खेर्डी भाजप विभागाच्या वतीने प्रधानमंत्री ग्रामसडक कार्यालयात धडक

तातडीने रस्त्याची देखभाल करण्याची अभियंत्यांनी दिली हमी !

चिपळूण, १ सप्टेंबर (वार्ता.) – तालुक्यातील खेर्डी-टेरव-कामथे रस्त्याचे काम वर्ष २०१८ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत झाल्यानंतर या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे दायित्व घेण्यास संबंधित प्रशासन टाळाटाळ करत होते. त्यामुळे या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे दायित्व खेर्डी ग्रामपंचायतीला घ्यावे लागत होते. या प्रकरणी वारंवार अभियंत्यांशी पत्रव्यवहार करूनही स्थानिक वस्तीतून जाणार्‍या या रहदारीच्या रस्त्याची देखभाल घेण्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अभियंता चिपळूण यांच्याकडून कोणतीही कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे संरक्षक भिंती खचणे, रस्त्याची दुरवस्था, गटारांच्या नादुरुस्तीमुळे रस्त्यावर पाणी येऊन रस्ता उखडणे आणि त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन खेर्डीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

याविषयी भाजप खेर्डी विभागच्या वतीने खेर्डी उपसरपंच श्री. विनोद भुरण यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ ग्रामस्थ आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. काशीनाथ दाते, माजी सरपंच रवींद्र फाळके, सदस्य विनय (बाळा) दाते, श्रीधर भुरण सार्वजनिक बांधकाममंत्री मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आणि याकामी सहकार्य करून स्थानिक अधिकार्‍यांना सूचना देण्याची विनंती करण्यात आली.
त्यांच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी चिपळूण येथील कार्यालयात धडक देऊन संबंधितांना परिस्थितीचे गांभीर्य सांगीतले आणि रस्त्याची देखभाल दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी दिली. यानंतर या रस्त्याची देखभाल करण्यासाठी अभियंता माने यांनी तातडीने कार्यवाही करण्यास मान्यता दिली. त्यामुळे तब्बल ५ वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित प्रश्न सुटणार असून खेर्डीवासियांचा या रस्त्यावरील प्रवास सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संपादकीय भूमिका

खेर्डी-टेरव रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रलंबित प्रश्नांविषयी भाजप आणि खेर्डी ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश !