जळगाव – शहरातील सुप्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध दुकानांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’ने) १७ ऑगस्ट या दिवशी धाडी टाकल्या होत्या. १८ ऑगस्ट म्हणजे सलग दुसर्या दिवशीही ‘ईडी’कडून पडताळणी चालू आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकित असलेल्या कर्जाच्यापोटी ‘ईडी’कडून चौकशी चालू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या २४ घंट्यांपासून ही कारवाई चालू आहे. ‘ईडी’च्या अधिकार्यांनी ज्वेलर्समधील सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन आणि आर्थिक व्यवहार कागदपत्रांची पडताळणी केल्याची माहिती आहे.
VIDEO | जळगाव आणि नाशिकच्या एकूण सहा कंपन्यांवर ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाची कारवाईhttps://t.co/YKjlxyscL8#rajmallakhichand #jalgaon #ed #incometax
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2023
राजमल लखीचंद समूहाच्या विविध आस्थापनांवर ‘ईडी’कडून एकाचवेळी ६ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. त्यात ६० अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. या घटनेत माजी आमदार मनीष जैन यांचीही चौकशी केल्याचे समोर येत आहे; मात्र माजी खासदार ईश्वर जैन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांची चौकशी करण्यात आलेली नाही. ‘ईडी’ने चौकशी चालू केल्यापासून राजमल लखीचंद गटामधील सर्वांचे भ्रमणभाष बंद करण्यात आले आहेत.
कोण आहेत ईश्वरलाल जैन आणि मनीष जैन ?
माजी खासदार ईश्वरलाल जैन हे ‘राजमल लखीचंद ज्वेलर्स ग्रुप’चे संचालक आहेत. ईश्वरलाल जैन हे राज्यसभेत वर्ष २००९ ते २०१४ पर्यंत खासदार होते. ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधल्या काळात खजिनदार होते, तसेच शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. मनीष जैन हे वर्ष २००९ ते २०१४ पर्यंत विधान परिषदेवर आमदार होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रीय सदस्य असून उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत.