धर्महानीच्‍या कृती तत्‍परतेने थांबवणारे आणि निद्रिस्‍त हिंदूंना जागृत करण्‍यासाठी धर्मजागृतीपर मोहिमा राबवणारे पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास

१४ ऑगस्‍ट २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण पू. शिवाजी वटकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या धर्मरक्षणाच्‍या कार्याचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.                    

(भाग १२)

भाग ११ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/710745.html

पू. शिवाजी वटकर

२५. हिंदु जनजागृती समितीच्‍या माध्‍यमातून केलेले धर्मरक्षणाचे कार्य !

२५ ई. ‘कोप्रान’ या औषधनिर्मिती करणार्‍या मोठ्या आस्‍थापनाच्‍या विज्ञापनाला केलेला विरोध !

२५ ई १. ‘कोप्रान’ या आस्‍थापनाने ‘हनुमानाने द्रोणागिरी पर्वताऐवजी त्‍यांच्‍या आस्‍थापनाने निर्मिलेले ‘स्‍माईल कफ सिरप’ औषध आणल्‍याचे दाखवून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणे : वर्ष २००७ मध्‍ये ‘कोप्रान’ या औषधनिर्मिती करणार्‍या मोठ्या आस्‍थापनाने ‘स्‍माईल कफ सिरप’ या नावाचे खोकल्‍याचे औषध बनवले होते. त्‍याला प्रसिद्धी देण्‍यासाठी त्‍यांनी दूरचित्रवाहिनीवर विज्ञापन दिले होते. त्‍यामध्‍ये आकाशातून ‘श्री हनुमंत द्रोणागिरी पर्वत आणत आहे’, असे दुरून दिसत होते; मात्र जवळ आल्‍यावर हनुमंताच्‍या हातात द्रोणागिरी पर्वताच्‍या ऐवजी ‘स्‍माईल कफ सिरप’ची बाटली दिसत होती. ‘खोकल्‍याचा त्रास कायमचा दूर होण्‍यासाठी जणू हनुमंतानेच औषधरूपी संजीवनी आणली आहे’, असे दाखवले जात होते. आस्‍थापनाने ‘खोकल्‍याचे औषध संजीवनीसमान आहे’, असे दाखवून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या होत्‍या.

२५ ई २. ‘कोप्रान’ हे मोठे आस्‍थापन असल्‍याने त्‍यांनी हिंदूंच्‍या विरोधाला प्रतिसाद न देणे : या विज्ञापनाच्‍या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने निषेधपत्र पाठवून हे विज्ञापन थांबवण्‍याची मागणी करण्‍यात आली; मात्र हे मोठे आस्‍थापन असल्‍यामुळे त्‍यांनी समितीच्‍या विरोधाला कोणताच प्रतिसाद दिला नव्‍हता.

२५ ई ३. ‘कोप्रान’च्‍या वरळी (मुंबई) येथील कार्यालयात जाऊन त्‍यांना विडंबनात्‍मक विज्ञापनाविषयी सांगतांना ‘हिंदूंच्‍या धार्मिक भावना कशा प्रकारे दुखावल्‍या जात आहेत’, हे स्‍पष्‍टपणे सांगणे : त्‍यानंतर मी समितीच्‍या एका कार्यकर्त्‍याच्‍या समवेत ‘कोप्रान’ आस्‍थापनाच्‍या वरळी (मुंबई) येथील कार्यालयात गेलो. या भेटीच्‍या वेळी मी त्‍यांच्‍या प्रमुखांशी बोलतांना त्‍यांना विडंबनात्‍मक विज्ञापनाविषयी सांगितले. ते पारशी होते. मी त्‍यांना समजावून सांगतांना म्‍हणालो, ‘‘तुमच्‍या विज्ञापनामुळे लाखो हनुमानभक्‍तांच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या आहेत. तुमच्‍या ‘स्‍माईल कफ सिरप’ने साधा खोकला जाईल कि नाही ?’, याची निश्‍चिती नसतांना तुम्‍ही या क्षुल्लक औषधाची तुलना ‘संजीवनी’शी कशी करू शकता ? ‘तुम्‍ही महापराक्रमी हनुमंताला तुमच्‍या औषधाची बाटली आणायला सांगता’, हे हनुमानभक्‍त खपवून घेतील का ? हिंदूंंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या आहेत. धर्मद्रोही आस्‍थापन म्‍हणून हिंदू तुमच्‍या इतर उत्‍पादनांवरही बहिष्‍कार घालतील. त्‍यामुळे तुमची हानी होऊ शकते. मी तुम्‍हाला चांगल्‍या भाषेत आणि सनदशीर मार्गाने सांगत आहे; मात्र लोकांच्‍या भावना तीव्र आहेत.’’

