१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘ब्रह्मोत्सव’ विशेषांकाचा दुसरा भाग १४.५.२०२३ या दिवशी काढायचे ठरणे
‘वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एप्रिल महिन्यापासून ‘दैनिक सनातन प्रभात’चे विशेषांक प्रकाशित केले जाणार होते. त्याच कालावधीत ११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रकाशित होणार्या ‘ब्रह्मोत्सव’ विशेषांकासाठी विज्ञापने मिळाली होती. त्यानंतर अचानक १४.५.२०२३ या दिवशी ‘ब्रह्मोत्सव’ विशेषांकाचा दुसरा भाग काढायचे ठरले. तेव्हा अल्प कालावधीत त्या दिवशीचा विशेषांक छापण्यासाठी आवश्यक रकमेची विज्ञापने मिळवायची होती. हे शक्य न झाल्यास विशेषांक रहित करावा लागला असता किंवा तो कृष्णधवल छापावा लागला असता. (विशेषांक शक्यतो रंगीत असतो.)
२. ‘ब्रह्मोत्सवा’च्या द्वितीय विशेषांकासाठी विज्ञापने मिळवण्याच्या अंतिम क्षणापर्यंत पुरेशी विज्ञापने न मिळाल्याने प्रार्थना करणे
‘ब्रह्मोत्सवा’च्या द्वितीय विशेषांकासाठी विज्ञापने मिळवण्याच्या अंतिम क्षणापर्यंत पुरेशी विज्ञापने मिळाली नव्हती. तेव्हा मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना केली, ‘ब्रह्मोत्सवा’च्या द्वितीय विशेषांकासाठी आपला संकल्प झाला आहे आणि तो आपणच पूर्ण करून घेणार आहात. यासाठी आपणच आम्हाला साहाय्य करावे आणि हा अंक पूर्ण करून घ्यावा अन् ही सेवा आपल्या चरणी अर्पण करून घ्यावी.’
३. समष्टी प्रयत्नांमुळे विशेषांकाला लागणारी विज्ञापने मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणे
त्यानंतर मी नवी मुंबईतील विज्ञापने मिळवणार्या काही साधिकांना संपर्क केला. त्यांना मी ‘त्या कुणाकडे जाऊ शकतात’, हे सांगितले. त्यांच्या समवेत मी माझेही प्रयत्न चालू ठेवले. सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे एकाच दिवशी आम्हाला १८ विज्ञापने मिळाली आणि विशेषांकाला लागणारी विज्ञापने मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्या वेळी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
४. ब्रह्मोत्सवानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित होणार्या सर्वच विशेषांकांसाठी समष्टी प्रयत्न होणे
ब्रह्मोत्सवानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित होणार्या सर्वच विशेषांकांसाठी आम्ही वरीलप्रमाणे प्रयत्न केले. त्यामुळे आम्हाला सर्व विशेषांकांसाठी चांगली विज्ञापने मिळाली. समाजातून विशेषांकांना चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व साधकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्याने सर्वांची समष्टी साधना झाली.
५. कृतज्ञता
विज्ञापने मिळवण्याच्या या सेवेनिमित्त गुरुदेवांनी मला ‘प्रार्थना, शरणागती आणि समष्टी साधनेचे महत्त्व’ पुन्हा एकदा लक्षात आणून दिले. यासाठी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |