नम्र, समाधानी आणि कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्‍साहन देणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) मिलिंद खरे (वय ६९ वर्षे) !

निज श्रावण शुक्‍ल द्वितीया (१८.८.२०२३) या दिवशी (कै.) मिलिंद खरे यांच्‍या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

 ७.८.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील मिलिंद खरे यांचे निधन झाले. १८.८.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या कुटुंबियांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) मिलिंद खरे

१. जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये 

१ अ. ‘माझे बाबा मिलिंद खरे यांचे रहाणीमान अतिशय साधे होते.

१ आ. नम्रता : त्‍यांचा स्‍वभाव अतिशय नम्र होता. ते कधीही कुणाशीही मोठ्या आवाजात बोलत नसत. अनेक वर्षे ट्रक आणि टँकर यांचा व्‍यवसाय करूनही त्‍यांच्‍या बोलण्‍यामध्‍ये अतिशय मृदुता होती.

१ इ. काटकसरीपणा आणि समाधानी वृत्ती : त्‍यांना ‘नवनवीन वस्‍तू घेणे, कपडे शिवणे, वस्‍तू खरेदी करणे किंवा फिरायला जाणे’, अशा कुठल्‍याच सवयी नव्‍हत्‍या. जे काही आहे, त्‍यामध्‍ये ते नेहमी समाधानी असायचे. बाबा त्‍यांच्‍याकडे असलेले कपडे वर्षानुवर्षे काळजीपूर्वक वापरायचे. त्‍यांनी आश्रमात पूर्णवेळ रहाण्‍यासाठी जाण्‍याचे ठरल्‍यावर मी त्‍यांना विचारले, ‘‘कपड्यांचे चार नवीन जोड शिवून घेऊया का ?’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘माझ्‍याकडे आधीचे कपडे आहेत ना !’’

१ ई. वाहनांची आवड असल्‍याने वाहनाविषयीचे वेगवेगळे व्‍यवसाय करणे आणि वाहन चालवण्‍याचे कौशल्‍य असणे : लहानपणापासूनच त्‍यांना वाहनांची पुष्‍कळ आवड होती. त्‍यामुळे त्‍यांनी वर्ष १९९० ते २०१५ या कालावधीत वाहनाविषयीचे वेगवगेळे व्‍यवसाय केले. माझ्‍या आजोबांची चारचाकी गाडी ते केवळ पाहूनच चालवायला शिकले होतेे. बाबांकडे जेव्‍हा ‘टँकर’ होता, तेव्‍हा तो घेऊन ते महाराष्‍ट्र, गुजरात इत्‍यादी अनेक राज्‍यांत जात असत. त्‍यांचे वाहन चालवण्‍याचे कौशल्‍य इतके चांगले होते की, गुरुदेवांच्‍याच कृपेमुळे इतक्‍या वर्षांत त्‍यांच्‍या वाहनाला कधीही कोणताही अपघात झाला नाही. यावरून ‘देवच पहिल्‍यापासूनच त्‍यांचे रक्षण करत होता’, असे माझ्‍या लक्षात आले.

१ उ. परिस्‍थितीशी जुळवून घेणे : ते अतिशय खडतर जीवन जगले. ट्रक आणि टँकर यांच्‍या व्‍यवसायाच्‍या निमित्ताने ते ८ – १५ दिवस घराबाहेर असत. त्‍या ठिकाणी असलेले पाणी आणि अन्‍नपदार्थ ग्रहण करण्‍याविषयी त्‍यांची कोणतीही तक्रार नसायची.

१ ऊ. निरपेक्षता : बाबांनी अनेकांना साहाय्‍य केले; परंतु ‘त्‍याची परतफेड व्‍हावी’, अशी त्‍यांची कधीच अपेक्षा नव्‍हती.

१ ए. एकदा व्‍यावहारिक अडचणींमुळे घरावर जप्‍ती येण्‍याचा प्रसंगही बाबांवर ओढवला होता; मात्र ते त्‍या प्रसंगाला न खचता धिराने सामोरे गेले.

