विदेशात हिंदुत्‍वाचा जयघोष !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि मोरारी बापू 

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केंब्रिज विद्यापिठात कथावाचक मोरारी बापू यांच्‍या रामकथेच्‍या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्‍या कार्यक्रमात त्‍यांनी भाषणाचा प्रारंभ ‘जय सीयाराम’ असा जयघोष करून केला आणि सांगितले, ‘येथे मी ब्रिटनचा पंतप्रधान म्‍हणून आलो नसून एक हिंदु म्‍हणून सहभागी झालो आहे. मला मी ब्रिटीश असण्‍यासह हिंदु असण्‍याचाही अभिमान आहे. माझे कुटुंबीय हवन, पूजा आणि आरती करतात. मी रामायण, भगवद़्‍गीता आणि हनुमान चालिसा वाचतो. एक सोन्‍याची श्री गणेशमूर्ती माझ्‍या कार्यालयातील पटलावर असते. श्री गणेश मला कोणतीही कृती करण्‍यापूर्वी ऐकण्‍याची आणि चिंतन करण्‍याची शिकवण देतो.’ ऋषी सुनक यांच्‍या प्रमाणे भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी उघडपणे असे सांगतात ? किती लोकप्रतिनिधी हिंदु असल्‍याचा अभिमान बाळगतात ? याउलट अन्‍य धर्मीय लोकप्रतिनिधी मात्र उघडपणे त्‍यांच्‍या श्रद्धांविषयी बोलतात, त्‍यांना आलेले अनुभव सांगतात. त्‍यांना मिळालेले पद, प्रतिष्‍ठा ही त्‍यांच्‍या धर्मश्रद्धा जपण्‍यामुळेच मिळाली असल्‍याचेही सांगतात.

भगवान श्रीराम प्रेरणास्रोत

श्रीराम

सुनक यांचे पूर्वज भारतातून आफ्रिकेत स्‍थलांतरित झाले. भारतापासून दूर देशात गेल्‍यावरही ते स्‍वत:ची हिंदु मूल्‍ये विसरले नाहीत. ऋषी सुनक सांगतात, ‘मी ब्रिटनमध्‍ये ‘चॅन्‍सेलर’ असल्‍यापासून दिवाळी आणि अन्‍य सण साजरे करत आहे.’ कथावाचक मोरारी बापू यांना उद्देशून ते म्‍हणाले की, आपण आमच्‍या पिढीला ज्ञान देण्‍यासाठी प्रयत्नशील आहात. या हिंदु मूल्‍यांमुळे मी आणि माझ्‍यासारखे अन्‍य टिकून आहेत. आता माझ्‍या पिढीवर या उपकारांची परतफेड करण्‍याचे दायित्‍व आहे. माझ्‍यासाठी भगवान श्रीराम प्रेरणेचे स्रोत आहेत. आयुष्‍यातील अडचणींवर मात करण्‍यासाठी, मानवतेने राज्‍य करण्‍यासाठी, नि:स्‍वार्थीपणे काम करण्‍यासाठी ते आदर्श आहेत. आपल्‍या ग्रंथांत दिल्‍याप्रमाणे मी नेतृत्‍व करण्‍याचा प्रयत्न करत आहे. हिंदु संस्‍कृती, सभ्‍यता आणि मूल्‍ये यांविषयी एवढ्या ठामपणे मांडण्‍याचा प्रयत्न आपल्‍याकडील एकाही नेत्‍याने का केला नाही ? याचे चिंतन होणे आवश्‍यक आहे.

