विनयशील, प्रेमळ आणि परिपूर्ण सेवा करणारे श्री. विनय कुमार (वय ३८ वर्षे)!

निज श्रावण शुक्‍ल षष्‍ठी (२२.८.२०२३) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करणारे श्री. विनय कुमार यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. विनय कुमार यांना ३८ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !

कु. सायली देशपांडे

१. ‘विनयदादा त्‍याच्‍या नावाप्रमाणेच विनयशील आणि नम्र आहे. साधकांशी बोलतांना त्‍याच्‍यातील भाव आणि आदर दिसून येतो.

२. दादा साधकांची प्रेमाने विचारपूस करतो. तो साधकांना साहाय्‍य करण्‍यासाठी नेहमी तत्‍पर असतो.

३. तो सर्व साधकांमध्‍ये सहजतेने मिसळतो. त्‍यामुळे साधकांशी त्‍याची लगेच मैत्री होते. ‘आश्रमात नवीन साधक आले आणि दादाशी त्‍यांची ओळख झाली नाही’, असे क्‍वचितच होते.

४. दादा प्रसंग, साधक, सेवा आणि संतसहवास यांतून शिकायला मिळालेली सूत्रे इतर साधकांना सांगतो. त्‍यामुळे साधकांना त्‍यातून शिकता येते.

५. तो भगवंताला अपेक्षित अशी सेवा करतो. सेवा परिपूर्ण होण्‍यासाठी त्‍याची धडपड असते.

६. उत्तम सेवा करत असूनही तो त्‍या सेवेचा कर्तेपणा स्‍वतःकडे घेत नाही. त्‍याच्‍या बोलण्‍यातही कधी अहं जाणवत नाही.

७. तो नेहमी साधनेविषयीच बोलतो.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्‍या अपार कृपेमुळेच अनेक गुण अंगी असणार्‍या विनयदादाकडून मला शिकण्‍याची संधी मिळाली’, याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. सायली देशपांडे (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१४.३.२०२३)