बाणस्तारी (गोवा) येथील भीषण अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक साहाय्य

पणजी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – बाणस्तारी येथील अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्यशासनाकडून आर्थिक साहाय्य दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १२ ऑगस्टला दिली आहे. रविवार, ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अपघातामध्ये मर्सिडीज या चारचाकी गाडीच्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने धडक दिल्याने दिवाडी येथील सुरेश फडते आणि त्यांची पत्नी भावना फडते अन् बंगालमधील एक २६ वर्षीय युवक अनुप कर्माकर हे मृत झाले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवार, ११ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी बाणस्तारी येथील अपघातामध्ये घायाळ झालेल्या लोकांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन चौकशी केली आणि घायाळ झालेल्यांची प्रकृती आता बरी असल्याचे सांगितले. यांपैकी एका व्यक्तीला २-३ दिवसांनी घरी पाठवण्यात येईल, तर इतर २ व्यक्तींना ८ दिवसांनी घरी पाठवण्यात येईल. या अपघातात घायाळ झालेले ६६ वर्षीय शंकर हळर्णकर यांच्या पाठीच्या कण्याला मार लागला असून त्यांना दोन्ही हात आणि १ पाय हालवता येत नाही. वनिता भंडारी या २१ वर्षीय तरुणीला शरिरात अनेक ठिकाणी अस्थिभंग झाला आहे, तर राज माजगांवकर यांना कपाळाला व्रण झाला असून त्यांच्या चेहर्‍यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांकडून राज्यभरात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ तपासणी मोहीम

गोवा पोलीस

पणजी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – बाणस्तारी अपघातानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून पोलिसांनी राज्यभरात मद्यप्राशन करून गाडी चालवणार्‍यांची तपासणी चालू केली आहे. पोलिसांनी यासंबंधी केलेल्या कारवाईमध्ये कळंगुट, म्हापसा, हणजूण परिसरात मिळून एकूण १५ चालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वाहतूक निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उपअधीक्षक सिद्धार्थ शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली ११ ऑगस्टच्या रात्री ही मोहीम हाती घेण्यात आली. मोटर वाहन कायद्याच्या कलम ९८५ अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे, तसेच ‘सीट बेल्ट’चा वापर न करणे, काळे आरसे लावणे, विना शिरस्त्राण दुचाकी चालवणे वगैरे इतर नियमांचे उल्लंघन करणार्‍या १९६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. मद्यपींच्या विरोधात पोलिसांनी ही मोहीम चालू केली असतांना पोलीस खात्याकडे असलेले ‘अल्कोमीटर’ नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधी काही चित्रफिती सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका पोलिसांकडून अशा मोहिमा सातत्याने का राबवल्या जात नाहीत ? त्यासाठी भीषण अपघाताची वाट कशाला पाहिली जाते ? ही असंवेदनशीलता आहे.