१. जागतिक अंतराळ संशोधन अभियानामध्ये भारताची गरूडझेप
भारताचे ‘चंद्रयान-३’ चंद्रावर उतरतांना देशासह संपूर्ण जगाने पाहिले. त्याचा भारतियांना अतिशय अभिमान वाटला. ‘इस्रो’ने त्याच्या संकेतस्थळाद्वारे याचे थेट प्रक्षेपण केले होते. त्याला ‘यू ट्यूब’वरून कोट्यवधी दर्शक लाभले. त्यावरून या मोहिमेकडे सर्व जग कसे पहात होते, हे स्पष्ट होते. चंद्रयान चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर उतरले; तेथे आजवर एकाही देशाचे यान उतरू शकले नव्हते. अशा ठिकाणच्या चंद्रभूमीवर यान उतरण्याला महत्त्व होते. तेथील भूमी, हवामान, चंद्राच्या पोटातील खनिजे, जलांश किंवा इतरही अनेक घटकांचा अभ्यास आता होत राहील. या अभ्यासाचा लाभ एकट्या भारताला होणार नाही, तर तो सार्या जगाला होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्ग येथून हा पराक्रम पाहिला. त्या वेळी त्यांनी केलेला भविष्यातील ‘सौर’ आणि ‘शुक्र’ मोहिमांचा उल्लेख महत्त्वाचा होता. या यशामुळे भारतीय वैज्ञानिकांचा आत्मविश्वास कितीतरी वाढला असेल. सार्या जगातील अंतराळ क्षेत्रात काम करणार्या संस्था, देश आणि वैज्ञानिक हे आता भारताकडे वेगळ्या दृष्टीने पहातील. भारताची सौर आणि शुक्र मोहीम म्हणूनच महत्त्वाची ठरणार आहे. अनेक देशांच्या उपग्रहांचे अंतराळातील प्रक्षेपण किंवा एकाच वेळी विक्रमी संख्येने अंतराळात उपग्रह सोडणे, या गोष्टी भारतीय वैज्ञानिकांसाठी नित्याच्या झाल्या आहेत. तरीही या यशामुळे भारत अंतराळ संशोधनातील अग्रमानांकित पहिल्या ३-४ देशांमध्ये आता हक्काने जाऊन बसला आहे.
२. ‘इस्रो’चे वैज्ञानिक हे आधुनिक ऋषी !
आता जगातील अनेक देश, समाज आणि भांडवलदार यांना भारताकडे पहाण्याची दृष्टी पालटावी लागणार आहे. त्याचप्रमाणे खुद्द भारतातील अनेकांनाही देशाच्या या सामर्थ्याची जाणीव ठेवून तारतम्याने बोलावे लागेल. नकारात्मक दृष्टी ठेवणार्या अनेकांना भारतात होणार्या कोणत्याही चांगल्या, पराक्रमाच्या, नवोन्मेष दाखवणार्या घटना दिसतच नाहीत. त्यांना हा रंगांधळेपणा आता टाकून द्यावा लागेल. पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी या साखळीतील भारताला नेतृत्व देणार्या बहुतेक पंतप्रधानांच्या दूरदर्शी दृष्टीमुळे आज आपण हा पराक्रम करू शकलो आहोत. अशा वेळी जुनीच रडगाणी गाऊन वैज्ञानिकांचा किंवा अभिमानाने छाती भरून येणार्या नागरिकांचा तेजोभंग करण्यात काहीच हशील नाही. चंद्रयानाची यशस्वी झेप ही प्रतिकात्मक नाही, तसेच तो काही अंगावर मिरवायचा दागिनाही नाही. या यशामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लागणार आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे शोधता येणार आहेत. आज ना उद्या माणूस अंतराळात वसाहती करण्याचे स्वप्न पहाणार आहे. त्याला सारे विश्व समजावून घ्यायचे आहे. प्राचीन भारतीय ऋषींनी विश्वाचा वेध त्यांच्या अंतर्दृष्टीने घेतला. त्यातून विश्वहिताची संहिता देणारी उपनिषदे जन्माला आली. आज भारतीय वैज्ञानिक त्यांच्या अजोड कर्तबगारीने याच विश्वाचा वेध अत्याधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने घेत आहेत. ते जगात कुणाच्याही मागे नाहीत. उलट काही विषयांमध्ये अनेक विकसित देशांना मागे टाकत आहेत. भारतातील ही प्राचीन ज्ञानसृष्टी आणि अर्वाचीन विज्ञानदृष्टी यांचे सम्मिलन, म्हणजे जगाच्या पुढच्या सर्वकाळ हिताची रूपरेषा आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या यशाचे मोल, हे जगातील इतरांच्या यशापेक्षा येथे वेगळे ठरते.
