धर्मसंस्‍थापक भगवान श्रीकृष्‍णाची वैशिष्‍ट्ये !

६ सप्‍टेंबर या दिवशी ‘श्रीकृष्‍ण जयंती’ आहे. त्‍या निमित्ताने…

धर्मसंस्‍थापक भगवान श्रीकृष्‍ण म्‍हटले की, समस्‍त कृष्‍णभक्‍तांना आठवतात, त्‍या त्‍याच्‍या अद़्‍भुत लीला, त्‍याचा खोडकरपणा, त्‍याने केलेले युद्ध आणि त्‍याने भक्‍तांना ‘गीते’च्‍या माध्‍यमातून दिलेला भगवद़्‍संदेश ! अशा या भगवान श्रीकृष्‍णाची अद़्‍भुत वैशिष्‍ट्ये ६ सप्‍टेंबर या दिवशी ‘श्रीकृष्‍ण जयंती’च्‍या निमित्ताने येथे देत आहोत. ४ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘निर्मोही आणि प्रत्‍येक क्षणी समाजाचा विचार करणारा, थोर राजनीतीज्ञ, कुशल कर्मवादी अन् धैर्यवान’, या वैशिष्‍ट्यांची माहिती वाचली. आज या लेखाचा उर्वरित भाग येथे देत आहोत.

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/716955.html


७. उत्तम मानसशास्‍त्रज्ञ

याआधी उल्लेख केल्‍याप्रमाणे श्रीकृष्‍ण हा एक थोर मानसशास्‍त्रज्ञ होता. त्‍याच्‍या एवढा उच्‍च दर्जाचा मानसशास्‍त्रज्ञ आजवर जगात झालाच नाही. ऐन युद्धामध्‍ये हात-पाय गाळून बसलेल्‍या अर्जुनाला ताळ्‍यावर आणण्‍यासाठी त्‍याने जी १८ अध्‍यायांची गीता सांगितली, त्‍या गीतेचे बहिरंग परीक्षण करतांना लक्षात येते की, हे सगळे मानसशास्‍त्र आहे. पहिल्‍याच अध्‍यायात अर्जुनाने मान्‍य केले आहे, ‘माझे हात-पाय थरथर कापत आहेत, धनुष्‍य गळून पडले आहे, अंगावरची लव ताठ उभी राहिली.’ अशा गलितगात्र हतबल झालेल्‍या आणि ‘युद्ध करून मी काय मिळवणार आहे ?’, असे म्‍हणणार्‍या अर्जुनाला खरी शिकवण हवी होती अन् नेमकी तीच शिकवण श्रीकृष्‍णाने त्‍याला दिलेली आढळते. गीतेएवढा उच्‍च मानसशास्‍त्रीय ग्रंथ दुसरा कोणताच झाला नाही, अगोदरही नाही आणि नंतरही नाही.

कृष्‍णाला केवळ मानवांचेच मानसशास्‍त्र समजत होते, असे नाही, तर त्‍याला गायी-वासरे, घोडा इत्‍यादी पशूंचे मानसशास्‍त्र; पण उत्तमरित्‍या अवगत होते. याची अनेक उदाहरणे कृष्‍णचरित्रकारांनी दिलेली आहेत. ऐन युद्धामध्‍ये रथाचे घोडे दमले, त्‍यांना तहान लागली; म्‍हणून त्‍याने युद्ध थांबवले आणि अर्जुनाला सांगितले, ‘‘या घोड्यांना पाणी पाजल्‍याखेरीज मी पुढचे युद्ध करणार नाही.’’ युद्धात घातपाताची भीती असतांनाही त्‍याने एका जागी रथ थांबवला. भर रणांगणात अर्जुनाने बाणांचा आडोसा सिद्ध केला. कृष्‍णाने त्‍या तहानलेल्‍या घोड्यांना पाणी पाजले, त्‍यांचा आहार त्‍यांना दिला आणि मगच पुन्‍हा युद्धाला आरंभ केला. ‘ज्‍या पशूंची आपण सेवा घेतो, त्‍यांच्‍याविषयी कृतज्ञता कशा प्रकारे व्‍यक्‍त करावी’, ही शिकवण समाजाला देण्‍याचे कर्मकौशल्‍य, हे मानसशास्‍त्र त्‍याला प्रत्‍यक्षात उतरवता येत होेते.

