१. विदेशातील महिलांना स्वतःच्या लहान मुलांविषयी काळजी न वाटणे आणि भारतीय महिलांचा मुलांविषयी असलेला वात्सल्यभाव
‘२३.५.२०२३ या दिवशी मी माझ्या मुलासह विदेशांत फिरायला गेले होते. प्रथम आम्ही स्वित्झर्लंड येथे गेलो होतो. तेथील झर्मेट या ठिकाणी आम्ही रात्री भोजनासाठी उपाहारगृहात गेलो होतो. त्या वेळी तेथे १२ स्त्री-पुरुषांचा एक गट मेजवानीसाठी आला होता. त्यातील एका महिलेच्या हातात ‘कॅरी कोट’ (प्रवासात लहान बाळांना घेऊन जाण्यासाठी असलेली बॅग) मध्ये एक तान्हे बाळ होते. आमच्या बाजूची दोन पटले जोडून त्या गटाला बसवले होते. त्या महिलेने तिच्या बाळाला आसंदीच्या पाठी असलेल्या ‘कॅरी कोट’मध्ये ठेवले होते. विदेशांत लहान बाळांना ठेवायला अशी व्यवस्था असते. मी बसलेल्या ठिकाणाहून मला ते बाळ आणि त्याची आई दिसत होती. त्या स्त्री-पुरुषांचा मेजवानीचा आरंभ मद्य घेऊन झाला. बाळाची आई मेजवानीत रंगून गेली होती. बाळ हात-पाय हलवत पाळण्यात खेळत होते. मी त्या महिलेचे निरीक्षण बराच वेळ करत होते. तिने एकदाही मागे वळून बाळाकडे पाहिले नाही. ते पाहून मला भारतातील बांधकाम करणार्या महिला कामगारांची आठवण झाली. दिवसभर काबाडकष्ट करतांना त्या महिलांचे लक्ष त्यांच्या बाळाकडे असते. बाळ जरा रडले, तरी महिला लगबगीने येऊन बाळाला शांत करते. मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील बाळासाठी बुरुज उतरून खाली जाणार्या असामान्य अशा हिरकणी बाईची आठवण आली.
२. विदेशात रज-तम यांचे प्रमाण अधिक असल्याने नामजप न होणे, ‘भारतात जन्म होेणे अन् सनातन संस्थेत असणे’, हे अहोभाग्य असणे
स्वित्झर्लंडमध्ये माझा नामजप थोडा होत होता. जर्मनी आणि पॅरिस येथे असतांना माझा नामजप पूर्णपणे थांबला. पॅरिसमध्ये रज-तम प्रचंड प्रमाणात जाणवले. मी एका ग्रंथात वाचले होते, ‘भारतात जन्माला येणे’, हे पाच भाग्यवंत लक्षणांपैकी एक आहे.’ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, ‘तुमच्या कृपेने माझा जन्म भारतात झाला आणि माझी योग्यता नसतांनाही मी सनातन संस्थेत आहे’, हे माझे मोठे भाग्य आहे.
३. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, ‘ऐहिक सुखसमृद्धी’ हा राष्ट्राच्या सभ्यतेचा मापदंड नसून राष्ट्र आध्यात्मिक दृष्टीने प्रगत होण्याला ‘सभ्यता’ असे म्हटले जाते.’ गुरुदेवा, तुमच्या कृपेने मी याची प्रचीती विदेश यात्रेत घेतली, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
‘भारतात जन्माला येऊन आणि सनातन संस्थेत साधना शिकूनही माझ्याकडून म्हणावे तसे साधनेचे प्रयत्न झाले नाहीत’, त्याबद्दल मी मनापासून क्षमायाचना करते. माझ्या आयुष्यात जे काही थोडे दिवस राहिले असतील, त्यात ‘हे गुरुदेवा, तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करून घ्या’, हीच तुमच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करते.’
– श्रीमती गीता प्रभु (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२३)