सर्व वस्‍तू आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी अपार भाव असलेली ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची फोंडा (गोवा) येथील कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) !

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा करते. तिथे प्रतिदिन २ – ३ घंटे ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर येते आणि तिला जमेल तसे मला सेवेत साहाय्‍य करते. तिच्‍याशी बोलतांना मला तिच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि तिची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

१. विचारून सेवा करणे आणि शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असणे

कु. श्रिया राजंदेकर

‘कु. श्रिया प्रसाद भांडारात आल्‍यावर कधी मी तिला एखादी सेवा सांगितली, तर ती शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहून ‘ती सेवा कशी करायची ?’, ते विचारून आणि समजून घेते. तिला सेवा करतांना काही अडचण आल्‍यावरही ती मला विचारून घेते आणि त्‍याप्रमाणे सेवा करण्‍याचा प्रयत्न करते.

२. प्रेमभाव

अ. प्रसाद भांडारात सेवा करायला एक वयस्‍कर साधक येतात. काही वेळा त्‍यांना बरे नसते. त्‍यामुळे ते सेवेसाठी येऊ शकत नाहीत. तेव्‍हा श्रिया त्‍यांची विचारपूस करते आणि ‘त्‍यांनी विश्रांती घ्‍यायला हवी’, असे म्‍हणते.

आ. एके दिवशी मला ताप येऊन उलट्या झाल्‍या. त्‍यामुळे थकवा येऊन मी सेवेला येऊ शकत नव्‍हते; म्‍हणून मी श्रियाला खाऊसंदर्भात थोडीशी सेवा करण्‍याविषयी विचारले. तेव्‍हा ती मला म्‍हणाली, ‘‘मी सर्वकाही पाहीन. तू तुझी काळजी घे. वेळेवर औषधे घे आणि देवाविषयी कृतज्ञ रहा.’’

सौ. वर्धिनी गोरल

३. साधिकेला आध्‍यात्मिक स्‍तरावर साहाय्‍य करणे

मी रुग्‍णाईत असतांना श्रियाने मला लघुसंदेश पाठवला, ‘ताई, तू गुरुदेवांना (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) अनुभव. ‘गुरुदेवांनी तुला व्‍यष्‍टी साधना आणि अनुसंधान यांसाठी वेळ दिला आहे’, असा भाव ठेव. गुरुदेव तुझ्‍या समवेत आहेत. आता तू कसलाही विचार करू नकोस. केवळ गुरुदेवांचे स्‍मरण कर.’ त्‍याप्रमाणे मी नामजपादी उपाय आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे स्‍मरण करण्‍याचा प्रयत्न केला. त्‍यामुळे मला दुसर्‍याच दिवशी बरे वाटून सेवेला येता आले.

४. प्रसाद भांडारातील प्रत्‍येक वस्‍तूला ‘कृतज्ञभावात रहा’, असे सांगणारी श्रिया !

श्रिया प्रसाद भांडारातील प्रत्‍येक वस्‍तूशी बोलते. ती प्रत्‍येक खाऊ, पिशवी किंवा खोका यांना सांगते, ‘तुम्‍ही किती भाग्‍यवान आहात ! तुम्‍हाला देवाची सेवा करण्‍याची संधी मिळाली आहे. तुम्‍ही कृतज्ञताभावात रहा.’ तिचे हे बोलणे ऐकून मलाही प्रत्‍येक वस्‍तूप्रती भाव ठेवण्‍यास साहाय्‍य होते.

५. गुरुदेवांकडून साधकांना प्रसाद पाठवतांना तिच्‍या मनात ‘त्‍या साधकाला या प्रसादाचा लाभ होऊ दे आणि त्‍यातून चैतन्‍य मिळू दे’, असा भाव असतो.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला अशा दैवी बालसाधिकेचा सहवास लाभत आहे. ‘तिच्‍यातील गुण माझ्‍यातही येऊ देत’, अशी भगवंताच्‍या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. वर्धिनी वासुदेव गोरल (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय २७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१५.५.२०२३)