१ ऐ. आजीचा साधनेला विरोध असणे, बाबांनी तिच्‍याकडे साक्षीभावाने पहाणे आणि त्‍यांच्‍या सहकार्यामुळेच साधना करू शकणे : आरंभी सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करण्‍यासाठी माझ्‍या आजीचा (बाबांची आई (कै.) श्रीमती कुमुदिनी बाळकृष्‍ण खरे यांचा) पुष्‍कळ विरोध होता. माझी आई वर्ष १९९९ ते वर्ष २०१३ या कालावधीत अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करायची. ‘आईने साधनेसाठी घराबाहेर जाऊ नये’, असे आजी बाबांकडे नेहमी बोलून दाखवायची; परंतु आजीच्‍या या बोलण्‍याकडे बाबा नेहमी साक्षीभावाने पहायचे. त्‍यांनी आजीला कधी उलट उत्तर दिले नाही आणि आईलाही कधी विरोध केला नाही. ‘बाबांच्‍या या सहकार्यामुळेच आम्‍ही (आई शोभा मिलिंद खरे, मी आणि माझी मोठी बहीण सौ. नम्रता नितीन कुलकर्णी) आजपर्यंत साधना करू शकलो आहोत’, याबद्दल त्‍यांच्‍याविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी, तितकी थोडीच आहे.

१ ओ. देवावर श्रद्धा असणे : बाबांची देवावर श्रद्धा होती. माझी आजी आणि बाबा श्री सत्‍यसाईबाबांचे भक्‍त होते. ‘प्रतिदिन अंघोळीनंतर देवघरातील देवांना आणि श्री सत्‍यसाईबाबांच्‍या छायाचित्राला नमस्‍कार करणे’, या कृतीमध्‍ये त्‍यांच्‍याकडून कधीच खंड पडला नाही. ते ही कृती अतिशय भावपूर्ण करत असत.

सौ. मानसी सहस्रबुद्धे

२. देवद आश्रमात आल्‍यापासून बाबांमध्‍ये जाणवलेले पालट

कोरोना महामारीच्‍या वेळी ते मिरज येथे घरीच रहात असत. तेव्‍हापासून ते नियमित ‘ऑनलाईन’ भक्‍तीसत्‍संग ऐकत असत. देवद आश्रमात आल्‍यावर त्‍यांनी एकही भक्‍तीसत्‍संग चुकवला नाही; उलट तेच आईला भक्‍तीसत्‍संगाच्‍या वेळेची आठवण करून देऊन भ्रमणभाषवर सत्‍संग लावण्‍यास सांगायचे.

३. ‘आश्रमात रहाण्‍याच्‍या कालावधीत बाबांनी जीवनातील साधनेचा महत्त्वपूर्ण टप्‍पा पार केला’, असे जाणवणे

पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी ते देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात २२ मास राहिले. ‘या २२ मासांमध्‍येे त्‍यांनी जीवनातील महत्त्वपूर्ण असा साधनेचा टप्‍पा पार केला’, असे आम्‍हा सर्वांना जाणवते. केवळ आणि केवळ गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच हे साध्‍य होऊ शकले.

बाबांची यापूर्वीच्‍या अनेक जन्‍मांची साधना असल्‍यामुळे ते आरंभीपासूनच आनंदावस्‍थेत होते. ‘त्‍यांचे जे काही देवाण-घेवाण हिशोब राहिले होते, ते त्‍यांनी या कालावधीमध्‍ये पूर्ण केले असून ते जीवनमुक्‍त झाले आहेत’, असे आम्‍हाला जाणवते.

हे गुरुमाऊली, आपल्या कृपेने मला असे बाबा लाभले, याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. ‘बाबांची आणि आम्हा सर्वांची पुढील साधना आपणच करून घ्यावी`, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.

– सौ. मानसी महेंद्र सहस्रबुद्धे ((कै.) मिलिंद खरे यांची मुलगी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.


त्‍यागी वृत्तीचे आणि शारीरिक त्रासातही आनंदी अन् सकारात्‍मक असणारे (कै.) मिलिंद खरे !

