तत्त्वनिष्‍ठ, समंजस आणि सेवाभाव असलेला जळगाव येथील श्री. देवेंद्र (सनातन) अनिल हेम्‍बाडे (वय २६ वर्षे)!

१. सौ. शोभा हेम्‍बाडे (देवेंद्रची आई, वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ५३ वर्षे), जळगाव

श्री. देवेंद्र हेम्‍बाडे

अ. ‘देवेंद्रचे साधनेचे दृष्‍टीकोन योग्‍य असतात. त्‍याला एखादा प्रसंग सांगितल्‍यावर तो मला साधनेच्‍या दृष्‍टीकोनातून त्‍याविषयी समजावून सांगतो.’

२. श्री. अनिल हेम्‍बाडे (देवेंद्रचे वडील), जळगाव

२ अ. तत्त्वनिष्‍ठता : ‘घरात कुणाचे काही चुकले, तर तो स्‍पष्‍टपणे त्‍यांची चूक सांगतो.’

३. सौ. अक्षरा शिंदे (देवेंद्रची मोठी बहीण), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

३ अ. दायित्‍वाची जाणीव असणे : ‘माझे लग्‍न ठरले, तेव्‍हा तो २० वर्षांचा होता. त्‍याने माझ्‍या लग्‍नाच्‍या वेळी काही कामांचे दायित्‍व घेऊन ती कामे करून माझ्‍या बाबांना साहाय्‍य केले.

३ आ. अल्‍प कालावधीत आश्रमजीवन स्‍वीकारणे : दळणवळण बंदीच्‍या काळात देवेंद्र ‘ऑनलाईन’ सत्‍संगांच्‍या सेवेसाठी जळगाव सेवाकेंद्रात रहायला गेला. त्‍याला आश्रमजीवनाची सवय नव्‍हती; पण अल्‍प कालावधीत त्‍याने आश्रमजीवन स्‍वीकारले. त्‍याने सेवाकेंद्रातील सर्व सेवाही शिकून घेतल्‍या.

३ इ. देवावरील श्रद्धा : पूर्वी त्‍याला आईची काळजी वाटत असल्‍याने तो सहसा कुठेेही रहायला जात नसे; पण आता ‘देव आईची काळजी घेईल’, ही श्रद्धा असल्‍याने तो जळगाव सेवाकेंद्रात रहायला गेला.

३ ई. ‘आईला आश्रमात रहायला मिळावे’, अशी तळमळ असणे : तो एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात गेला होता. तेव्‍हा त्‍याला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग मिळाला. त्‍याने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना स्‍वतःविषयी काहीच विचारले नाही. त्‍याने परात्‍पर गुरुदेवांना सांगितले, ‘‘माझ्‍या आईला पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी आश्रमात रहायला येण्‍याची पुष्‍कळ इच्‍छा आहे; पण माझी बहीण मतीमंद असल्‍याने तिला आश्रमात रहायला येता येत नाही.’’ तेव्‍हा गुरुदेवांनी त्‍याला सांगितले, ‘‘आई आणि बहीण यांना काही दिवस आश्रमात येऊन रहायला सांग, म्‍हणजे बहिणीला आश्रमाची सवय होईल.’’ घरी आल्‍यावर त्‍याने उत्तरदायी साधकांना विचारून काही दिवसांतच त्‍यांचे रामनाथीला जाण्‍याचे नियोजन केले आणि तो त्‍यांना आश्रमात घेऊन गेला. ‘आईला आश्रमात रहायला मिळावे’, अशी त्‍याची तळमळ होती.’

४. कु. पल्लवी हेम्‍बाडे (देवेंद्रची मधली बहीण), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

४ अ. बहिणीकडून अपेक्षा नसणे : ‘आईला अधूनमधून बरे नसते. तिला आता अधिक काम होत नाही, तरी ‘मी आश्रमातून घरी यायला हवे’, अशी त्‍याची अपेक्षा नसते.

