‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा !

श्री गणेशमूर्तीला पुष्पहार अर्पण करतांना डावीकडून जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी – ‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा’, ‘स्वच्छ, सुंदर आणि हरित रत्नागिरी’ हा संदेश घेवून जिल्हा प्रशासन अन् पोलीस प्रशासन यांनी ३ सप्टेंबर या दिवशी ‘सायकल फेरी’ काढून जनजागृती केली. पोलीस कवायत मैदानात हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सायकल फेरीचा शुभांरभ केला. या फेरीचा प्रारंभ श्री गणेशमूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

या वेळी परिविक्षाधिन आय.एस्. अधिकारी डॉ. जस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे, अन्य अधिकारी, रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे दर्शन जाधव, महेश सावंत आदी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले, ‘‘जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. हरित रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी हे ३ उद्देश घेऊन पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करावा, याविषयीची जनजागृती व्हावी, यासाठी ३० कि.मी.ची सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:चे आरोग्य, स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा संदेशही या सायकल फेरीच्या माध्यमातून देत आहोत.’’

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, ‘‘कोकणामध्ये गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जातो. सायकल चालवणे, हा पर्यावरणपूरक असा उपक्रम असल्याने सायकल फेरीच्या माध्यमातून जनतेला या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा संदेश देऊ या.’’

पोलीस कवायत मैदानातून या फेरीला प्रारंभ होऊन मारुति मंदिर-गोडावून स्टॉप-आर्.टी.ओ. ऑफीस-कुवारबाव-रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणेमार्गे परत कुवारबाव-मारुति मंदिर-जयस्तंभ-रामआळी-गाडीतळ-टिळक आळी-काँग्रेस भुवन-आठवडा बाजारमार्गे परत पोलीस कवायत मैदान येथे या फेरीची सांगता झाली. या सायकल फेरीमध्ये सहभाग घेणार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन !

प्रशासनाने या फेरीमध्ये ‘गणेशभक्तांनी कागदी लगद्याच्या मूर्ती वापराव्यात, तसेच विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करावा’, असे आवाहन केले.

(कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास घातक असल्याचे यापूर्वी संशोधनातून सिद्ध झाले आहे, तर राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ? यासह विसर्जनासाठीचे कृत्रिम तलाव न्यायालयाच्या सूचनेनुसार सिद्ध केले जात आहेत ना ? तसेच कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींची नंतर विटंबना होत नाही ना ? यांकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडे स्वतंत्र यंत्रणा आहे का ? – संपादक)

यासह पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती बनवणे, सजावटीसाठी प्लास्टिक आणि थर्माकोलऐवजी कागद किंवा कापडी पडदे यांचा वापर करणे, तसेच ‘डॉल्बी’ऐवजी  पारंपरिक वाद्यांचा वापर करणे, यांविषयीही या फेरीत संदेश देण्यात आला.

संपादकीय भूमिका

चिकणमाती किंवा शाडूची माती यांव्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे, हे जाणा !