निधर्मी भारतीय

ब्रिटनने विविधतेने नटलेल्‍या, बहुभाषा, कला, प्रांत, संस्‍कृती असलेल्‍या अखंड भारत देशावर राज्‍य केले. तेव्‍हा इंग्रजांना येथील हिंदु संस्‍कृतीचे आणि गुरुकुल शिक्षणपद्धतीचे राज्‍यविस्‍तारात अन् राज्‍य टिकवून ठेवण्‍यात मोठा अडथळा वाटला. त्‍यामुळे इंग्रजांनी नियोजनपूर्वक हिंदु संस्‍कृतीचे ज्ञान देणारी ही गुरुकुले भारतातून टप्‍प्‍याटप्‍प्‍याने बंद पाडली आणि भारतियांची त्‍यांच्‍या संस्‍कृतीशी असलेली नाळच कापून टाकली. हिंदु सभ्‍यता, मूल्‍ये विसरलेल्‍या भारतियांनी इंग्रजांना जशी अपेक्षित तशी वाटचाल नंतर केली आणि सांस्‍कृतिकदृष्‍ट्या वैचारिक धर्मांतर करून ‘निधर्मी’ हे बिरुद स्‍वत:पुढे अभिमानाने लावले. भारतात आज लाखो सामान्‍य हिंदू आपल्‍या धर्मानुसार त्‍यांना जमेल तसे आचरण करतात, सण साजरे करतात; मात्र धर्माला राजाश्रयच नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तर ‘मी अपघाताने हिंदु आहे’, असे म्‍हटले होते. त्‍यांनी आणि त्‍यानंतरच्‍या काँग्रेसी शासनकर्त्‍यांनी हिंदूबहुल भारतावर निश्‍चितच मोगलांप्रमाणे राज्‍य केले आहे, हे हिंदूंच्‍या अवनतीवरून लक्षात येते. ‘हिंदु’ शब्‍द जाहीरपणे म्‍हणणे गुन्‍हा असल्‍याप्रमाणे वातावरण काँग्रेसने भारतात निर्माण केले. त्‍याचा प्रभाव अनेक नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्‍यावर अद्यापही आहे. भारतात काँग्रेसची सत्ता जाऊन राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे शासन सत्तेवर आले. तेव्‍हा एका वृत्तपत्राने बातमी दिली की, रालोआच्‍या एका मंत्र्याने एका भाषणात सांगितले की, ८०० वर्षांनंतर हिंदु शासक सत्तेवर आला. हा विषय लोकसभेत आल्‍यावर संबंधित मंत्र्याने सांगितले, ‘मी असे कोणतेही विधान केलेले नाही. कुणी माझ्‍यावर असा आरोप केल्‍यास मी काम करू शकणार नाही.’ असे विधान तत्‍कालीन मंत्र्याने केले नसेलही; मात्र ते पटवून देण्‍यासाठी अशी टोकाची भूमिका घेण्‍याची आवश्‍यकता होती का ? बहुसंख्‍य हिंदूंना त्‍यांच्‍या देशात हिंदु धर्माचा अभिमान बाळगणारा, त्‍याचा सन्‍मान जपणारा कुणी शासनकर्ता मिळत असल्‍यास त्‍याचा आनंदच आहे; मात्र येथे गंमत अशी की, बहुतांश राजकारणी मात्र स्‍वत:ला सार्वजनिकरित्‍या हिंदु म्‍हणवून घेण्‍यास सिद्ध नाहीत. स्‍वतःला ‘निधर्मी’ म्‍हणवणारे, हिंदु म्‍हणण्‍याची लाज बाळगणारे, हिंदु धर्मावर टीकाटिप्‍पणी करणारे, हिंदूंना ‘मागास’ म्‍हणणारे बहुतांश हिंदु लोकप्रतिनिधी धार्मिक विधी, सण-उत्‍सव, व्रते साजरी करतात, हेही तितकेच खरे. या लोकप्रतिनिधींना साधूसंतांचा आशीर्वाद हवा असतो, हिंदूंची मते, हिंदूंचा पाठिंबा हवा असतो; मात्र हिंदु म्‍हणवून घ्‍यायचे नसते वा त्‍यांच्‍या समोर कुणी हिंदुत्‍वाचा अभिमान बाळगलेलाही त्‍यांना नको असतो. जेव्‍हा कुणी हिंदुत्‍वाविषयी चांगली मते प्रकट करतात, त्‍यांना हेच लोक ‘धर्मांध’ म्‍हणून हेटाळणी करतात. हे लोक जेव्‍हा परदेशात जातात, तेव्‍हा भारत आणि स्‍वत: ‘सेक्‍युलर’ असल्‍याचे सांगण्‍यात मोठेपणा वाटतो. हिंदु धर्माविषयी विनोद केले जातात, थट्टा केली जाते आणि चारचौघांत तो मस्‍करीचा विषय ठरतो. हिंदु धर्माचा विज्ञापने, टीव्‍हीवरील मालिका, चित्रपट, साहित्‍य, कविता, चर्चासत्रे यांच्‍या माध्‍यमातून अवमान केला जातो आणि मुख्‍य म्‍हणजे ‘हा अवमान रोखला पाहिजे’, असे काही मोजके हिंदु सोडले, तर इतरांना वाटत नाही. ‘हिंदु धर्म हा आपल्‍या जीवनाचे अविभाज्‍य अंग आहे, धर्माने समाज, राष्‍ट्र व्‍यापले आहे’, याचे ज्ञान करून घेणे कुणाला आवश्‍यक वाटत नाही. ऋषी सुनक म्‍हणतात की, पंतप्रधानाचे काम, हे कठीण काम आहे. अनेक कठीण निर्णय तुम्‍हाला घ्‍यावे लागतात, तेव्‍हा धर्म, धर्मग्रंथ बळ देतात, धैर्य निर्माण करतात, प्रेरणा देतात. ब्रिटनच्‍या पंतप्रधानांना हिंदु धर्माचे पटलेले हे महत्त्व निधर्मी भारतियांना केव्‍हा पटणार आहे ? भारतातील हिंदु लोकप्रतिनिधी आणि सामान्‍य हिंदू हे  स्‍वधर्माचा अभिमान उघडपणे व्‍यक्‍त करतील, तो सुदिन !

ब्रिटनच्‍या पंतप्रधानांना कळलेले हिंदु धर्माचे महत्त्व भारतीय राजकारणी आणि हिंदू यांना केव्‍हा उमगणार ?