कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !  

कोल्हापूर – कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत १६ ऑगस्टच्या सकाळी नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे तिन्ही जिल्ह्यांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सातारा जिल्ह्यातील पाटण जवळच्या गावांत ग्रामस्थांना भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ यांच्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा भूमीपासून ५ किलोमीटर खाली होता.

कोल्हापूरात ३.४ रिक्टर स्केल (भूकंप मोजण्याचे परिमाण) भूकंपाचा धक्का नागरिकांना जाणवला. हा भूकंपाचा धक्का सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी जाणवला. या भूकंपाचाही केंद्रबिंदू भूमीपासून ५ किलोमीटर खाली असल्याची माहिती देण्यात आली आहे, तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरातही भूकंपाचा धक्का जाणवला. चांदोली अभयारण्यापासून १५ किलोमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.