हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी
भाग ५
१. हिंदु आणि अन्य पंथीय यांच्या प्रार्थनेत जाणवणारे वेगळेपण !
हिंदु धर्मातील कोणतेही धर्मग्रंथ मग ते वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद़्गीता असो कि स्तोत्रे, प्रार्थना असोत, त्यात ईश्वराची प्रार्थना किंवा याचना करतांना जे दान मागितले आहे, ते विश्वातील सर्व मानवांसाठी, किंबहुना चराचराच्या कल्याणासाठीच आहे. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेले पसायदान हे विश्वात्मक देवाला, म्हणजे विश्वाच्या देवाला मागितले असून यात त्यांनी धर्म, पंथ, काळ यांचा विचार न करता सर्वांसाठी मागितले आहे. त्यांची प्रार्थना ही भेदाभेद दूर सारणारी आणि सर्वकालिक आहे. इतर पंथियांमध्ये मनाचा मोठेपणा दिसत नाही. त्यांनी जे काही मागितले असेल, ते केवळ स्वतःच्या पंथियांसाठीच असते. हेच अत्यंत महत्त्वाचे वेगळेपण हिंदु आणि अन्य पंथीय यांमध्ये आहे.
२. वेद आणि उपनिषदे काय सांगतात ?
२ अ. यजुर्वेदामध्ये एके ठिकाणी म्हटले आहे,
‘यद़् भद्रं तन्न आ सुव ॥ – ऋग्वेद, मण्डल ५, सूक्त ८२, ऋचा ५’
अर्थ : हे सवितृदेवा, तू आमची सर्व पापे हरण कर. प्रजा, पशू, गृह इत्यादी जे भद्र म्हणजे कल्याणकारी आहे, ते तू आम्हाला दे.
‘याम्मेधान्देवगणाः पितरश्चोपासते ।
तया मामद्य मेधयाग्ने मेधाविनङ्कुरु स्वाहा ।
– यजुर्वेद, अध्याय ३२, कण्डिका १४’
अर्थ : हे अग्नीदेवा, ज्या यथार्थ बुद्धीसाठी देवता आणि पितर उपासना करतात, त्या बुद्धीने मला आज मेधावी (बुद्धीमान) कर.
२ आ. ऋग्वेदातील एका ऋचेत म्हटले आहे,
‘समानो मन्त्रः समितिः समानी समानं मनः सह चित्तमेषाम् ।
समानं मन्त्रमभि मन्त्रये वः समानेन वो हविषा जुहोमि ॥
– ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १९१, ऋचा ३’
अर्थ : आपली प्रार्थना समान असावी. आपली संघटना ही समान मन आणि चित्ताने होवो. ईश्वर म्हणतो की, मी तुमच्या समान विचारांना समान उपदेशाने युक्त करत आहे, ज्यामुळे तुम्ही यज्ञातून समान पदार्थ प्राप्त कराल आणि मलाही प्रदान कराल.
२ इ. अथर्ववेदातील एका ऋचेत म्हटले आहे,
‘समानी प्रपा सह वोऽन्नभागः समाने योक्त्रे सह वो युनज्मि ।
सम्यञ्चोऽग्निं सपर्यतारा नाभिमिवाभितः ॥
– अथर्ववेद, काण्ड ३, सूक्त ३०, खण्ड ६’
अर्थ : तुमचे पिण्याचे पदार्थ (पाणी, दूध इत्यादी) समान असू दे. अन्न, भोजन आदी समान असू दे. मी तुम्हाला एकत्र एकाच कर्तव्याच्या बंधनात जोडत आहे. ज्याप्रमाणे चाकाच्या अक्षाला (आस) आरे जोडलेले असतात, त्याप्रमाणे तुम्ही यज्ञकुंडाच्या चारही बाजूंना परस्परांशी मिळून मिसळून रहा आणि परोपकारी, सदाचारी विद्वानांच्या नेतृत्वाखाली कार्य करा.
२ ई. बृहदारण्यक उपनिषदात ईश्वराला प्रार्थना करतांना आमचे पूर्वज असणारे ऋषि म्हणतात,
‘ॐ असतो मा सद़्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्माऽमृतं गमय । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।
– बृहदारण्यकोपनिषद़्, अध्याय १, ब्राह्मण ३, वाक्य २८’
अर्थ : हे ईश्वरा, मला असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमृतत्त्वाकडे घेऊन चल. सर्वत्र सदा शांती नांदो.
ही प्रार्थना आमच्या पूर्वजांनी केवळ हिंदूंसाठी केली का ? भारतात निर्माण झालेल्या धर्मांव्यतिरिक्त जगातील अन्य कोणत्या पंथात सर्व प्राणीमात्रांसाठी अशी प्रार्थना केली गेली आहे ?
