मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही वैज्ञानिक सर्वेक्षण करा !

  • ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण न्यासा’कडून सर्वोच्च न्यायालयात याचिका !

  • हिंदूंचे मंदिर पाडून शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली ! – याचिकाकर्ता न्यास

मथुरेतील ईदगाह मशीद आणि श्रीकृष्ण मंदिर

मथुरा (उत्तरप्रदेश) – सध्या वाराणसीतील ज्ञानवापीच्या परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण चालू आहे. अशातच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही अशा प्रकारे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण न्यासा’कडून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकेद्वारे न्यासाचे म्हणणे आहे की, कथित शाही ईदगाह मशिदीवर हिंदूंचा अधिकार आहे. हिंदूंची मंदिरे पाडून ही मशीद उभारण्यात आली.

‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण न्यासा’चे अध्यक्ष आशुतोष पांडेय यांनी आरोप केला की, शाही ईदगाह व्यवस्थापन समितीसारख्या संस्था या संपत्तीला हानी पोचवत आहेत. शाही ईदगाह मशिदीला ‘मशीद’ मानले जाऊ शकत नाही. या परिसराचे सर्वेक्षण झाल्यावर हे नेमकेपणाने सांगता येईल की, कुणाचा दावा शंभर टक्के योग्य आहे. या प्रकारच्या सर्वेक्षणामुळे वादग्रस्त भूमीचा इतिहास समजण्यात आणि धार्मिकदृष्ट्या त्याचे महत्त्व लक्षात येण्यास साहाय्य होऊ शकेल. आशुतोष पांडेय हे ‘सिद्ध पीठ माता शाकुंभरी पीठाधीश्‍वर भृगुवंशी’ या संस्थेचेही अध्यक्ष आहेत.

सध्या मथुरेत श्रीकृष्णाचे मंदिर आणि ईदगाह मशीद शेजारी-शेजारी असून उपासनेसाठी दोन्ही खुले आहेत; परंतु ईदगाह मशीद ही श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. त्यानुषंगानेच ही याचिका हिंदु पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या ऐतिहासिक मंदिरांवर अधिकार मिळवण्यासाठी हिंदूंना शतकानुशतके लढावे लागत आहे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! भविष्यात लोकशाही मार्गाने ही सर्व मंदिरे मिळवल्यानंतरही त्यांच्या रक्षणार्थ हिंदूंकडे काही दूरगामी योजना आहे का ? सरकारवर अवलंबून न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यास हिंदूंनी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे !