महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच ‘महाराष्ट्र कॅसिनो कायदा’ रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात कॅसिनो चालू करण्यावर बंदी असणार आहे. महाराष्ट्रात वर्ष १९७६ मध्ये हा कायदा करण्यात आला होता. त्याची अधिसूचना काढलेली नव्हती. हा कायदा लागू करण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण आता राज्य सरकारने महाराष्ट्र कॅसिनो कायदाच रहित केला आहे. महसुलासाठी मॉल, किराणा दुकानातून दारूची विक्री करण्याचा निर्णय घेणार्या तत्कालीन आघाडी सरकारच्या तुलनेत विद्यमान सरकारचा सदर निर्णय अत्यंत अभिनंदनीय आहे. ‘महाराष्ट्रात कॅसिनोची ही घाण नको, राज्यात कॅसिनो आणणार नाही’, अशी ठाम भूमिका पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. समाजाला लागलेली ही कीड ठोस निर्णय घेऊनच नष्ट करता येईल.
सध्या युवावर्ग झटपट, कष्ट न करता पैसे मिळवण्याच्या नादात कॅसिनोसारख्या वाईट गोष्टींच्या नादी लागण्याची शक्यता असते. कालांतराने त्याचे व्यसनात रूपांतर होते आणि त्यामुळे कुटुंबच्या कुटुंब उद़्ध्वस्त झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा पायंडा नकोच. ‘कॅसिनो कायदा संमत झाल्यास पर्यटन उद्योगाचा विकास होईल, त्यामुळे कॅसिनो कायदा संमत करावा’, अशा आशयाचे पत्र एका पक्षाच्या पदाधिकार्याने मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. ‘कॅसिनो’चा अर्थच ‘जुगार खेळण्याचे स्थान’ असा आहे. अर्थात्च जिथे जुगार, तिथे अनैतिकतेचे साम्राज्य निर्माण होणार. गुन्हेगारी, फसवणूक, गुंडगिरी, व्यसनाधीनता यांमध्ये वाढ होणार. पर्यटन उद्योगाचा विकास करण्यासाठी हा एकमेव मार्ग शिल्लक उरला आहे का ? पर्यटनक्षेत्रांचा विकास, आवश्यक सोयी-सुविधा, पर्यटनक्षेत्रांच्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार, पर्यटकांची फसवणूक थांबवणे यांसारखे प्रामाणिक प्रयत्न केल्यास पर्यटन उद्योगाचा विकास होईल. महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असलेले गडदुर्ग, कोकणातील समुद्रकिनारे, मंदिरे आदी अनेक गोष्टी असतांना पर्यटनासाठी कॅसिनोसारख्या अनैतिक माध्यमाची आवश्यकता नसावी. शासनकर्त्याला राज्यात कायदा सुव्यवस्था नांदावी, सन्मार्गाने चालणारी प्रजा निर्माण व्हावी, सुराज्य व्हावे यांसाठी प्रसंगी कठोर होऊन प्रशासन चालवावे लागते. ‘जनसामान्यांना काय आवडते ?’, यापेक्षा ‘काय आवश्यक आहे ?’, याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात’, असे चाणक्य नीती सांगते. त्यामुळे ‘कॅसिनो नकोच !’
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.