२५ ई ४. ‘कोप्रान’ने विज्ञापन थांबवत असल्‍याचे लेखी पत्र देणे : त्‍या पारशी व्‍यवस्‍थापकांनी आम्‍हाला अर्धा घंटा थांबायला सांगून त्‍यांच्‍या वरिष्‍ठांशी चर्चा केली. नंतर त्‍यांनी आम्‍हाला सांगितले, ‘‘आम्‍ही हे विज्ञापन थांबवत आहोत.’’ मी त्‍यांना तसे लेखी आश्‍वासन देण्‍याची विनंती केली. त्‍यांनी दुसर्‍या दिवशी (७.२.२००७) ‘कोप्रान’ आस्‍थापन ‘स्‍माईल कफ सिरप’चे हे विज्ञापन थांबवत आहे’, असे आम्‍हाला पत्र दिले.

२५ ई ५. ‘कोप्रान’च्‍या कार्यालयात विषय ऐकून घेतील का ?’, असे वाटत असतांना प्रमुखांनी विषय ऐकून विज्ञापन थांबवणे, त्‍या वेळी ‘हनुमंत अन् परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या चैतन्‍यशक्‍तीने हे शक्‍य झाले’, असे जाणवणे : ‘कोप्रान’च्‍या कार्यालयात या विज्ञापनातील विडंबनाविषयी चर्चा करण्‍यासाठी ‘तिथे प्रवेश मिळेल कि नाही ?’, याची मला शाश्‍वती नव्‍हती. ‘तिथे प्रवेश मिळाला, तरी माझे कुणी ऐकून घेईल कि नाही ?’, याचीही मला शंका वाटत होती. ‘केवळ चर्चा करून विज्ञापनाला विरोध दर्शवल्‍यावर दूरचित्रवाहिनीवरील हे विडंबन थांबेल’, असा मला पुसटसा विचारही आला नव्‍हता; मात्र मन आणि बुद्धी यांच्‍या पलीकडील घटना घडल्‍या. यातून मला ‘हिंदु धर्म, श्री हनुमंत आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांची चैतन्‍यशक्‍ती कशी कार्य करते ?’, हे अनुभवता आले.

आस्‍थापनाने केलेले विडंबन थांबवण्‍याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. या प्रसंगातून मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने अनेक गोष्‍टी शिकता आल्‍या आणि हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढील मोहिमा राबवण्‍यासाठी स्‍फूर्ती दिली.

२५ उ. कागदाच्‍या लगद्यापासून श्री गणेशमूर्ती बनवण्‍याच्‍या विरोधात आंदोलन करणे : वर्ष २०१५ मध्‍ये माझे वय ७० वर्षे होते. या वयातही मला गुरुकृपेने कागदाच्‍या लगद्याच्‍या श्री गणेशमूर्ती बनवण्‍याच्‍या विरोधात आंदोलन करण्‍याची सत्‍सेवा मिळाली. श्री गणेश आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या कृपेने माझ्‍याकडून ती सत्‍सेवा चिकाटीने होऊन मला त्‍यात यश मिळाले.

२६. हिंदु जनजागृती समितीच्‍या अंतर्गत केलेल्‍या मोहिमा !

२६ अ. ‘मंदिर सरकारीकरण कायदा’ रहित करण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : महाराष्‍ट्रातील प्रस्‍तावित ‘मंदिर सरकारीकरण कायदा’ रहित करण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीने केलेल्‍या आंदोलनात मी सक्रीय सहभाग घेतला. महाराष्‍ट्र शासनाने षड्‌यंत्र रचून वर्ष २००६ मध्‍ये साडेचार लाख मंदिरे आणि वर्ष २०१० मध्‍ये अडीच लाख मंदिरे यांचे सरकारीकरण करण्‍याचे विधेयक (प्रस्‍तावित कायदा) आणले होते. त्‍यांच्‍या विरोधात जागृती करण्‍यासाठी समितीच्‍या वतीने आम्‍ही मुंबर्ईतील प्रमुख मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांना संपर्क करून त्‍यांच्‍याशी चर्चा केली. त्‍या वेळी पत्रकार परिषदा घेणे, विरोधी पक्षनेत्‍यांना हा विषय देणे, हिंदु राष्‍ट्र-जागृती सभांतून हा विषय मांडणे इत्‍यादी प्रयत्न करण्‍यात आले. त्‍याचप्रमाणे ‘महाराष्‍ट्र मंदिर आणि धार्मिक संस्‍था महासंघ’ स्‍थापन करण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्न केले.