३. पाश्चात्त्य जगताला द्राक्षे आंबट !
प्रसारमाध्यमांनी या मोहिमेला अतिशय चांगली प्रसिद्धी दिली. केवळ काही आंबटशौकिन लोकांना हा अनावश्यक व्यय वाटला. ते म्हणाले की, भारताला चंद्रावर जायची काय आवश्यकता होती ? याने नेमका काय लाभ होणार आहे ? इत्यादी. या मोहिमेचे अनेक लाभ यापूर्वीच ‘इस्रो’च्या संचालकांनी स्पष्ट केले आहेत. इंग्लंडच्या १-२ लोकांनी म्हटले की, ‘भारत तेथे का गेला ? भारताला अधिक स्वच्छ व्हायची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे स्वच्छतागृहे नाहीत’ इत्यादी.’ वास्तविक ‘स्वच्छता भारत अभियाना’च्या अंतर्गत आज सर्वांना या सुविधा मिळाल्या आहेत. एकाने म्हटले, ‘भारताला कर्ज देणे बंद केले पाहिजे; कारण भारत त्याचा पैसा अशा प्रकारे वाया घालवत आहे.’ ते राजे असून भारत त्यांचा गुलाम आहे, ही त्यांची मानसिकता अजून गेलेली नाही. जे काम भारत करतो, ते आता इंग्लंडही करत नाही. सत्य हे आहे की, इंग्लंड, युरोप किंवा जगातील कुठलाही देश आता भारताला आर्थिक साहाय्य करत नाही. जगाकडून आर्थिक साहाय्य घेणे, हे भारताने वर्ष २०१० पासूनच थांबवले आहे. आता व्यापार वाढवण्याच्या हेतूने थोडे साहाय्य करण्यात येते. त्यात पूर्णपणे व्यावसायिक हेतू असतात. त्यामुळे त्यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
‘इस्रो’ची प्रगती अतिशय चांगली आहे. त्यामुळे पाश्चात्त्य जगतासाठी हा ‘कोल्ह्याला आंबट द्राक्षे’ नावाचा प्रकार आहे. ‘भारताने एवढ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्लबमध्ये कसा प्रवेश केला ?’, ही त्यांची पोटदुखी आहे. अधिकृतपणे अमेरिका भारताला अनुकूल होती; पण त्यांच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांसारख्या वर्तमानपत्रांना भारताने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावे, असे वाटते. इंग्लंड, फ्रान्स किंवा जर्मनी असे काहीच करत नाही. रशियाचेही ‘रॉकेट लॉचिंग’ मागे पडले आहे. त्यामुळे ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीलाही पोटदुखी निर्माण झाली होती.
४. चीन आणि भारत यांच्या अंतराळ कार्यक्रमांची चीनकडून तुलना !
चीन आणि अमेरिका यांचे आर्थिक सामर्थ्य अफाट असल्याने ते हे काम करत असतात. त्यामुळे ते करू शकतात. त्यांनाही भारताने तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे चीनलाही प्रचंड पोटदुखी झाली आहे. चंद्रयान उतरल्यानंतर पहिले दोन दिवस चीनकडून कुठलीही प्रतिक्रिया नव्हती. त्यालाही आश्चर्य वाटले की, भारत असे कसे करू शकतो ? भारत त्यांच्याशी स्पर्धा कशी करू शकतो ? ३ दिवसांनी त्यांचा लेख प्रसिद्ध झाला, त्यातही भारत आणि चीन यांच्या अंतराळ कार्यक्रमाची तुलना करण्यात आली. त्यात चीन हा भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या पुष्कळ पुढे असल्याचे दाखवण्यात आले. ते थोड्या फार प्रमाणात सत्यही असेल; पण भारत हे सर्व अत्यंत अल्प व्ययात करत आहे. त्यामुळे येणार्या काळात अंतराळामध्ये विविध प्रयोग करण्यासाठी भारतात तंत्रज्ञान विकसित होईल. ते तंत्रज्ञान अन्य क्षेत्रांमध्ये वापरून देशाच्या प्रगतीत हातभार लावता येईल. हे ‘चंद्रयान लँडिंग’चे सर्वांत मोठे यश आहे आणि हे मान्य करायला अन्य देश सिद्ध नाहीत. भारताने त्याचे कार्यक्रम चालूच ठेवावे. या पराक्रमाचा भारतियांना निश्चितच अभिमान वाटत आहे. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे कौतुक करायलाच पाहिजे. ‘येणार्या काळात त्यांचे अनेक कार्यक्रम चालूच रहातील, त्यांनाही यश लाभो’, अशीच सर्व भारतियांची इच्छा आहे.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.