(व्हेगन डाएट म्हणजे प्राणिज अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग.)
‘अति सर्वत्र वर्ज्ययेत् ।’, अशी एक म्हण आहे. एखादी गोष्ट कितीही चांगली असली, तरी तिचा अतिरेक वाईटच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हेगन डाएट. वर्ष १९४४ इंग्लंडमध्ये ‘व्हेगन’ ही संकल्पना जन्माला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. वर्ष १९२० मध्ये गांधींनी ‘नैतिकतेच्या बळावर शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा’, असे भाषण इंग्लंड येथील ‘व्हेजिटेरियन सोसायटी’च्या समोर केल्यावर वॉटसन फारच प्रभावित झाले आणि शाकाहाराचा हा अतिरेक जन्माला आला. ‘व्हेगन डाएट म्हणजे प्राणिज अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग.’ ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, मध हे पदार्थही खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवतांना हिंसा होते, असा त्यांचा सिद्धांत.
१. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्याविषयी टीका करणे
यामुळे स्वाभाविकपणे वरील पदार्थांचे पर्याय शोधणे क्रमप्राप्त होते. मग दुधाला पर्याय म्हणून सोया, हेम्प (अंबाडी वनस्पती), कोकोनट (नारळ) आणि ‘अल्मन्ड मिल्क’ (बदामाचे दूध) चालू झाले, तर लोण्याचा पर्याय (तूप ही संकल्पनाच माहिती नसल्याने) म्हणून ‘व्हेगन मेयोनीज’ आले. चीज वा पनीरच्या जागी ‘टोफू’ आणि पोषक आहार म्हणून फळांचे रस पिणे चालू झाले. आज जगातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर त्याची भलामण करतांना दिसतात. जागोजागी ‘व्हेगन सोसायटी’ जन्माला आल्या आहेत. हे लोक केवळ आपल्या आहारापुरते एकत्र आलेले नसून दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणार्या शाकाहारी लोकांवर यथेच्छ घणाघात करत असतात. मांसाहाराविषयी तर बघायलाच नको !
२. दूध आणि तूप हे शरिराला पोषण देणारे !
‘दूध आणि तूप हे शरिराला पोषण देणारे सर्वोत्तम पदार्थ आहेत’, असे आयुर्वेद सांगतो. आमच्याकडे पूजेचा प्रसाद पंचामृत तीर्थाविना पूर्ण होत नाही. इथे भगवंताची पूजाही ‘गोपाल’ या नावाने केली जाते. गोशाळांच्या माध्यमातून दुग्ध संकलन केले जात असतांना वासरांवर कोणताही अन्याय अत्याचार होत नसून उलट त्यांचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला जातो, हे तथ्य आहे. मधावरील आक्षेप अंशतः मान्य. म्हणूनच तो केवळ आपद़्धर्म म्हणून ‘औषधापुरता’ वापरावा, हा पर्याय असू शकतो.
३. ‘व्हेगन’ समर्थकांचा दुटप्पीपणा !
सोयासारखी उत्पादने येण्यासाठी त्या परिसरातील प्राण्यांची जी हानी होते, त्याविषयी ‘व्हेगन’ समर्थक काहीच बोलत नाहीत, हा अजब दुटप्पीपणा आहे. याविषयी पुष्कळ माहिती सहज उपलब्ध होते, म्हणजेच ‘प्राणी हिंसा नाही’, हे पूर्ण सत्य नाही. किंबहुना इथे अधिकच प्राणी हिंसा आहे.
४. ‘व्हेगन डाएट’सारख्या प्रकारामागे धावणे चुकीचे !
आहारातून दूध तुपासारख्या शुक्रधातू आणि ओज वाढवणार्या पदार्थांना दूर सारून जे ‘व्हेगन’ पर्याय वापरले जातात, ते प्रामुख्याने कडधान्यांपासून बनलेले असतात. कडधान्ये ही फोडणीविना सतत वापरल्यास शुक्रधातू आणि ओज या दोहोंना घटवतात. यांच्यावरच स्वतःचे आरोग्य आणि आयुर्मान अवलंबून आहे, हे सगळ्यात महत्त्वाचे ! याखेरीज ‘व्हेगन’ आहारातून पोषणमूल्यांची पूर्तता होत नसल्याने त्यासाठी पूरक अन्नाचा सोपा मार्ग निवडून आत्मघात केला जातो. पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याच्या नादात ‘व्हेगन डाएट’ला आपल्या देशात सध्या प्रसिद्धी मिळू लागली आहे. याविषयी वेळीच सावध होणे आवश्यक आहे. ‘जिथे परमेश्वरालाही लाडाने ‘माखनचोर’ असे म्हटले जाते, त्याच्या हातावर आवर्जून लोण्याचा मऊसर गोळा देण्याची प्रथा आहे आणि आपल्या तान्ह्या बालकांनाही कौतुकाने दुधातुपाने अन् लोण्याने पोसले जाते’, अशा या हिंदुस्थानात ‘व्हेगन डाएट’सारख्या प्रकारामागे धावणे, म्हणजे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे. प्राणीप्रेम जरूर असावे; भूतदया महत्त्वाचीच; पण त्याचा हा मार्ग नव्हे, हे निश्चित !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.