८. संघटन कौशल्‍य आणि नेतृत्‍वगुण

श्रीकृष्‍णाकडे एवढे अपार संघटन कौशल्‍य होते की, त्‍याच्‍या एवढे उत्तम संघटन आजवर कुणी बांधू शकलेला नाही. त्‍याच्‍या अगोदरही नाही आणि नंतरही नाही ! त्‍याने एवढे अभेद्य संघटन बांधले की, त्‍या काळातील सर्व राजे त्‍या संघटनेमुळे त्‍याच्‍यापुढे शरणागत झाले. विशेष म्‍हणजे एवढे मोठे संघटन त्‍याने शून्‍यातून निर्माण केले. अगदी लहानपणापासून म्‍हणजे लोणी चोरून खाण्‍याच्‍या लीलेपासून त्‍याचे संघटन कौशल्‍य लक्षात येते. लोणी चोरून खाण्‍यापासून ते इतर कुठलेही कार्य करण्‍यासाठी त्‍याच्‍या समवेत अनेक सवंगडी सिद्ध होते. त्‍याच्‍या खांद्याला खांदा लावून त्‍याच्‍या जीवाला जीव देण्‍यासाठी ते तत्‍पर होते.

श्रीकृष्‍ण म्‍हणजे नेतृत्‍वगुणाची परमसीमा. तो लोकनायक तर होताच; पण समाजाच्‍या हितासाठी तो आयुष्‍यभर काम करत राहिला. ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान पुरेपूर असूनही त्‍याने लोकहितार्थ आयुष्‍यभर वेगवेगळी कर्मे केली. यावरून त्‍याच्‍यातील लोकनायकत्‍वाची लक्षणे प्रगाढपणे लक्षात येतात.

९. अतिशय आनंदी आणि विनोदप्रिय

श्रीकृष्‍ण म्‍हणजे सदाप्रसन्‍न, अतिशय आनंदी आणि विनोदप्रिय ! त्‍याने कधीही दुर्मुखलेला चेहरा केल्‍याचे वर्णन आढळत नाही. सदानंदी असलेल्‍या कृष्‍णाला आयुष्‍यात कधीही दुःख झालेच नाही, असे म्‍हणता येणार नाही; पण काही वाटेल ते घडले, तरी त्‍याने ते दुःख व्‍यक्‍त केले नाही, हे मात्र खरे आहे. त्‍याच्‍या विनोदप्रचुरतेचे, त्‍याच्‍या सगळ्‍यांना हसवणार्‍या खोड्यांचे, त्‍याने गोपगोपींशी केलेले विनोद, त्‍यांच्‍या केलेल्‍या चेष्‍टा, रुक्‍मिणीच्‍या काढलेल्‍या खोड्या, भीमसेनेशी त्‍याने केलेले विनोद यांचे वर्णन महाभारतकारांनी रंगवलेले आहे आणि हे सगळे प्रसंग त्‍याच्‍या आनंदी अन् विनोदी स्‍वभावाची प्रचीती देणारे आहेत.

लोकांना आनंदी करण्‍यासाठी त्‍याने स्‍वतःमध्‍ये असलेल्‍या निकोप आणि निरोगी विनोदबुद्धीचा वापर अतिशय कौशल्‍याने केला. स्‍वतःच्‍या बहिणीला म्‍हणजेच सुभद्रेला पळवून नेण्‍याचा सल्ला देणार्‍या कृष्‍णाच्‍या लीला या खरोखर अतर्क्‍य (अ-तर्क म्‍हणजे तर्काच्‍या पलीकडीच्‍या) असल्‍यामुळे त्‍या कुणाला समजल्‍या नाहीत. अगदी त्‍याचा भाऊ असलेल्‍या बलरामालाही त्‍या समजल्‍या नाहीत.