‘७.८.२०२३ या दिवशी मिलिंद खरे यांचे निधन झाले. त्‍यांची आणि माझी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील भोजनकक्षात मागील २ वर्षे जाता-येता भेट होत असे. माझे त्‍यांच्‍याशी मोजक्‍या शब्‍दांत बोलणे होत असे. त्‍यांच्‍या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्‍यांच्‍याविषयी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेेत.

पू. शिवाजी वटकर

१. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

१ अ. ‘मिलिंद खरे यांच्‍याकडे पाहून ‘ते रुग्‍णाईत आहेत’, असे मला वाटत नसे. ते रोगांनी ग्रस्‍त असूनही आनंदी आणि प्रसन्‍न दिसायचे.

१ आ. त्‍यांची विचारपूस केल्‍यावर ते आनंदाने १ – २ शब्‍दांत सकारात्‍मक बोलून चांगला प्रतिसाद द्यायचे.

१ इ. त्‍यागी वृत्ती : ते स्‍वतःचा ट्रक चालवून व्‍यवसाय करायचे. त्‍यांनी त्‍यांच्‍या कुटुंबातील सर्वांच्‍या साधनेला साहाय्‍य करून मोठा त्‍याग केला होता. त्‍यामुळे ते आनंदी होते. त्‍यांना पाहिल्‍यावर ‘त्‍यांची आंतरिक साधना चालू असून प्रगती होत आहे’, असे मला जाणवायचे.

१ ई. कृतज्ञताभाव : त्‍यांच्‍या चेहर्‍यावर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संत, साधक, त्‍यांचे कुटुंबीय आणि सनातनचा आश्रम यांच्‍याप्रती कृतज्ञताभाव जाणवायचा. यावरून ‘जो जो श्रद्धेने श्री गुरुचरणी स्‍थिरावला । तो तो परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी उद्धरियेला ॥’, असे मला वाटते.

२. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. ८.८.२०२३ या दिवशी पहाटे ५.३० वाजता मी (कै.) खरे यांच्‍या पार्थिवाचे दर्शन घेतले. तेव्‍हा तेथील खोलीत दाब न जाणवता चांगली स्‍पंदने जाणवली.

आ. ‘ते जिवंत असून गाढ झोपले आहेत’, असे मला जाणवले.

‘(कै.) मिलिंद खरे यांची आध्‍यात्मिक प्रगती होवो’, अशी प्रार्थना करून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.८.२०२३)


(कै.) मिलिंद खरे यांच्‍याविषयी त्‍यांच्‍या पत्नी श्रीमती शोभा मिलिंद खरे यांना जाणवलेली सूत्रे !

श्रीमती शोभा खरे

१. कुटुंबियांच्‍या साधनेला विरोध न करणे 

‘वर्ष १९९७ पासून मी सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला आणि माझ्‍या दोन्‍ही मुलींनीही पुढील १ – २ वर्षांत साधना चालू केली. माझे यजमान मिलिंद खरे यांनी आम्‍हाला साधना करण्‍यासाठी कोणताही विरोध केला नाही. ते स्‍वतः श्री सत्‍यसाईबाबांचे भक्‍त होते.

२. त्‍या कालावधीमध्‍ये काही व्‍यावसायिक अडचणी चालू होत्‍या. त्‍या अडचणी सोडवतांना ते स्‍थिर असत.

३. साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या अंकांचे गठ्ठे बांधण्‍याची सेवा करणे

वर्ष २००८ मध्‍ये त्‍यांना हृदयविकाराचा पहिला झटका येऊन गेल्‍यावर त्‍यांनी घरात बसून साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या अंकांचे गठ्ठे बांधण्‍याची सेवा चालू केली. त्‍यानंतर काही दिवसांनी ते स्‍वतः आगगाडी स्‍थानकावर जाऊन साप्‍ताहिकाचे गठ्ठे आणत आणि सूचीप्रमाणे विभागवार गठ्ठे बांधून सांगलीला नेऊन पोचवत असत. त्‍यांनी ही सेवा ७ वर्षे केली. त्‍यांची गुरुदेवांवर श्रद्धा होती. ते मनापासून सेवा करत असत.

