. त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी २३ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून घोषित केला. तसेच ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या भूमीवर जेथे अवतीर्ण झाले, त्या ठिकाणाचे ‘शिवशक्ती’, असे
नामकरण केले. असे नामकरण करण्यामागचा आपला हेतू स्पष्ट करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शिवसंकल्पसूक्ता’तील दुसरी ऋचा संथ लयीत उच्चारली. ती अशी,
येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विदथेषु धीरा:।
यदपूर्वं यक्षमन्त: प्रजानान्तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु ॥
– यजुर्वेद, अध्याय ३४, कण्डिका २
भावार्थ : यज्ञाच्या कार्यात अत्यंत कुशल असलेले धैर्यवान आणि मननशील असलेले जे विद्वान, बुद्धीमान लोक आहेत ते मनाच्या प्रेरणेमुळे सर्व कार्ये उत्कटतेने करू शकतात. तसेच हे मन प्राणीमात्रांच्या अंतरंगात म्हणजे हृदयात वास करते. तसेच हे मन पूजनीय कार्यात अतुल, अद़्भुत असे काम करते; म्हणून ते शोभून दिसते. माझेही मन शुभ कल्याणकारक होवो, शुभ संकल्पना युक्त होऊन सुंदर आणि पवित्र विचारांनी व्यापून जावो, म्हणजेच शिवाच्या ठिकाणी एकाग्र होवो.
हे संपूर्ण ‘शिवसंकल्पसूक्त’ ६ ऋचांचे आहे. या संपूर्ण सूक्तात मनाचे वस्तूनिष्ठ वर्णन अत्यंत मोजक्या आणि सारगर्भ शब्दांनी केले आहे.
१. मनावर कल्याणकारी संस्कार करण्याचे महत्त्व !
माणसाचे मन अत्यंत चंचल आहे. माणूस हा जागेपणी विविध प्रकारचे व्यवहार करत असतो. तसेच त्याचा अनेक बर्या वाईट गोष्टींशी संबंध येतो. या सर्वांचा परिणाम त्याच्या मनावर होत असतो. अशा मनावर माणसाचे पूर्णपणे नियंत्रण असतेच असे नाही. तसेच माणूस झोपेत असतांनाही त्याचे मन इतरत्र भरकटत असते. असे मन सर्व इंद्रियांना प्रकाश देणारे आहे. म्हणून या मनावर कल्याणकारी विचारांचे संस्कार होणे नितांत आवश्यक आहे.
सूर्यापासून निघालेले प्रकाश किरण सर्वत्र विखुरलेले असतात. त्यामुळे त्या किरणांमध्ये असलेली तेजस्विता मोठ्या प्रमाणात उणावते. तेच किरण जेव्हा एकवटतात, तेव्हा त्यांची तेजस्विता अधिक प्रखर होते. माणसाचे मनही असे तेजस्वी आणि प्रखर असले पाहिजे; पण असे मन हे शुभ संकल्प अन् विचार यांनी भारलेले असले पाहिजे, तरच संपूर्ण सृष्टीचे कल्याण करण्याची बुद्धी माणसाला होईल. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. मनावर चांगले संस्कार झाले असतील, तर ते मन इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकेल आणि बुद्धीच्या आज्ञांचे पालन करू शकेल. यासाठी मन शुभ संकल्पांनी युक्त होणे आवश्यक आहे.
२. मन शुभ संकल्पकारक होण्यामागील आवश्यकता !
शिव ही देवता शुभ आणि कल्याणकारी आहे. म्हणून मन हे शिवाकडे आकर्षित झाले पाहिजे. शिवाकडे आकर्षित झालेल्या मनाला शिवाची शक्ती प्राप्त होते. यामुळे मानव आणि सृष्टी यांच्या कल्याणाचे कार्य मानवाकडून घडू शकते. पाशवी विचार शुभ आणि कल्याणकारी संकल्पांच्या आसपास फिरकत नाहीत. मन ज्ञानयुक्त, चिंतनशील आणि धैर्यशील असले पाहिजे, तरच ते प्राणीमात्रांच्या अंतरंगात असलेल्या अविनाशी अशा अमृतमय ज्योती रूपात निवास करू शकते. माणसाच्या हातून घडणारे कोणतेही काम मनाच्या संमती वाचून होत नाही. म्हणूनच मन शुभ संकल्पकारक होणे आवश्यक आहे. त्यासाठीच ते सुंदर आणि पवित्र विचारांनी व्यापण्यासाठी शिवाच्या ठिकाणी एकाग्र झाले पाहिजे.