१०. स्‍त्री-रक्षणकर्ता

‘अतिशय उत्तम स्‍त्रीरक्षणकर्ता’, म्‍हणून श्रीकृष्‍णाचे नाव आपल्‍याला निश्‍चितपणे घ्‍यायला पाहिजे. नरकासुराच्‍या कैदेतून ज्‍या १६ सहस्र स्‍त्रियांची सुटका त्‍याने केली, त्‍या स्‍त्रियांपुढे असा प्रश्‍न निर्माण झाला, ‘आम्‍हाला आता कोण स्‍वीकारणार ? आता आम्‍ही कुणाचे नाव लावायचे ?’ त्‍यांचे माता-पिता त्‍यांना घरात घेईना आणि त्‍या काळातील पद्धतीप्रमाणे त्‍यांचे विवाह होणेही शक्‍य नव्‍हते, तेव्‍हा कृष्‍णाने त्‍या स्‍त्रियांना सांगितले, ‘‘कशाला चिंता करता ? तुमचा पती म्‍हणून माझेच नाव सांगा. कोणता समाज तुम्‍हाला वाळीत टाकतो ते मी बघतो !’’ केवढे मोठे धारिष्‍ट्य आहे हे ! ही सोपी गोष्‍ट आहे का ? १६ सहस्र स्‍त्रियांना सन्‍मान देणारा, द्रौपदीचे लज्‍जारक्षण करणारा, असा हा श्रीकृष्‍ण ‘सर्वांत मोठा स्‍त्रीरक्षणकर्ता’ होता, हे इतरही अनेक प्रसंगावरून लक्षात येते.

११. विविध कलानिपुण आणि सेवक

श्रीकृष्‍णाचे व्‍यक्‍तीमत्त्व एवढे चौफेर होते, एवढे अफाट होते की, सर्व १४ विद्या, ६४ कलांचा तो भोक्‍ता आणि स्‍वामी होता. अतिशय रसिक होता. त्‍याच्‍या गायन आणि नृत्‍य कौशल्‍याविषयी आपण ऐकले आहे. एकीकडे मल्लविद्येत प्रवीण असणारा हा युद्धकुशल श्रीकृष्‍ण दुसरीकडे नृत्‍य, गायन, बासरी, वीणा वादन यांसारख्‍या कलांमध्‍येही अतिशय निपुण होता. श्रीकृष्‍ण अतिशय वाग्‍मी (श्रेष्‍ठ वक्‍ता) होता. विशेष म्‍हणजे एवढ्या कलांचा स्‍वामी असूनसुद्धा त्‍याच्‍याकडे अहंकाराचा लवलेशही नव्‍हता. त्‍यामुळेच तो उत्तम गोसेवक होऊ शकला. गायींची सेवा त्‍याने मनापासून केली. अश्‍वसंचालनाचे त्‍याचे कौशल्‍य अतिशय वादातीत होते; म्‍हणूनच तो उत्तम सारथ्‍य करू शकला, नाहीतर एखादा म्‍हणाला असता, ‘अरे मी एवढा सम्राट, द्वारकाधीश आहे. मी का म्‍हणून तुझा रथ हाकायचा ?’; पण याउलट तो म्‍हणाला, ‘ठीक आहे, मी युद्ध करणार नाही; पण सारथ्‍याच काम करीन.’ हे काम त्‍याने लीनतेने स्‍वीकारले आणि उत्तम रितीने पारही पाडले.

सगळे करून-सवरून, सगळ्‍यापासून नामानिराळा, अलिप्‍त असलेल्‍या श्रीकृष्‍णामध्‍ये ना कुळाचा अहंकार होता, ना रूपाचा गर्व होता आणि ना बुद्धीचा किंवा शौर्याचा अभिमान होता. श्रीकृष्‍ण चरित्राचा असा हा मनोवेधक पट आपल्‍या चक्षुंसमोर उभा राहिल्‍यानंतर आता वेळ आहे ती त्‍याच्‍या विविध रूपांना भजण्‍याची, आराधना करण्‍याची ! श्रीकृष्‍णाची अत्‍यंत उत्तम आणि निरलस आराधना केली, ती गोकुळातल्‍या गोपिकांनी ! त्‍याप्रमाणे आपण त्‍याची आराधना आणि मानसपूजा करून भगवद़्‍प्राप्‍ती करूया.

(समाप्‍त)

– प.पू. बापटगुरुजी

(साभार : मासिक ‘संतकृपा’, जून २०१५)