‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा !’,  या ‘पोस्ट’ने कणकवलीत तणाव

देशभक्त हिंदु म्हणून आम्हाला भूमिका घ्यायला भाग पाडू नका ! – आमदार नितेश राणे यांची चेतावणी

पाकिस्तानचा उदोउदो करून हिंदु देवतांची विटंबना करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याशी चर्चा करताना भाजपचे आमदार नितेश राणे आणि कार्यकर्ते

कणकवली – तालुक्यातील कलमठ गावातील अल्पसंख्य समाजातील एका युवतीने १४ ऑगस्ट २०२३ या दिवशी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त करत ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा’, अशा प्रकारे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानचा उदोउदो करणारी आणि हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या देवतांविषयी आक्षेपार्ह माहिती सामाजिक माध्यमातून प्रसारीत केली होती. याविषयी समजल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. याविषयी भाजपचे आमदार नितेश राणे आणि कार्यकर्ते  यांनी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याशी चर्चा करून ‘संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा देशभक्त हिंदु म्हणून आम्हाला भूमिका घ्यायला भाग पाडू नका’, अशी चेतावणी दिली. पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाने कुटुंबियांची चौकशी चालू केली आहे.

याविषयी आमदार नितेश राणे यांनी सांगितले की,

१. पाकिस्तानचा उदोउदो करून भारत देशाविरुद्ध षड्यंत्र रचणार्‍या व्यवस्थेची चौकशी करा. पाकिस्तानचे समर्थन करणारी, पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची भाषा करणार्‍या लोकांना कोण ताकद पुरवत आहे ?, याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा.

२. कणकवलीत काही परप्रांतीय अनोळखी फळवाले आणि फेरीवाले व्यापारी आहेत. त्यांना या ठिकाणी कोण आणत आहे ?, त्याची चौकशी करा. प्रत्येकाचे ओळखपत्र, आधारकार्ड पडताळा.

३. पाकिस्तानचा उदोउदो आणि स्वामी समर्थांच्या चित्रावर घाणेरडी टीका करणे, अशा प्रकारची वृत्ती कणकवलीत जन्माला आलेली आहे. अशा प्रकारची घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे.

४. पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करणे आणि हिंदूंच्या देवतांची टिंगल करणे आदी प्रकार कुणी करत असेल, तर पोलीस त्यांचे काम करतील; पण या देशावर प्रेम करणारे नागरिक आणि देशभक्त म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला, तर  पोलिसांनी कायदा अन् सुव्यवस्थेची चिंता करावी.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित युवतीला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन चौकशी चालू केली आहे. या वेळी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे उपाध्यक्ष गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, समीर सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, ‘सोशल मीडिया’ प्रमुख समीर प्रभुगावकर, निखिल आचरेकर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या कणकवली तालुकाध्यक्षांची पोलीस ठाण्यात तक्रार या घटनेविषयी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी ३० ऑगस्ट या दिवशी येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. यात म्हटले आहे की, कणकवली तालुक्यातील कलमठ येथील मुलीने १४ ऑगस्ट २०२३ या दिवशी जाणीवपूर्वक हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्याचा आणि २ गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जाणूनबुजून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याकरता पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची ‘पोस्ट’ प्रसारित केली. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला असतांना मुलीने केलेले हे कृत्य योग्य नाही. ते धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा निर्माण करणारे आहे. तरी अशा अपप्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई करावी. या घटनेचा कणकवली तालुक्यातील समाजाने निषेध व्यक्त केला आहे.