‘आदित्य’भेट !

भारताची पहिलीच सौर अंतराळ मोहीम : ‘सूर्ययान-आदित्य एल् १’

‘आदित्य एल्-१’ला घेऊन प्रक्षेपित झालेले ‘आदित्य’यान

आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने ।
आयु: प्रज्ञा बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते ।।

अर्थ : जे लोक प्रतिदिन सूर्याला नमस्कार करतात, त्यांच्या आयुष्य, बुद्धी, बळ, वीर्य आणि तेज यांमध्ये वृद्धी होते.

या सुंदर सुभाषिताने प्रतिदिन भारतियांच्या दिवसाला प्रारंभ होतो. त्या आदित्याची, भास्कराची भेट घेण्यासाठी ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चे (‘इस्रो’चे) ‘सूर्ययान-आदित्य एल् १’ हे २ सप्टेंबर २०२३ या दिवशी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी ‘पी.एस्.एल्.व्ही.-सी ५७’ या प्रक्षेपकाद्वारे सूर्याच्या दिशेने अवकाशात झेपावले. यामुळे अवकाश युगातील एका वेगळ्या अध्यायाचा प्रारंभ भारताने केला आहे. यू.आर्. राव उपग्रह केंद्रात सिद्ध केलेला हा उपग्रह २ आठवड्यांपूर्वी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘इस्रो’च्या प्रक्षेपक स्थानावर (‘स्पेस पोर्ट’वर) पोचवण्यात आला.

‘आदित्य एल्-१’ची सारी उपकरणे देशी बनावटीची !

‘आदित्य एल्-१’ची सर्व उपकरणे ही भारताच्या विविध प्रयोगशाळेत बनवलेली आहेत. ‘ती पूर्णतया देशी बनावटीची आहेत’, ही सार्थ अभिमानची गोष्ट आहे. ‘आदित्य एल्-१’ ही सूर्याचा अभ्यास करणारी ‘भारताची पहिलीच सौर अंतराळ मोहीम’ आहे. – प्रा. बाबासाहेब सुतार

१. ‘आदित्य एल् १’ : एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प !

आदित्य एल् १

‘चंद्रयान-३’ ही मोहीम अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाल्यानंतर ‘इस्रो’ने आता ही सौरमोहीम हाती घेतली आहे. ‘आदित्य एल् १’ असे या सौर मोहिमेला नाव देण्यात आले आहे. हे अवकाशयान, म्हणजे एक छोटी अवकाशस्थित वेधशाळाच आहे. ही वेधशाळा सूर्याला नेहमी सामोरी राहून आणि पृथ्वीपासून अनुमाने १५ लाख किलोमीटर अंतरावर अवकाशातील एका बिंदुपाशी स्थिर राहून सूर्याचा विविध पद्धतीने अभ्यास करील. यामध्ये सूर्याचे तापमान, त्याच्यापासून उत्सर्जित होणार्‍या अतीनील किरणांचा होणारा परिणाम, पृथ्वीवरील ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ‘इस्रो’ने ही मोहीम हाती घेतली आहे. ‘आदित्य एल् १’, म्हणजे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पच म्हणावा लागेल.

२. ‘सूर्याेपासक भारता’चा ‘आदित्य एल्-१’ हा उपक्रम पथदर्शी ठरणार !

प्रा. बाबासाहेब सुतार

अगदी वेदकालीन कालखंडापासून सूर्याचे प्रचंड आकर्षण भारतियांना आहे, इतके की, त्याला देवतेचे नामरूप बहाल केले आहे. जगभरातील प्राचीन संस्कृतीतही सूर्याला ‘देवता’ म्हटलेले आहे. म्हणूनच विज्ञान तंत्रज्ञानाच्या या प्रगत काळात या जीवनदात्याचा अधिक अभ्यास न झाला तरच नवल ! अर्थात् हे सोपे काम नाही. सूर्याची प्रचंड उष्णता, त्याचे चुंबकीय क्षेत्र, प्रचंड गुरुत्वाकर्षण या सार्‍याला तोंड देण्यासाठी उपकरणे आणि तंत्रज्ञानही तितकेच सक्षम अन् टिकाऊ हवे. याखेरीज पृथ्वीवरील वातावरणाच्या आच्छादनामुळेही अनेक प्रकारच्या मर्यादा येतात. साहजिकच अंतराळातून ग्रहगोलांचा अभ्यास अधिक सुलभतेने करता येईल, या विचाराने २० व्या शतकाच्या उत्तरार्धात अंतराळ दुर्बिणींना आणि वेधशाळांची कल्पना पुढे येऊन यशस्वीही झाली. ‘नासा’ची (अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था) ‘हबल दुर्बिण’ हे त्याचे लोकप्रिय उदाहरण म्हणता येईल. अलीकडे ‘जेम्स दुर्बिणी’चाही बोलबाला झाला आहे. याखेरीज आंतरतारकिय अभ्यासासाठीही ‘व्हायोजर याने’ रवाना झाली आहेतच.