४. साधारण २० वर्षांपूर्वी गुरुदेव मला म्‍हणाले होते, ‘‘तुम्‍ही साधना करता; पण श्री. खरे आनंदी दिसतात’’, म्‍हणजे ‘तेव्‍हापासून त्‍यांची आंतरिक साधना चालू होती’, असे मला वाटते.

‘माझ्‍या वैवाहिक जीवनात गुरुदेवांच्‍या कृपेने मला साधनेसाठी पूरक जोडीदार लाभला’, याबद्दल मी गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘यजमानांचा पुढील साधनाप्रवास असाच चालू राहो’, अशी मी गुरुमाऊलीच्‍या चरणी प्रार्थना करते.’

– श्रीमती शोभा मिलिंद खरे ((कै.) मिलिंद खरे यांच्‍या पत्नी, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.८.२०२३)


(कै.) मिलिंद खरे (वय ६९ वर्षे) यांच्‍या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

(कै.) मिलिंद खरे यांच्‍याविषयी त्‍यांचे जावई श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. महेंद्र सहस्रबुद्धे

 १. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

अ. ‘१.८.२०२३ या दिवसापासून मिलिंद खरे (बाबा) यांना थकवा येऊ लागला. त्‍यांना स्‍वतःच्‍या दैनंदिन कृती करणेही कठीण होऊ लागले.

आ. ६.८.२०२३ या दिवशी त्‍यांना तपासणीसाठी रुग्‍णालयात घेऊन जाण्‍याचे ठरले. त्‍याप्रमाणे आम्‍ही त्‍यांना रुग्‍णालयात घेऊन गेलो.

१ अ. रुग्‍णालयात भरती केल्‍यावर जाणवलेली सूत्रे 

१. बाबांना अतीदक्षता विभागात भरती केल्‍यावर देवद आश्रमातील सनातनच्‍या ६९ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार आणि सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी नामजपादी उपाय सांगितले. त्‍याप्रमाणे संत आणि साधक बाबांसाठी उपाय करत होते.

२. त्‍यांच्‍या पत्नीने (शोभा यांनी) त्‍यांना नामजपाविषयी विचारल्‍यावर त्‍यांनी ‘माझा ‘ॐ’ हा नामजप चालू आहे’, असे सांगितले.

३. ‘रक्‍त पातळ होण्‍यासाठी ‘इंजेक्‍शन’ दिल्‍यानंतर पुष्‍कळ वेदना होऊ शकतात’, असे आधुनिक वैद्यांनी आम्‍हाला सांगितले होते. त्‍याप्रमाणे ते ‘इंजेक्‍शन’ दिल्‍यामुळे बाबांना वेदना होत होत्‍या; पण ‘ते त्‍या वेदना सहन करत होते’, असे मला जाणवले. त्‍या वेदनांमुळे त्‍यांच्‍या चेहर्‍यावरील स्‍थिरभाव उणावला नव्‍हता, तसेच त्‍यांच्‍या चेहर्‍यावर कोणताही ताण दिसत नव्‍हता. ते कोणतीही आडकाठी न आणता आधुनिक वैद्यांचे उपचार स्‍वतःवर करून घेत होते.

२. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. ७.८.२०२३ या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता बाबांचे निधन झाल्‍याचे आधुनिक वैद्यांनी आम्‍हाला सांगितले आणि त्‍यांचे अंतिम दर्शन घ्‍यायला बोलावले. त्‍या वेळी त्‍यांचे डोळे अर्धवट मिटलेल्‍या स्‍थितीत होते. त्‍यांचा चेहरा प्रसन्‍न, शांत आणि निरागस वाटत होता.

आ. इतर वेळी एखाद्या रुग्‍णाचे निधन झाल्‍यानंतर तेथील वातावरणात रज-तमामुळे दाब निर्माण होतो; परंतु बाबांकडे पहातांना आम्‍हाला कोणताच दाब जाणवला नाही.

३. देवाची अनुभवलेली कृपा !

अ. बाबांचे निधन रविवारी झाले. त्‍या दिवशी रुग्‍णालयात अन्‍य रुग्‍णांची विशेष गर्दी नव्‍हती. त्‍यामुळे आम्‍हाला बाबांच्‍या निधनानंतरची पुढील सर्व प्रक्रिया व्‍यवस्‍थित समजून घेता आली.