२६ अ १. हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या विरोधामुळे मंदिरांचे सरकारीकरण करण्‍याचे विधेयक बारगळणे : सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांविषयी माहितीच्‍या अधिकाराखाली माहिती काढून त्‍यातील घोटाळ्‍यांविरुद्ध आंदोलने करण्‍यात आली. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे सरकारीकरण झाले होते. तेथे अयोग्‍य पद्धतीने चाललेल्‍या कारभाराच्‍या विरोधात वर्ष २००६ मध्‍ये प्रत्‍येक मंगळवारी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने वर्षभर आंदोलने करण्‍यात आली. मंदिरांचे विश्‍वस्‍त, धर्माभिमानी आणि समिती यांनी केलेल्‍या आंदोलनांमुळे ही दोन्‍ही (वर्ष २००७ मध्‍ये महाराष्‍ट्रातील साडेचार लाख मंदिरांचे आणि वर्ष २०१० मध्‍ये अडीच लाख मंदिरांचे सरकारीकरण करण्‍याची) प्रस्‍तावित विधेयके बारगळली.

२६ आ. हिंदूंचे ख्रिस्‍तीकरण टाळण्‍यासाठीच्‍या जनजागृती मोहिमेत सहभाग घेणे : चमत्‍कार होत असल्‍याची विज्ञापने करून धर्मांतर करणार्‍या ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांच्‍या विरोधात ‘द ड्रग्‍ज अँड मॅजिक रेमिडिज् अ‍ॅक्‍ट १९५४’च्‍या विधेयकातील ‘ऑब्‍जेक्‍शनेबल अ‍ॅडव्‍हर्टाईजमेंट’च्‍या कलमानुसार मुंबई येथे गुन्‍हे दाखल करून समितीने धर्मातराचे कार्यक्रम रोखले. मुलुंड येथील महानगरपालिकेच्‍या सभागृहात वर्षानुवर्षे चालणारा धर्मांतराचा कार्यक्रम कायमचा बंद पाडला.

२६ इ. महाराष्‍ट्रातील धर्मविरोधी प्रस्‍तावित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’ला सतत १४ वर्षे विरोध केला.

२६ ई. देवतांच्‍या विडंबनाला विरोध : चित्रपट, नाटके, वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिनी यांद्वारे होणार्‍या देवतांच्‍या विडंबनाला वैध मार्गाने विरोध केला. देवतांचे विडंबन असलेल्‍या १५ हून अधिक नाटकांचे प्रयोग रहित केले गेले. देवतांचा अपमान करणारी २५ हून अधिक चित्रप्रदर्शने रहित केली.

२६ उ. समितीच्‍या विरोधामुळे ‘स्‍टार टी.व्‍ही.’ या बलाढ्य दूरचित्रवाहिनीने धर्मद्रोही विज्ञापने दाखवणे बंद केले.

२६ऊ. इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्‍याचे प्रयत्न : पाठ्यपुस्‍तकांतून इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या राष्‍ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्‍या (एन्.सी.आर्.टी.च्‍या) विरोधात समितीच्‍या वतीने आंदोलन करण्‍यात आली.

२६ ए. राष्‍ट्ररक्षण विषयक कार्यक्रमांतील सहभाग

२६ ए १. भारताच्‍या नकाशाचे विकृतीकरण रोखणे : हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने भारताच्‍या नकाशाचे विकृतीकरण रोखण्‍यासाठी ‘अखंड भारत’ या चळवळीत मी सहभाग घेतला. या नकाशांमध्‍ये काश्‍मीर राज्‍याचा भूभाग चीन आणि पाकिस्‍तान या देशांमध्‍ये दाखवून भारताच्‍या नकाशाचे विकृतीकरण केले होते. आम्‍ही हे नकाशे प्रसारित करणारी संकेतस्‍थळे आणि खासगी आस्‍थापने यांना विरोध केला.

२६ ए २. ‘गूगल मॅप’ने केलेल्‍या भारताच्‍या नकाशाच्‍या विकृतीकरणाला विरोध केला.

२७. श्रीकृष्‍णाच्‍या कृपेमुळेच ‘हिंदु जनजागृती समितीचा समन्‍वयक’ म्‍हणून यशस्‍वी रितीने कार्य करता येणे

२७ अ. धर्मद्रोही आणि राष्‍ट्रद्रोही कृत्‍यांच्‍या विरोधात चालवलेल्‍या मोहिमा १०० टक्‍के यशस्‍वी होणे : ‘हिंदु जनजागृती समितीचा समन्‍वयक’ म्‍हणून कार्य करत असतांना मला श्रीकृष्‍णाच्‍या कृपेने अनेक अनुभूती आल्‍या. ‘स्‍टार टीव्‍ही, ‘अमूल बॉडी वेअर’, ‘कॅडबरीज् इंडिया’, ‘शालिमार पेंटस्’, आदी बलाढ्य आस्‍थापनांनी विज्ञापनांद्वारे देवता आणि राष्‍ट्रीय चिन्‍ह यांचे विडंबन केले होते. त्‍यांच्‍या विरोधात समितीने वैध मार्गाने चालवलेल्‍या मोहिमा जवळ जवळ १०० टक्‍के यशस्‍वी झाल्‍या.