सूर्याच्या अभ्यासातही ‘नासा’ आणि इतर काही अवकाश संस्था कार्यरत आहेत. ‘नासा’चे ‘सोहो यान’ आणि ‘पार्कर सोलार प्रोब’ या प्रसिद्ध अंतराळ वेधशाळा आहेत. सूर्य अभ्यास मोहिमांद्वारे सूर्याच्या वातावरणाच्या आणि इतर अभ्यासाने ज्याला ‘अंतराळ हवामान’ म्हणतात, त्याचा ग्रहमालेवरील परिणामांचा अभ्यास होतोच, त्याचप्रमाणे मानवनिर्मित कृत्रिम उपग्रहांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, तेही कळून येते.

गेल्या ६० वर्षांच्या कालावधीत अंतराळ संशोधन क्षेत्रात स्वतःचा महत्त्वाचा ठसा भारताने उमटवला आहे. पहिल्या ५ क्रमांकाच्या देशांच्या सूचीत आता भारताचाही समावेश आहे. ‘इस्रो’च्या दैदीप्यमान यशाने जग अचंबित झाले आहेच. चंद्रयान मोहिमा, मंगळ मोहिमेची यशस्विता आणि उपग्रह प्रक्षेपणातील खात्रीशीर कौशल्य प्राप्त केलेला ‘सूर्याेपासक भारत’ सूर्य आणि इतर ग्रहांच्या संशोधनात आता चंचूप्रवेश करत आहे. ‘आदित्य एल्-१’ हा उपक्रम आपल्यासाठी म्हणूनच पथदर्शी ठरणार आहे.

३. सूर्याविषयी शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे मुख्य विषय कोणते ?

सूर्य हा कोट्यवधी तार्‍यांपैकी एक सामान्य तारा समजला जातो. सूर्याविना पृथ्वीवासियांचे जीवन अगदी अशक्य आहे. त्यामुळे सूर्याचा आणखी अभ्यास करणे, हे जगभरातील देशांनी स्वतःचे संशोधन कर्तव्य समजले आहे. गुरु ग्रहाच्या १० पट, तर पृथ्वीच्या १०० पटीने मोठा असणारा सूर्य आपल्यापासून १५ कोटी किलोमीटर अंतरावरून प्रकाशित आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तूमानापैकी ९९ टक्क्यांपेक्षा अधिक वस्तूमान एकट्या सूर्यामध्ये आहे. संपूर्ण ग्रहमाला त्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली खाली असून आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्याने तिला आपल्याभोवती फिरवत ठेवले आहे.

सूर्याला स्वतःचे प्रखर असे आणि प्रतिवर्षी पालटणारे चुंबकीय क्षेत्र आहे. सूर्याच्या या पालटत्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर सौर डाग (सन स्पॉट ) आणि सौर ज्वाला (सोलार फ्लेयर) सिद्ध होतात, तसेच सौर वातामध्येही पालट घडतात. प्रत्येक ११ वर्षांनी हे चुंबकीय क्षेत्र पालटते आणि त्याची दिशा उलट होते. या घडामोडींमुळेच ‘रेडिओ लहरीं’चे दळणवळण आणि विद्युत्वहन यांमध्ये व्यत्यय निर्माण होतात अन् काही वेळा त्याचा गंभीर परिणामही होतो. पृथ्वीच्या वातावरणात चुंबकीय ध्रुवांजवळ दिसून येणारे ‘अरोरा’  हेही याच घडामोडींचा परिणाम आहेत. या सौर घडामोडींचा सूर्यमालेच्या उत्पत्ती आणि उत्क्रांती यांमध्ये फार मोठा वाटा आहे. या घडामोडी पृथ्वीच्या बाह्य वातावरणातही मोठा पालट घडवतात. सुदैवाने पृथ्वीही एक मोठा चुंबक असल्यामुळे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रापासून ती स्वतःचे संरक्षण करते

सूर्याचा आजवर पुष्कळ खोलवर अभ्यास जगभरात झाला असला, तरी बर्‍याच प्रश्नांची अजून उकल व्हायची आहे. सौर डागांचे चक्र, सौर वात आणि सौर ज्वाला यांची उत्पत्ती अन् त्यांचे भौतिकशास्त्र, प्रकाश किरीट, तसेच वर्णगोल यांच्यामधील चुंबकीय क्रिया-प्रतिक्रिया हे शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे मुख्य विषय आहेत.

– प्रा. बाबासाहेब धोंडीराम सुतार, साहाय्यक प्राध्यापक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. (१.९.२०२३)


‘आदित्य’साठी निवडलेल्या बिंदूची कारणमीमांसा

सूर्य आणि पृथ्वी यांना सरळ रेषेत जोडणार्‍या ‘एल् १’ बिंदूची आपण निवड का केली ?