आ. त्‍यांचे पार्थिव ताब्‍यात मिळण्‍यात कोणतीही अडचण आली नाही, तसेच अंत्‍यविधीच्‍या पूर्वसिद्धतेपासून अंत्‍यविधी पूर्ण होईपर्यंतच्‍या सर्व कृती ठरवलेल्‍या वेळेत अन् विनाअडथळा सहजतेने पूर्ण झाल्‍या.

उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्‍वीकारणारे (कै.) मिलिंद खरे !

१. स्‍वीकारण्‍याची वृत्ती

अ. ‘बाबांनी वयाच्‍या ६५ व्‍या वर्षापर्यंत वाहनांच्‍या संदर्भातील व्‍यवसाय केल्‍यामुळे त्‍यांना वाहनांविषयी विशेष माहिती, अनुभव आणि आकर्षण होते. त्‍यामुळे देवद आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी आल्‍यानंतरही ‘आपण एखादे चारचाकी वाहन घेऊया’, असा त्‍यांचा विचार होता. त्‍यांनी मला वाहन शोधण्‍यास सांगितले होते. त्‍या वेळी मी त्‍यांना समजावले, ‘‘आश्रमात पुरेशी चारचाकी वाहने आहेत. ती आपलीच वाहने आहेत. आपल्‍याला आवश्‍यकता लागेल, तेव्‍हा ती उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे चारचाकी वाहन घेण्‍यात अनावश्‍यक व्‍यय करू नये.’’ तेव्‍हा त्‍यांनी ते मनापासून स्‍वीकारले. त्‍यानंतर त्‍यांनी कधीही वाहनाच्‍या खरेदीविषयी विचारले नाही.

आ. आरंभी त्‍यांना मिरज येथील रहात्‍या घराची विक्री करण्‍याचे सूत्र स्‍वीकारणे अवघड जात होतेे; परंतु त्‍यांनी ते कधीही व्‍यक्‍त केले नाही. त्‍यानंतर त्‍यांनी मिरजेतील अन्‍य साधकांच्‍या समवेत अन्‍यत्र जागा घेऊन रहायला जायचे ठरवले; परंतु त्‍यांना हृदयविकाराचा दुसरा झटका आल्‍याने त्‍यांनी तेथे जाणे रहित केले. आमचे सांगणे मान्‍य करून त्‍यांनी देवद आश्रमात येण्‍याची सिद्धता दर्शवली.

इ. घरासंबंधी सर्व व्‍यवहार पूर्ण झाल्‍यावर देवद आश्रमात काही मासांसाठी येण्‍याचे ठरल्‍यावर त्‍यांनी ते सहजपणे स्‍वीकारले आणि त्‍याप्रमाणे त्‍यांनी आश्रमजीवनास आरंभ केला.

२. बाबा मितभाषी होते. ते अनावश्‍यक बोलण्‍यात वेळ न दवडता सेवा करत असत. त्‍यामुळे ‘त्‍यांचा स्‍वभाव साधनेसाठी पूरक आहे’, असे सनातनच्‍या ६९ व्‍या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी म्‍हटले होते.

३. एकाग्रतेने सेवा करून तिच्‍यातील बारकावे शिकणे

हळूहळू आश्रमजीवनाशी समरस होऊन त्‍यांनी आश्रमातील सेवा करण्‍यास प्रारंभ केला. त्‍यांनी ‘दिलेल्‍या वेळेत सेवेला जाणे, मिळालेली सेवा मन लावून आणि एकाग्रतेने करणे अन् सेवेतील बारकावे शिकणे’ इत्‍यादी प्रयत्न चालू केले.

४. जाणवलेला पालट

‘मागील २ – ३ मासांत त्‍यांचा आंतरिक भाव वाढून त्‍यांच्‍या चेहर्‍यावरील निरागसभाव आणि आनंद यांचे प्रमाण वाढले होते’, असे मला जाणवले.’

– श्री. महेंद्र सहस्रबुद्धे ((कै.) मिलिंद खरे यांचे जावई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.८.२०२३)