आरे वसाहतीच्‍या तलावातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होणार ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – आरे वसाहतीच्‍या तलावांमध्‍ये यावर्षी श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाला अनुमती मिळणार नाही, असे पत्र ‘आरे’च्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकार्‍यांनी मुंबई महानगरपालिकेस ‘वनशक्‍ती’ या संघटनेच्‍या आग्रहावरून पाठवले आहे. ‘हा निर्णय तात्‍काळ पालटावा’, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे पत्र पाठवून केली आहे. ‘कुठल्‍याही परिस्‍थितीत आरे वसाहतीच्‍या तलावातच यावर्षीही परंपरा कायम राखत सार्वजनिक आणि खासगी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होईल’, असे भातखळकर यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

कित्‍येक वर्षांपासून येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ‘वनशक्‍ती’ संघटना ही नेहमीच हिंदु समाज आणि विकास यांच्‍या प्रश्‍नांच्‍या विरोधात भूमिका घेते’, असा आरोपही आमदार भातखळकरांनी केला आहे. ‘ही बंदी तात्‍काळ उठवावी, अन्‍यथा आंदोलन करावे लागेल’, अशी चेतावणी त्‍यांनी दिली आहे.