२७ आ. खोटे गुन्‍हे नोंद होण्‍यापासून श्रीकृष्‍णानेे वाचवणे : काही वेळेला आंदोलन करतांना पोलीस आणि धर्मद्रोही आस्‍थापने सापळा रचून समितीच्‍या कार्यकर्त्‍यांना अटक करणे, त्‍यांच्‍यावर कारवाई करणे, दंड आकारणे इत्‍यादी करतात. श्रीकृष्‍णाने मला एकदाही या दुष्‍ट चक्रात अडकू दिले नाही. माझ्‍याभोवती त्‍याच्‍या चैतन्‍याचे संरक्षककवच असल्‍यामुळेच मी वाचू शकलो.

२७ इ. राष्‍ट्रद्रोही आणि धर्मद्रोही कृत्‍ये थांबवतांना नोकरीतील व्‍यवस्‍थापकीय कामकाजाच्‍या अनुभवाचा लाभ होणे : या मोहिमा करत असतांना मला मी नोकरी केलेल्‍या ‘शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लि.’ या आस्‍थापनातील व्‍यवस्‍थापनाच्‍या अनुभवाचा लाभ झाला. ‘आस्‍थापनातील अधिकार्‍यांना कुठली भाषा प्रेरित करते ? त्‍यांना त्‍यांच्‍या राष्‍ट्रद्रोही आणि धर्मद्रोही कृत्‍यांच्‍या पापाचे परिणाम कसे भोगावे लागतील ? यातून त्‍यांची आर्थिक आणि प्रतिमेची हानी कशी होऊ शकते ?’, याची मी त्‍यांना कणखरपणे; पण आपुलकीने जाणीव करून देत असे. परिणामी ती आस्‍थापने आणि त्‍यांचे अधिकारी यांच्‍याशी माझे संबंध तणावपूर्ण आणि कटू न होता चांगले झाले.

२७ ई. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे कौतुकाचे बोल ! : ‘विडंबन कुठे केले आहे ?’ याविषयीची माहिती काढण्‍यापासून ते पूर्ण मोहीम राबवण्‍यापर्यंत मी त्‍यात कृतीशील सहभाग घेत असे. नंतर मी दैनिक ‘सनातन प्रभात’ला त्‍याची वार्ता आणि त्‍यातून शिकायला मिळालेली सूत्रे लिहून देत असे. हे सर्व परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना फार आवडायचे. ते म्‍हणायचे, ‘‘वटकर म्‍हणजे एकखांबी तंबू (वन मॅन आर्मी) आहेत.’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने माझ्‍याकडून अनेक प्रकारच्‍या सत्‍सेवा झाल्‍या. मी त्‍यांना प्रार्थना करून सत्‍सेवा करत असे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा संकल्‍प आणि सूक्ष्म अस्‍तित्‍व यांमुळे माझी सत्‍सेवा चांगली होऊन ती फलद्रूप होत असे. केवळ त्‍यांच्‍यामुळेच मला त्‍यात यश मिळत असे.

२७ उ. ‘श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या कृपेने धर्मप्रसाराचे कार्य करता येणे : या सेवांची व्‍याप्‍ती पहाता हे सर्व माझे शरीर, मन, बुद्धी आणि शक्‍ती यांच्‍या पलीकडचे होतेे.  श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या कृपेमुळेच माझ्‍याकडून १८ वर्षे हिंदु धर्मप्रसाराचे थोडेफार कार्य झालेे.

‘अध्‍यात्‍मप्रसार करतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍यातील ब्राह्मतेज आणि हिंदु जनजागृती समितीच्‍या मोहिमांतून क्षात्रतेज विकसित करून माझ्‍या जीवनाचे सार्थक केले आहे’, असे मला वाटते.

आई लहान बाळाला पाऊल टाकायला शिकवते. मूल तिच्‍या आधारानेच उभे राहून चालत असते, तरीही ‘मुलगा त्‍याच्‍या पायावर चालत आहे’, असे कौतुक ती इतरांकडे करते. तसेच हे आहे. परात्‍पर गुरु डॉक्‍टर माझ्‍या एका जन्‍मातील नाही, तर अनेक जन्‍मांतील गुरुमाऊली आहेत. त्‍यांच्‍या चरणी कोटीशः

कृतज्ञता.’

(क्रमशः)

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.५.२०२०)