शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुसलमान विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांकडून मारहाण !

  • मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना

  • घरचा अभ्यास न केल्याने शिक्षा : शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंद

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील खुब्बारपूर गावातील नेहा पब्लिक स्कुल या शाळेत घरचा अभ्यास न करणार्‍या एका मुसलमान विद्यार्थ्याला शिक्षिकेने अन्य विद्यार्थ्यांना मारहाण करायला लावल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यानंतर मुसलमान नेते, संघटना, तसेच निधर्मीवादी राजकीय पक्ष यांच्याकडून टीका करण्यात आली. चित्रा त्यागी असे या शिक्षिकेचे नाव असून ही शाळा तिच्या मालकीचीच आहे. या प्रकरणी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आणि शिक्षण विभाग यांनी या घटनेची चौकशी चालू केली आहे.

व्हिडिओत काय दिसत आहे ?

शिक्षिका त्यागी यांनी मुसलमान विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभे केले. यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समोर येऊन या विद्यार्थ्याला मारण्यास सांगितले. यासह ‘मी तर आता घोषित केले आहे की, या मुसलमान मुलांनी त्यांच्या भागांत (मुसलमान भागांत) जावे.’ त्यागी यांच्या मुसलमान मुलाला मारण्याच्या आदेशानंतर वर्गातील एका मुलाने मुसलमान विद्यार्थ्याच्या गालावर हळू चापट मारली. यावर त्यागी त्या मुलाला म्हणाल्या, ‘‘तू असे का मारतो आहेस ? जोरात मार.’ यानंतर आणखी २ मुले उठली आणि त्यांनी मुसलमान विद्यार्थ्याला जोरात मारले.’’ पुढे त्यागी म्हणाल्या, ‘‘चला, मारण्याचे आणखी कोण शेष आहेत ? आता पाठीवर मारा. तोंडावर मारल्याने त्याचे गाल लाल होत आहेत, त्यामुळे तोंडावर मारू नका.’’

शिक्षिकेचे स्पष्टीकरण

शिक्षिका चित्रा त्यागी यांनी या प्रकरणी सांगितले की, या घटनेला धार्मिक रंग देणे चुकीचे आहे. आमच्या शाळेत अनेक मुसलमान विद्यार्थी शिकतात. ज्या विद्यार्थ्याला मारले, तो घरचा अभ्यास करून आला नव्हता. यामुळे त्याला शिक्षा देण्यात आली. त्याला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने संकलित करून प्रसारित केला जात आहे. मुलाच्या कुटुंबियांनी मला मुलाविषयी कठोर रहाण्यास सांगितले होते. त्यामुळे आम्ही कठोर होण्याचा प्रयत्न केला. मी विकलांग आहे. जागेवरून उठू शकत नसल्याने अन्य विद्यर्थ्यांना मारण्यास सांगितले होते. त्याला शिक्षा देण्याचा उद्देश ‘त्याने अभ्यास करावा’, असाच होता. मी मुसलमान असा शब्द उच्चारला, हे चुकीचे आहे, हे मला मान्य आहे; मात्र माझा हेतू वेगळा होता.

घटनेला धार्मिक रंग देऊ नये ! – मुसलमान विद्यार्थ्याच्या वडिलांचे आवाहन

या घटनेविषयी सदर मुसलमान विद्यार्थ्याचे वडील म्हणाले, ‘‘या घटनेला धार्मिक रंग देणे चुकीचे आहे. गावात आम्ही सर्व बंधुभावाने रहातो. मुलाने चांगला अभ्यास करावा; म्हणून त्याच्या संदर्भात कठोर रहाण्याविषयी मीच शिक्षिका त्यागी यांना सांगितले होते; मात्र त्याचा अर्थ अशा प्रकारे मारहाण करण्यात यावी, असा नव्हता. शाळेकडे तक्रार केली, तर आम्हाला सांगितले, ‘शाळेचा असाच नियम आहे.’ हा नियम योग्य नाही. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे.’’