२ उ. ऋग्वेदातील एका ऋचेत ऋषींनी प्रार्थना करतांना म्हटले आहे,
‘ॐ आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरितास उद्भिदः ।
देवा नो यथा सदमिद़् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे ॥
– ऋग्वेद, मण्डल १, सूक्त ८९, ऋचा १’
अर्थ : आमच्याकडे विश्वाच्या चारही दिशांनी कल्याणकारी विचार येत राहोत. त्यांच्यावर कोणताही अनुचित प्रभाव (दबाव) नसावा. त्यांच्या मार्गात कुणीही कोणतीही बाधा निर्माण करू नये. हे विचार अज्ञात विषय प्रकट करणारे असावेत. आमच्या प्रगतीला अवरोध उत्पन्न होऊ नये म्हणून आणि इतर संकटांपासून आमचे रक्षण करण्यास सिद्ध असलेल्या देवता प्रतिदिन आमच्या सर्वांगीण वृद्धीसाठी तत्पर असाव्यात.
३. उदारता आणि इतक्या श्रेष्ठ प्रतीचे तत्त्वज्ञान सांगणारा हिंदु धर्म !
हिंदूंनी जगातील सर्व प्राणीमात्र सृष्टीतील सर्व जीव यांच्या कल्याणासाठी सर्व देवीदेवतांकडे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांकडे, विश्वात्मक देवांकडे प्रार्थना अन् याचना केल्याची सहस्रो उदाहरणे भारतीय धर्मग्रंथ, स्तोत्रे, अभंग इत्यादींमधून मिळतात. हिंदु कधीच संकुचित आणि स्वार्थी विचारांचे नव्हते. अन्य कोणत्या अभारतीय पंथांत विचारांची एवढी उदारता आणि इतक्या श्रेष्ठ प्रतीचे तत्त्वज्ञान सांगितले आहे ?
४. भारतीय ग्रंथांचे अनुशीलन (अनुकरण) करा !
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘अनेकांच्या दृष्टीत भारतीय विचार, आचार, प्रथा, परंपरा, व्यवहार, तत्त्वज्ञान, साहित्य इत्यादी गोष्टी प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटतात; पण येथेच न थांबता त्यांनी नेटाने अध्ययन करून, मन लावून चिकाटीने भारतीय ग्रंथांचे अनुशीलन केल्यास त्यांच्यापैकी ९९ टक्के लोक भारतीय विचारांचे सौंदर्य आणि भाव यांमुळे मुग्ध होऊन गेल्याचे आढळून येईल.’’
५. भारतीय ग्रंथांचे प्रथम अवलोकन करा !
‘हिंदु आणि हिंदुत्व यांत भेद निर्माण करून समाजाला संभ्रमित करण्यापूर्वी किंवा त्यावर टीका करण्यापूर्वी मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता भारतीय ग्रंथांचे प्रथम अवलोकन करावे आणि मगच आपली जीभ उचलावी’, अशी टीका करणार्यांना माझी विनंती आहे.
६. सर्वसमावेशक असणारा हिंदु धर्म !
एका विचारवंतांनी म्हटले आहे, ‘‘हिंदु धर्म हा एक सर्वसमावेशक धर्म आहे की, ज्यात प्रपंच आणि परमार्थ, सृष्टी अन् परमेष्टी, श्रेयस आणि प्रेयस, प्रवृत्ती अन् निवृत्ती, विवेक आणि वैराग्य, शस्त्र अन् शास्त्र अशा मानवी जीवनाचा लौकिक आणि पारलौकिक अशा चहूअंगांनी विचार करून दोन्हींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.’’
७. हिंदु म्हणून जन्माला आल्यावर लाज वाटणार्यांची संख्या अधिक !
हिंदु धर्माचे सौंदर्य आणि उदारता, जितकी उलगडून दाखवावी, तितकी ती थोडीच आहे. हिंदु हे शरीर असेल, तर हिंदुत्व त्या शरिरावरील त्वचा आहे. दोन्हींमध्ये अभिन्नत्व आहे. राहुल गांधी म्हणतात, त्याप्रमाणे या देशात हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यात कोणताच संघर्ष नाही. जे खरे हिंदु असतात, ते हिंदुत्वनिष्ठ असतातच; पण काही हिंदू हे अपघाताने ‘हिंदु’ म्हणून जन्मलेले असतात. त्यांना ‘आपण हिंदु म्हणून जन्माला आलो’, याची लाज वाटते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना ‘आपण अपघाताने ‘हिंदु’ म्हणून जन्मलो’, याची लाज वाटत असे. ही खंत त्यांनी अनेकदा व्यक्तही केली होती. अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या तथाकथित हिंदूंची पुष्कळ मोठी संख्या भारतात आहे. या जन्महिंदूंना हिंदु आणि हिंदु धर्मावर असंबंद्ध (वाह्यात) टीका करण्यात धन्यता वाटते. भारतात संघर्ष आहे तो जन्महिंदु आणि कर्महिंदु यांच्यामध्ये !
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.