कर्णावती (गुजरात) येथील श्री काळभैरव मंदिरात तोडफोड !

कर्णावती (गुजरात) – येथील दुधेश्‍वर स्मशानघाटाजवळील श्री काळभैरव मंदिरात अनेक देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी साबरमती पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’तील चित्रीकरणारच्या आधारे अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. (हिंदूबहुल भागात हिंदूंच्या मंदिराची तोडफोड होणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक) या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

तोडफोडीच्या या घटनेत काळभैरवाच्या मूर्तीचा डोळा काढण्यात आला, श्री हनुमानाची गदा तोडण्यात आली, तर भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली.

मूर्तींची तोडफोड करतांना अज्ञात व्यक्तींनी अंगावरील कपडे काढून नृत्यही केल्याचे चित्रीकरणात दिसून आले. मंदिराच्या घुमटावरही ते चढले. तसेच त्यांनी बाबा काळभैरवाच्या वाहन असलेली मूर्ती उचलून फेकून दिली. (हिंदु धर्म आणि हिंदूंच्या देवता यांवरील आक्रमण रोखण्यासाठी हिंदू संघटित कधी होतील ? – संपादक)

संपादकीय भूमिका

भारत हा हिंदूबहुल देश असूनही येथे हिंदूंची मंदिरे असुरक्षित का ?