हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पुरातत्व खात्याकडे मागणी
पणजी, २५ ऑगस्ट (वार्ता.) – शंखवाळ (सांकवाळ) येथे पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर वर्ष १५०६ मध्ये पोर्तुगिजांनी पाडले. सध्या तेथे मंदिराचे प्रवेशद्वार अस्तित्वात आहे आणि याला ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळ गावाचे प्रवेशद्वार) असे संबोधले जाते. गोवा सरकारने वर्ष १९८३ मध्ये या ठिकाणाला ‘वारसा स्थळ’ घोषित केले. या ठिकाणी समाजातील एका विशिष्ट विभागाने अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केलेले आहे. गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याने या ठिकाणचे अतिक्रमण हटवून येथील भूमीचे संरक्षण करण्यासाठी अधिकारी नेमावा. पुरातत्व खात्याने ‘या ठिकाणी पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर होते’, हे पडताळण्यासाठी भूमीचे उत्खनन करावे किंवा अधिकृत संस्थेकडून संपूर्ण सर्वेक्षण करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २५ ऑगस्ट या दिवशी गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याच्या संचालकांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली.
शंखवाळ (सांकवाळ) येथे वारसा स्थळी ‘करणी सेने’चे पदाधिकारी आणि देवीचे भक्त यांनी हल्लीच श्री विजयादुर्गादेवीची स्थापना केल्याने वास्को पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. स्थानिक ख्रिस्ती नागरिकांनीही या घटनेला उत्तरदायी असलेल्यांवर कारवाईसाठी आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ही मागणी केली आहे.
या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या शिष्टमंडळामध्ये ‘राष्ट्रीय बजरंग दल, गोवा’चे नितीन फळदेसाई आणि रामदास सावईवेरेकर, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव सर्वश्री जयेश थळी, अध्यक्ष चंद्रकांत (भाई) पंडित, भारतमाता की जय संघटनेचे बबन केरकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समितीचे सुशांत दळवी, शिवप्रेमी विनोद आदींची उपस्थिती होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदनात पुढील सूत्रे मांडली आहेत.
१८ ऑगस्ट २०२३ या दिवशी वारसा स्थळावरील श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती काहींनी पुरातत्व खात्याला अंधारात ठेवून हटवल्याचे वृत्त आहे. देवी आणि सकल हिंदु धर्मीय यांचा हा अवमान आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे प्रवेश करून अनेक ‘क्रॉस’ उभारण्यात आले आहेत. श्री विजयादुर्गादेवीच्या पुरातन मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे नष्ट करण्याचा हा नियोजनबद्ध कट आहे. या ठिकाणचे वडाचे झाडही कापण्यात आले आहे. या ठिकाणी भूमीचे सर्वेक्षण केल्यास पुरातन मंदिराचे अवशेष सापडू शकतील. पुरातत्व खात्याने या ठिकाणची अनधिकृत बांधकामे हटवली पाहिजेत. वारसा स्थळी कोणत्याही प्रकारची सभा, प्रार्थना, धार्मिक कृत्ये आदींना स्थान देऊ नये.