जन्मठेपेची शिक्षा झालेल्या मुसलमानांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

गोध्रा हत्याकांड प्रकरण

नवी देहली – २७ फेब्रुवारी २००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसचे डबे जाळल्याच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शौकत युसूफ, बिलाल अब्दुल्ला आणि सिद्दीकी यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळला. साबरमती एक्सप्रेसचे डबे जाळल्यानंतर गुजरातमध्ये ठिकठिकाणी दंगली उसळल्या होत्या.

२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी मुसलमान जमावाने अयोध्येहून येणार्‍या साबरमती एक्सप्रेसचा डबा ज्वलनशील पदार्थ टाकून जाळला होता. कारसेवकांनी भरलेल्या या डब्यात लहान मुले आणि महिला यांसह ५९ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोपींना विशेष न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. यानंतर दोषींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका योग्य खंडपिठासमोर ठेवण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. २१ एप्रिल २०२३ या दिवशक्ष सर्वोच्च न्यायालयाने याच प्रकरणात जन्मठेपेचे शिक्षा झालेल्या ८ दोषींना जामीन संमत केला होता.