कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

  • वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली

  • महाराष्ट्रातील १६५ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सुभाष सुर्वे, श्री. संतोष गोसावी महाराज, श्री. सुनील घनवट, श्री. दीपक देसाई, श्री. किरण दुसे आणि श्री. अशोक भोरे

कोल्हापूर – मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले. ते श्री विठ्ठल मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेला श्री एकमुखी दत्तमंदिराचे पुजारी श्री. संतोष गोसावी, श्री रावणेश्वर महादेव मंदिराचे पुजारी श्री. अशोक भोरे आणि श्री. गौरीशंकर संगोळी, श्री उत्तरेश्वर महादेव मंदिराचे श्री. सुभाष सुर्वे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते.

श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘यापूर्वी मुंबई, ठाणे, रायगड, नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील १६५ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली आहे. कोल्हापूर शहरातील १२, मलकापूर येथील ३, हुपरी येथील ३, तळंदगे येथील १ या मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाली आहे.’’

श्री एकमुखी दत्तमंदिराचे पुजारी श्री. संतोष गोसावी म्हणाले, ‘‘भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहे, तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रचार होण्यासह युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल. पारंपरिक वस्त्रनिर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी. त्यामुळे आम्हीही आमच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत आहोत. या संदर्भात जुना आखाडा परिषद, उत्तराखंड यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे.’’

श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘वस्त्रसंहितेचा मुख्य उद्देश हा भारतीय संस्कृतीला परंपरेला साजेशी वस्त्रे परिधान करावीत, हा आहे. आधुनिकतेकडे वळतांना वस्त्रसंहितेच्या संदर्भात पालन व्हावे.’’ श्री. सुभाष सुर्वे म्हणाले, ‘‘पूर्वी ‘असे पालन करावे’, असे सांगण्याची आवश्यकता वाटत नव्हती; मात्र काळाच्या ओघात मंदिरात प्रवेश करतांना चित्र-विचित्र कपडे घालून येणारे पाहून वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक आहे. अन्य धर्मीय त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये वस्त्रसंहितेचे पालन करतात; मात्र हिंदूंच्या मंदिरात ते घडतांना दिसत नाही. ते होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.’’

वस्त्रसंहिता लागू करणारी कोल्हापूर जिल्हातील मंदिरे 

कोल्हापूर शहर – श्री एकमुखी दत्त मंदिर, श्री विठ्ठल मंदिर आणि आनंद स्वामी मठ, श्री रावणेश्वर महादेव मंदिर, श्री वीरशैव ककैय्या समाज शिवमंदिर, श्री काळभैरव मंदिर, श्री भाविक विठोबा मंदिर, श्री पंत बाळेकुंद्री दत्त मठ, श्री विठ्ठल मंदिर, श्री ओंकारेश्वर मंदिर, श्री पंचमुखी गणेश मंदिर, श्रीखोल खंडोबा मंदिर, श्री शनैश्वर महादेव मंदिर

मलकापूर – श्रीराम मंदिर, श्री नरसिंह मंदिर, श्री जुगाईदेवी मंदिर

हुपरी – श्री अंबाबाई मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री जोतिबा मंदिर, श्री जोतिबा मंदिर

तळंदगे – श्री जगन्नाथ मंदिर