समुपदेशकांचे महत्त्व न समजलेले असंवेदनशील प्रशासन काय कामाचे ?
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, समस्यांचा परिणाम, ताण त्यांच्या मानसिकतेवर होत असतो. त्यामुळे एखादा विद्यार्थी असा का वागतो ? हे जाणून घेणे आवश्यक असते. त्यासाठी येथील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर असलेला ताणतणाव अल्प करण्यासाठी लवकरच सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष चालू झाल्यानंतर समुपदेशक नेमण्यात येईल, असा निर्णय एप्रिलमध्ये घेण्यात आला होता; मात्र शैक्षणिक वर्ष चालू होऊन २ मास लोटूनही अद्याप शाळांमध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. (एवढा कालावधी का गेला ? याचा अभ्यास होऊन त्यावर उपाययोजना काढणे आवश्यक ! – संपादक)
शिक्षण विभागाकडून ३२ मानसोपचार समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे. महापालिकेच्या १०५ प्राथमिक शाळांमध्ये ४० सहस्र, तर १८ माध्यमिक विद्यालयांत ८ सहस्रांवर विद्यार्थीसंख्या आहे. या शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांच्या घरच्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत त्यांना मानसशास्त्रीय समुपदेशनाचा लाभ देण्याच्या उद्देशाने आरंभीला महापालिकेच्या १०५ शाळांमध्ये हा प्रकल्प चालू करण्यात येणार आहे.