४ आ. आई आणि बहीण यांची सेवा करणे 

४ आ १. मतीमंद बहिणीला समजून घेऊन तिची सेवा प्रेमाने करणे : ऑगस्‍ट २०२१ मध्‍ये प्रज्ञा (देवेंद्रची मतीमंद बहीण, आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ३१ वर्षे) रुग्‍णाईत झाली होती. तिला सतत उलट्या होत होत्‍या. तिला उलटीसाठी भांडे दिले, तरी तिला ते पकडता येत नसे. तेव्‍हा देवेंद्र प्रत्‍येक वेळी ‘तिला भांड्यात उलटी करता येईल’, अशा प्रकारे भांडे धरून तिलाही व्‍यवस्‍थित धरायचा. त्‍याला अशी कुणाची सेवा करण्‍याची सवय नव्‍हती, तरी तो तिची स्‍थिती समजून घेऊन तिची सेवा करत होता.

४ आ २. आई रुग्‍णाईत असतांना मतीमंद बहिणीची सेवा आणि घरातील सर्व कामे करणे : आईला एकटीला सर्व करणे कठीण जात होते. प्रज्ञाला थोडे बरे वाटू लागले, त्‍याच दिवशी आई रुग्‍णाईत झाली. त्‍याही स्‍थितीत त्‍याने सर्व सेवा स्‍थिर राहून केल्‍या. त्‍याने ‘प्रज्ञाची वेणी घालणे, तिला जेवण भरवणे, औषधे देणे’, यांसह ‘आईला साहाय्‍य करणे, तिला आधुनिक वैद्यांकडे नेणे’, ही सर्व कामे स्‍थिर राहून केली. त्‍याच समवेत आईला बरे नसल्‍याने त्‍याने आईला विचारून त्‍याला जमेल तसा स्‍वयंपाकही केला. प्रत्‍यक्षात त्‍याने अशी कामे कधीच केली नव्‍हती, तरी त्‍याने सर्व स्‍वीकारले.

४ इ. मतीमंद बहिणीला व्‍यवस्‍थित सांभाळणे : कधी प्रज्ञा पुष्‍कळ चिडली असेल, तर आम्‍हाला तिला लवकर शांत करता येत नाही; पण देवेंद्र तिच्‍याशी बोलून आणि खेळून तिला शांत करतो. तिची एखादी कृती चुकली, तर तो ‘तिला सहज समजेल’, अशा पद्धतीने सांगण्‍याचा प्रयत्न करतो.

४ ई. तो आमच्‍यापेक्षा लहान आहे; पण आम्‍हाला त्‍याचा आधार वाटतो.’

५. श्री. विशाल पवार (देवेंद्रचा आतेभाऊ), जळगाव

५ अ. श्री. देवेंद्र (सनातन) हेम्‍बाडे याच्‍यामध्‍ये जाणवलेले पालट

५ अ १. स्‍वभावदोष न्‍यून होऊन समजूतदारपणा वाढणे : ‘साधारण वयाच्‍या १७ व्‍या वर्षापर्यंत देवेंद्रमध्‍ये ‘राग येणे, हट्टीपणा, वेळ वाया घालवणे, व्‍यक्‍तीनिष्‍ठता, पूर्वग्रहाने वागणे’ इत्‍यादी स्‍वभावदोष होते. या काळात त्‍याच्‍या चेहर्‍यावर त्रासदायकपणाही जाणवत होता; पण आता त्‍याच्‍यातील प्रेमभाव वाढला आहे. वाढत्‍या वयानुसार त्‍याच्‍यातील समजूतदारपणाही वाढला आहे. ‘त्‍याच्‍यातील रागीटपणा, व्‍यक्‍तीनिष्‍ठता आणि हट्टीपणा न्‍यून झाला असून आता त्‍याच्‍या चेहर्‍यावरील त्रासदायकपणाही न्‍यून झाला आहे’, असे मला जाणवते.

५ अ २. देवेंद्र सतत काही ना काही करत असतो. ‘अजून चांगले कसे करू ?’, अशी त्‍याला तळमळ आहे. त्‍यामुळे त्‍याची विचारून घेण्‍याची आणि अभ्‍यास करण्‍याची वृत्ती वाढली आहे.

५ अ ३. भावजागृती अनुभवता येणे : आतापर्यंत मी ‘त्‍याची भावजागृती झाली’, असे कधी ऐकले नव्‍हते; मात्र आता त्‍याला भावजागृती अनुभवता येते.

५ अ ४. कृतज्ञताभाव वाढणे

अ. त्‍याला संत, आश्रम आणि साधक यांच्‍याप्रती कृतज्ञता वाटते.

आ. ‘देवाने आपल्‍याला किती दिले आहे !’, असे वाटून त्‍याला देवाप्रती कृतज्ञता वाटते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २०.८.२०२१)