राज्‍यात ‘कांदा महाबँक’ ही संकल्‍पना राबवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – राज्‍यात कांद्याची ‘महाबँक’ ही संकल्‍पना राबवण्‍यात येणार आहे. यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सुकाणू समिती निर्णय घेत आहे, अशी माहिती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ ऑगस्‍ट या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपमुख्‍यमंत्री अजित पवार हेही उपस्‍थित होते.

राज्‍यातील कांद्याच्‍या खरेदीवरून निर्माण झालेल्‍या प्रश्‍नांविषयी पत्रकार परिषद घेऊन मुख्‍यमंत्र्यांनी भूमिका घोषित केली. या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले, ‘‘याविषयी केंद्रीय वाणिज्‍य मंत्री पियुष गोयल, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍याशी चर्चा झाली आहे. राज्‍यात १३ ठिकाणी कृषक समृद्धी प्रकल्‍प उभारणार आहोत. या ठिकाणी रब्‍बी कांदा पिकासाठी १० लाख टन इतकी शास्‍त्रोक्‍त पद्धतीने साठवणूक क्षमता उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. यातून प्रत्‍यक्ष अणि अप्रत्‍यक्षरित्‍या ६० सहस्रांहून अधिक रोजगार निर्माण होईल. यामुळे कांद्याचा प्रश्‍न कायमस्‍वरूपी मार्गी लागेल. कांद्याच्‍या बाजारभावाची घसरण रोखण्‍यासाठी विविध शिफारशींवरही विचार आहे. यामध्‍ये काही तात्‍काळ, तर काही दीर्घकालीन उपाययोजना सुद्धा आहेत. कांदाप्रश्‍नी राज्‍यशासन शेतकर्‍यांच्‍या पाठीशी आहे. उपमुख्‍यमंत्री अजित पवार, तसेच पणन विभागाच्‍या वरिष्‍ठ अधिकार्‍यांसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन या प्रश्‍नी ठोस पावले उचलण्‍याचे निर्देश दिले. लासलगाव, मनमाड, आळेफाटा, तसेच नाशिक जिल्‍ह्यातील इतर ठिकाणीही नाफेडकडून कांदा खरेदी चालू करण्‍यात आली आहे.’’