सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘एकदा एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दोन जिज्ञासूंनी व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न विचारले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रसंगी तेथे एक साधकही उपस्थित होता. सत्संगाच्या शेवटी तो साधक परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाला, ‘‘मी संपूर्ण सत्संगात आपल्या प्रत्यक्ष अस्तित्वाची अनुभूती घेत होतो. आता मी ती अनुभूती सांगू का ?’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्या साधकाला म्हणाले, ‘‘त्या आधी एक सांगा. सत्संगात काही प्रश्नोत्तरे झाली. ती तुम्ही ऐकलीत का ?’’ तेव्हा तो साधक म्हणाला, ‘‘नाही. माझे त्याकडे फारसे लक्ष नव्हते. मी आपल्या अस्तित्वाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत होतो.’’ हे ऐकून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘हे चुकीचे आहे; कारण सत्संगातील प्रश्नोत्तरांतील प्रत्येक वाक्य महत्त्वाचे होते. ‘जिज्ञासूंच्या विविध प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत ?’, हे शिकणे तुमच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे समाजात समष्टी साधना चांगली करता येते. माझ्या अस्तित्वाची अनुभूती तुम्ही अन्य वेळीही घेऊ शकला असता.’’
त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘साधकांनी भावजागृतीचे प्रयत्न कधी करावेत ? कोणत्या प्रसंगी शिकण्याला महत्त्व द्यावे ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी वरील प्रसंगातून शिकवले, तसेच ‘प्रत्येक प्रसंगानुरूप साधकाने तारतम्याने कसे वागायला हवे ?’, यांविषयीही मार्गदर्शन केले.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.