३. मन शिवाशी जोडायला हवे !
माणसाचे मन हे अविनाशी आहे. या मनाने भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील सर्व गोष्टींना व्यापून टाकले आहे. म्हणून आपले मन शिवसंकल्पकारक झालेच पाहिजे. मन जर अपवित्र, अशुद्ध आणि अपात्र असेल, तर शरिराद्वारे विश्वाचे कार्य आपल्या हातून नेटकेपणाने केले जाणार नाही; म्हणून आपले मन शिवाशी जोडले गेले पाहिजे. रथाला चाक असते. त्या चाकाच्या केंद्राभोवती किंवा आसाभोवती आर्या स्थिर असतात. त्याप्रमाणे आपल्या मनात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदातील ऋचा स्थिर असल्या पाहिजेत, तरच मनात प्राणिमात्रांविषयी कळकळ, आपलेपणा, जिव्हाळा निर्माण होईल. असे भावनायुक्त मन शुभसंकल्पकारक होते. रथाच्या चाकाच्या आर्या केंद्राशी जर स्थिर न रहाता निखळल्या, तर संपूर्ण रथ योग्य दिशेने वाटचाल करू शकणार नाही आणि रथात बसलेला प्रवासी आपल्या गंतव्य स्थानापर्यंत जाऊन पोचणार नाही. त्याचप्रमाणे मन जर शुभ कल्याणकारक अशा संकल्पांशी व्यवस्थित जोडलेले राहिले, तर ते इकडे तिकडे भरकटत जाणार नाही. ते योग्य दिशेने वेगाने वाटचाल करून आपल्या ध्येयापर्यंत पोचेल. परिणामी संपूर्ण सृष्टीचे कल्याण करण्याचे महान कार्य आपल्या हातून पूर्णत्वाला जाईल. त्यासाठीच मन शिवाशी जोडले गेले पाहिजे.
शिवाशी जोडलेल्या मनाला शक्ती प्राप्त होते. कुशल सारथी ज्याप्रमाणे वेगवान घोड्यांना योग्य मार्गाने नेतो, तसेच मनही इतरत्र न भरकटता सन्मार्गाने बुद्धीच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करील. त्यासाठी माणसाने स्वतःचे मन शुभसंकल्पयुक्त होण्यासाठी शिवाच्या ठिकाणी एकाग्र करायचे आहे. हा शुभसंकल्प मानवी मनाला इतरत्र भरकटण्यापासून वाचवतो. ध्येय गाठणे आणि स्वतःच्या हातून सत्कर्म घडावे यांसाठी मनावर नियंत्रण ठेवण्यास बुद्धीला पूरक शक्ती देतो.
४. हिंदु संस्कृतीची महानता !
विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. चंचल आणि चपळ असलेल्या मनाला विविध प्रकारच्या वासना अन् आकर्षणे ही कुप्रवृत्तीकडे वळवतात. मग बघता बघता माणूस राक्षसी प्रवृत्तीचा कधी होऊन जातो, ते त्यालाच कळत नाही. ‘प्राप्त झालेल्या विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठीच करायचा आहे. त्या ज्ञानाचा उपयोग जर विनाशासाठी केला, तर सर्वत्र हाहाःकार उडेल. सृष्टीचा समतोल बिघडून जाईल. म्हणून आपल्या हातून कोणत्याही प्रकारचे दुष्कर्म घडू नये, यासाठी आपणच सावध राहिले पाहिजे आणि जाणीवपूर्वक स्वतःला शिवशक्तीशी जोडले पाहिजे’, असा महान संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऋचेद्वारे संपूर्ण जगाला दिला आहे.
हिंदु संस्कृतीची ही महानता ‘ऋग्वेदा’ची व्यापकता या निमित्ताने सांगण्याची संधी पंतप्रधान मोदी यांनी दवडली नाही. तसेच त्यांनी विज्ञानाची नाळ हिंदु धर्मशास्त्रानुसार कशी जोडली गेली आहे, तेही जाता जाता सहजतेने सांगितले. म्हणूनच आपण पंतप्रधानांच्या या भाषणाकडे गांभीर्याने पाहून ते जाणणे आवश्यक आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१.९.२०२३)