पृथ्वीपासून अनुमाने १५ लाख किमी अंतरावर असलेल्या आणि सूर्य अन् पृथ्वी या दोन गोलांमुळे अवकाशात सिद्ध होणार्‍या ५ ‘लाग्रांज’ बिंदूंपैकी ‘लाग्रांज १’ (एल् १)’च्या भोवती ‘आदित्य यान’ सूर्यासन्मुख कक्षेमध्ये स्थापित केले जाईल. (लाग्रांज म्हणजे प्रत्येक ग्रहाजवळ असे काही बिंदु (पॉईंट) असतात, जेथे त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती, अवकाशयानाची कक्षीय गती आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे संतुलन साधले जाते. त्या ठिकाणी अवकाशयान स्थिर करून सूर्याच्या तेथून निरीक्षणे नोंदवणे अन् अभ्यास करणे शक्य असते.) ‘लाग्रांज’ बिंदूजवळ २ अवकाशीय गोलांमधील गुरुत्वाकर्षण जवळजवळ शून्य असते. त्यामुळे तिथे ठेवलेली वस्तू फार विचलित न होता स्थिर रहाते. साहजिकच ‘आदित्य’ या ठिकाणी स्थिर राहून निरीक्षणे घेऊ शकतो. याखेरीज या ठिकाणी ग्रहणाचा प्रश्नच येत नाही आणि इंधन बचतही होईल. दोन वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणामुळे ५ ‘लाग्रांज’ बिंदूंची निर्मिती होते. यातील सूर्य आणि पृथ्वी यांना सरळ रेषेत जोडणार्‍या ‘एल् १’ बिंदूची आपण निवड केली आहे.

‘आदित्य एल्-१’चा प्रवास

एकूण ४०० कोटी रुपये प्रकल्पशुल्क असणारे ‘आदित्य’यान श्रीहरिकोटा येथून ‘पी.एस्.एल्.व्ही.-सी ५७’ या प्रक्षेपकाद्वारे सूर्याच्या दिशेने पाठवले गेले. प्रारंभी पृथ्वीसापेक्ष दीर्घ वर्तुळाकार कक्षेत यानाचा प्रवास होईल आणि कालांतराने ‘लाग्रांज’ बिंदूकडे वाटचाल करील. अनुमाने ४ मासांच्या प्रवासानंतर ‘आदित्य’यान तेथे पोचेल आणि त्याच्या स्वतःच्या कामाला प्रारंभ करील.

– प्रा. बाबासाहेब सुतार

‘आदित्य एल्-१’ची वैज्ञानिक उद्दिष्टे !

  • सूर्याच्या पृष्ठभागावरील वातावरणातील ‘दीप्तीगोल (फोटोस्फियर)’, ‘वर्णगोल (क्रोमोस्फियर)’ यांच्या गतीशीलतेचा (‘डायनॅमिक्स’चा) अभ्यास.
  • दीप्तीगोल आणि वर्णगोल यांच्या उष्मागतिकीचा अभ्यास.
  • किरीटामधून बाहेर फेकले जाणारे वस्तूमान, सूर्याच्या अग्नीशिखांद्वारे होणार्‍या क्रिया, त्यांची वैशिष्ट्ये, अवकाशातील हवामानाची गतीशीलता, कण आणि विद्युत्चुंबकीय क्षेत्रांचा प्रसार इत्यादी घटना.
  • ‘सौर किरीटा’चा (‘सोलर कोरोना’चा) भौतिकशास्त्रदृष्ट्या अभ्यास.
  • सौर पृष्ठभागावर होणार्‍या विविध घटनांचे निरीक्षण करण्याचा आणि प्रत्यक्ष त्याच वेळी (‘रिअल टाइम’मध्ये) अवकाशातील त्याचा परिणाम पहाण्याचा, निरीक्षण करण्याचे काम ‘आदित्य एल्-१’ करील.
  • विद्युत्चुंबकीय आणि ‘पार्टिकल’ अन् ‘मॅग्नेटिक फिल्ड डिटेक्टर’ वापरून सूर्याचा ‘दीप्तीगोल (फोटोस्फियर)’, ‘वर्णगोल (क्रोमोस्फियर)’ आणि ‘सूर्याचा किरीट (कोरोना)’ या सर्वांत बाहेरील आवरणांचे निरीक्षण करण्यासाठी ‘आदित्य एल्-१’ यानामध्ये ७ उपकरणे (पेलोड) आहेत. हे ४ ‘पेलोड्स’ थेट सूर्याचे निरीक्षण करतात आणि उर्वरित ३ ‘पेलोड्स’ ‘लाग्रांज बिंदु एल् १’च्या आसपासचे मूलकण अन् विद्युत्चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करतील.

– प्रा. बाबासाहेब सुतार

‘इस्रो’च्या विज्ञान महर्षींना हार्दिक शुभेच्छा !

‘चंद्रयान-३’च्या मोहिमेसमवेतच ‘इस्रो’चे या मोहिमेचेही कार्य चालू होते. रात्रंदिवस राष्ट्रहित समोर ठेवून काम करणार्‍या ‘इस्रो’च्या सर्व शास्त्रज्ञ मंडळींचा आत्मविश्वास ‘चंद्रयान-३’च्या यशामुळे निश्चितच वाढला आहे. सूर्यशोधांची आधुनिक सूक्ते लिहू पहाणार्‍या या विज्ञान महर्षींना हार्दिक शुभेच्छा ! – प्रा. बाबासाहेब सुतार