अतिक्रमण हटवण्याच्या रेल्वे विभागाच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने आणली स्थगिती !

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या जवळ केले होते अतिक्रमण  

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मागच्या बाजूला रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासन बुलडोझर फिरवून ते पाडत होते. या कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याकूब शाह नावाच्या व्यक्तीने याचिका प्रविष्ट करून त्यावर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्याने आरोप केला की, या भागात १०० पेक्षा अधिक घरांना पाडण्यात आले आहे. आता केवळ ८० घरे शिल्लक आहेत.

९ ऑगस्ट या दिवशी ही कारवाई मथुरेतील ‘नवीन बस्ती’ या भागापासून चालू करण्यात आली होती. रेल्वे विभागाने यास अतिक्रमण असल्याचे घोषित केले होते. त्या क्षेत्रातून मथुरा ते वृंदावन येथपर्यंतच्या २१ किमीच्या ‘नॅरो गेज’ला ‘ब्रॉड गेज’ बनवण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. याचिकाकर्ता याकूबने सांगितले की, सध्या राज्यात अधिवक्ते संपावर असल्याने राज्यातील न्यायालयांत हा विषय प्रविष्ट करता आला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आम्हाला धाव घ्यावी लागली.