देहलीतील ८ मेट्रो स्थानकांवर खलिस्तानवाद्यांनी लिहिल्या भारतविरोधी घोषणा !

‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी संघटनेचा हात !

नवी देहली – खलिस्तान समर्थकांनी देहलीतील ८ मेट्रो स्थानकांवर ‘देहली बनेगा  खलिस्तान’ ‘खलिस्तान झिंदाबाद’ आणि ‘पंजाब इज नॉट इंडिया’ (पंजाब भारत नाही) अशा घोषणा २७ ऑगस्ट या दिवशी लिहिल्या. यानंतर पोलिसांनी या घोषणा पुसून टाकल्या. देहलीत पुढील मासात होणार्‍या ‘जी-२०’ परिषदेपूर्वी भारतविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी संघटनेने या घोषणा लिहून केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे अन्वेषण केले जात आहे.

खलिस्तान समर्थकांनी शिवाजी पार्क, मादीपूर, पश्‍चिम विहार, इंडस्ट्री सिटी, महाराजा सूरजमल स्टेडियम, सरकारी सर्वोदय बाल विद्यालय नांगलोई, पंजाबी बाग आणि नांगलोई या मेट्रो स्थानकांवर या घोषणा लिहिल्या आहेत. या घटनेनंतर ‘सिख फॉर जस्टिस’चा पसार खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडिओ प्रसारित  केला आहे, ज्यामध्ये या मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर या घोषणा लिहिलेल्या दिसत आहेत.

संपादकीय भूमिका 

खलिस्तानी संघटनेवर बंदी घालूनही ती अशा प्रकारे कारवाया करून देश-विदेशांत भारतविरोधी वातावरण निर्माण करत आहे. सुरक्षादलांनी अशा संघटनांची पाळेमुळे खणून काढून त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याची आवश्यकता आहे ! असे का होत नाही ?, याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे !