‘लुना-२५’ यानाच्या अपयशामुळे रशियाचे शास्त्रज्ञ आजारी : रुग्णालयात भरती !

रशियाचे शास्त्रज्ञ मिखाईल मारोव

मॉस्को (रशिया) – रशियाने चंद्रावर पाठलेले ‘लुना-२५’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. ही घटना स्वीकारता न आल्याने रशियाचे ९० वर्षीय शास्त्रज्ञ मिखाईल मारोव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. ‘लुना २५’ अयशस्वी होणे, हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे माझ्या आरोग्यावर परिणाम झाला’, असे त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले. मारोव यांनी सोव्हिएत युनियनसाठी अंतराळ मोहिमांत काम केले आहे. रशियाची नुकतीच राबवण्यात आलेली ‘लुना २५’ ही मोहीम त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. ‘चंद्रावर आम्ही उपकरण उतरवू शकणे खेदजनक आहे. यामागील कारणांवर चर्चा करून त्यावर अभ्यास करून’, असेही मारोव यांनी सांगितले.

५० वर्षे चंद्र मोहीम न राबवल्याने आम्हाला अपयश ! – रशिया

रशियाची अंतराळ संशोधन संस्था ‘रोस्कोस्मोस’चे प्रमुख युरी बोरिसोव ‘लुना-२५’ यानाच्या अपयशाविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘चंद्रावर पोचण्याची आमची मोहीम कोणत्याही स्थितीत थांबवणार नाही. ‘लुना-२५’च्या अपयशामागील मुख्य कारण म्हणजे ‘ही मोहीम जवळपास ५० वर्षांनंतर चालू करण्यात आली’, हे आहे. वर्ष १९६० आणि वर्ष १९७० मध्ये आमच्या शास्त्रज्ञांच्या चुकांतून शिकलेला आम्ही इतक्या वर्षांत विसरलो आहोत. जर ५० वर्षे ही मोहीम थांबवली नसती, तर लुना यान चंद्रावर कोसळले नसते. आधीच्या अनुभवाचा आम्हाला लाभ घेता आला असता.’’