गोव्यात हत्यांची शृंखला चालूच
पणजी, १ सप्टेंबर (वार्ता.) – डिचोली, फातोर्डा आणि बाणस्तारी येथे ३० ऑगस्ट या दिवशी घडलेल्या हत्यांच्या घटना ताज्या असतांनाच १ सप्टेंबर या दिवशी आणकी दोन हत्या झाल्या आहेत. पर्वरी येथील कामाक्षी (वय ३० वर्षे) या युवतीची तिचाच पूर्वीचा प्रियकर प्रकाश चुंचवड (वय २२ वर्षे) याने हत्या करून मृतदेह आंबोलीच्या घाटात फेकला. दुसर्या घटनेत रूमडामळ, दवर्ली येथील हाऊसिंग बोर्ड येथे सादिक बळ्ळारी (वय २५ वर्षे) याची दिवसाढवळ्या त्याच्या रहात्या घरी चॉपरने वार करून हत्या करण्यात आली. मायणा-कुडतरी पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहे.
पर्वरी येथील युवतीच्या हत्येची घटना
कामाक्षी आणि प्रकाश चुंचवड हे दोघेही पर्वरी येथे एक ‘गॅरेज’ चालवत होते अन् दोघांचेही एकमेकांशी प्रेमसंबंध होते; मात्र पुढे दोघांमध्ये मतभेद झाल्याने कामाक्षी हिने संबंध तोडण्याचे ठरवले. या प्रकारानंतर प्रकाश चुंचवड कामाक्षीची सतावणूक करू लागला. त्यानंतर कामाक्षी हिने या सतावणुकीविषयी म्हापसा पोलीस ठाण्यात प्रकाश चुंचवड याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. म्हापसा पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून दोघांचीही समजूत काढून प्रकाश चुंचवड याच्याकडून ‘यापुढे कामाक्षी हिला त्रास देणार नाही’, अशी लेखी हमी घेतली होती; मात्र या घटनेनंतर कामाक्षी घरातून गायब झाली. कामाक्षी हिच्या कुटुंबियांनी ती गायब झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी प्रकाश चुंचवड याचे अन्वेषण चालू केले. कामाक्षीने संबंध तोडल्याने गोव्यात तिची हत्या करून तिचा मृतदेह आंबोली येथील घाटात पुरल्याची स्वीकृती प्रकाश चुंचवड यांनी दिली. यानंतर म्हापसा पोलिसांचे पथक ‘फॉरेन्सिक’ गटासह आंबोली येथे गेले. या प्रकरणी गोवा पोलिसांनी चुंचवड याला कह्यात घेऊन सिंधुदुर्ग पोलिसांच्या साहाय्याने घटनास्थळाची पहाणी केली. चुंचवड याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कामाक्षीचा मृतदेह आंबोली घाटातून बाहेर काढला आहे.
रूमडामळ, दवर्ली येथील हत्येची घटना
रूमडामळ, दवर्ली येथे यापूर्वी एका हत्या प्रकरणात कह्यात घेऊन जामिनावर सुटका झालेल्या सादिक बळ्ळारी या युवकाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. सादिक याची २ मासांपूर्वी जामिनावर सुटका झाली होती आणि तो आपल्या घरी आई-वडिलांसमवेत रहात होता. सादिक बळ्ळारी याचे आई-वडील घरातून बाहेर पडल्यानंतर अज्ञात मारेकर्याने घरात शिरून चॉपरने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर मारेकरी पळून गेले. ते पळून जातांनाचे दृश्य या भागातील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये टिपले गेले आहे. २८ मे २०२० या दिवशी रूमडामळ-दवर्ली जवळील भगवती कॉलनी येथे २ गटांत झालेल्या भांडणात मुजाहित खान या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सादिक बळ्ळारी याच्यासह इस्माईल मुल्ला या दोघांना पोलिसांनी कह्यात घेतले होते. ‘या हत्येचा संबंध सादिक बळ्ळारी याच्या हत्येशी असावा आणि सूड उगवण्यासाठी सादिकची हत्या केली असावी’, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
गोवा राज्य हत्यांचे ठिकाण बनले ! – विरोधी पक्ष नेत्याचा आरोप
भाजप सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे गोवा राज्य हे हत्यांचे ठिकाण बनले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.