चिपळूण – हिरवागार श्रावण आणि रिमझिम बरसणारा पाऊस, असा अनुभव देणारा ‘श्रावण’सरी कार्यक्रम ‘सह्याद्री’कुशीतील ‘तिवरे’ गावी निसर्ग अन् सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नुकताच पार पडला. जिल्ह्यातील पर्यावरण मंडळाच्या प्रतिनिधींनी ‘श्रावणसरी’ उपक्रमांतर्गत नुकतीच पूर्वसह्याद्री खोर्यातील तिवरे गावाला भेट दिली. गावातील ‘भेंदवाडी’ परिसरातील निसर्गरम्य वातावरणात पर्यावरणीय प्रबोधन विचारांचा जागर या वेळी करण्यात आला.
पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
उत्सव आणि उत्साह यांच्या श्रावणपर्वाला नुकताच प्रारंभ झाला आहे. श्रावण या शब्दाने मानवी मन हे संवेदना, भावना, अनुभव आदी अंगांनी प्रफुल्लित होते. या काळात निसर्गासमवेत आपणही मनोमन मोहरून उठतो आणि स्वतःला आपल्या संस्कृतीशी अन् श्रावणाशी बांधून घेत असतो. पावसाळा चालू झाला की, जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे निसर्गाचे रूप पालटते. ग्रीष्माने आलेले सुकेपण, रुक्षपण आणि निस्तेजता जाऊन आषाढातील पावसाच्या आगमनाने सृष्टी तरारते. श्रावण मासात ती हिरवागार शालू नेसल्यागत बहरते. याचा अनुभव, मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडीक, धीरज वाटेकर, मोहन पाटील, मायावती शिपटे आणि जिल्हाध्यक्ष सतिश मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून सहभागी झालेल्या ३० पर्यावरणप्रेमींनी घेतला.
‘जिद्दी’ पुजारे दांपत्याचा सत्कार
तिवरे भेंदवाडीत सौ. अंजली आणि अरुण पुजारे या दांपत्याने घर बांधून निसर्गाच्या सान्निध्यात उर्वरित आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या रहात्या आणि कृषी पर्यटनाचे स्वरूप दिलेल्या घराला २ जुलै २०१९ या दिवशी तिवरे धरणफुटीचा मोठा फटका बसला होता. तिवरे धरण फुटले, तेव्हा हे उभयता याच घरात वास्तव्याला होते. उदरनिर्वाहाच्या अपुर्या संधींसह कोकणात सध्या दरडी आणि तत्सम घटनांमुळे स्थलांतराचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर धरण फुटीसारखी घटना पचवून पुन्हा जिद्दीने त्याच ठिकाणी स्वत:च्या मनातील निसर्ग-कृषी संकुल उभारण्याचे पुजारे दांपत्याचे प्रयत्न अभिमानास्पद असल्याचे मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी सांगितले. या वेळी विलास महाडिक यांच्या हस्ते पुजारे दांपत्याचा सत्कार करण्यात आला.
या वेळी उत्कृष्ठ ट्रेकर असलेले ‘पुजारे’ म्हणाले, ‘‘वर्ष २०१९ मध्ये धरणफुटीची घटना घडल्यावर २०२० च्या नववर्षारंभी आम्ही पुन्हा इथे रहायला आलो. वर्ष २०२१ च्या महापुराचा फटका येथेही बसला होता. पूर्वीच्या तिवरे धरणाच्या ‘आउटलेट’समोर हे केंद्र आहे. त्या रात्री प्रारंभी साडेनऊच्या आसपास आवाज ऐकू आला. काही वेळाने बाहेर येऊन ‘टॉर्च’ मारून पाहिले, तेव्हा पाण्याचा वाढता प्रवाह दिसला. धरणाच्या दिशेने पाहिले, तेव्हा एका कोपर्यात एक बैल दिसला आणि काही कळायच्या आत तो गायबही झाला. तेव्हा मनात पाल चुकचुकली. पाणी वाढू लागले होते. दगडांचे आवाज येऊ लागले होते. काहीतरी गडबड होत असल्याची जाणीव झाली होती. फोन लावायचा प्रयत्न करत असतांनाच अर्धे घर कोसळले. मोठा कडकड आवाज झाला. घराला पाण्याचा वेढा पडलेला. वहात्या पाण्याचा वेगही वाढला होता. तासाभराने पाण्याचा वेग अल्प होऊन ते ओसरायला लागले.’’ पुजारे यांच्या तोंडून अनुभव ऐकतांना निसर्गप्रेमी स्तब्ध झाले होते.
‘श्रावणसरी’च्या निमित्ताने पर्यावरण जागर करूया ! – धीरज वाटेकर
निसर्गातील ‘श्रावण’सरी आठवून त्या निमित्ताने आपण सर्वांनी पर्यावरण जागर करूया. आषाढ संपून श्रावणमास चालू झाला की, पावसाचा जोर जरासा न्यून होऊन निसर्गावर त्याने केलेली हिरवी पोपटी जादू आपल्याला मोहित करते. श्रावणात निसर्गाचे सुंदर दर्शन होते. फुलांचा रंगोत्सव पहायला मिळतो. आपल्या पूर्वजांनी निसर्गाचे महत्त्व जाणून पर्यावरण, निसर्ग संरक्षण, मानवी स्वास्थ्य आणि आरोग्य यांचा सुरेख संगम साधला आहे. श्रावण आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवतो. आजच्या वेगवान आयुष्यात ‘श्रावणसरी’च्या निमित्ताने मनामनांत श्रावण बहरून पर्यावरण जागरण व्हायला हवे, असे आवाहन मंडळाचे राज्य सचिव-लेखक धीरज वाटेकर यांनी या वेळी केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष मुणगेकर यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांना वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – सचिव पोपट जगताप (खेड), उपाध्यक्ष विजय बसवंत (खेड), उपाध्यक्ष भारत जानकर (राजापूर), खजिनदार गणेश कुलकर्णी (गुहागर), कार्याध्यक्ष आकाराम महिंद (दापोली), सल्लागार सदस्य सुदेश कदम (गुहागर), लीला बिरादार (चिपळूण), मारुति भंडारे (खेड), प्रमुख संघटक नीलम मोहिते (चिपळूण), भरत पाटील (खेड), सहसचिव स्नेहल विचारे (चिपळूण), संदेश कोकाटे (चिपळूण), कार्यकारणी सदस्य तृषाली कदम, विनया देवरुखकर, राजेश इंगळे, सुरेंद्र खताते आणि मुग्धा बेलोसे.
सुजाता जांबोटकर यांनी काव्यवाचन केले. नवनियुक्त प्रतिनिधींनी स्वत:चे मनोगत व्यक्त केले. मोहन पाटील यांनी तालुका विज्ञान मंडळाला भविष्यात उपलब्ध होणार्या ‘विज्ञानभवन’ची माहिती दिली. या वेळी प्रा. सुरेश जांबोटकर, चिपळूण तालुक्यातील पहिल्या कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका नूतन महाडीक उपस्थित होत्या. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सतिश मुणगेकर, तर आभार मंडळाच्या चिपळूण अध्यक्ष आणि केंद्रप्रमुख शैलजा लांडे यांनी मानले.