…तर हे शिक्षक नव्‍हेत !

पुणे येथील सिम्‍बॉयसिस महाविद्यालयात अशोक ढोले नावाचे एक प्राध्‍यापक आहेत. ते विद्यार्थ्‍यांना ‘हिंदूंच्‍या देवीदेवतांपेक्षा विश्‍वसनीय असलेला देव, म्‍हणजे ख्रिस्‍ती आणि मुसलमान यांचा आहे’, असे वर्गात शिकवत असलेला व्‍हिडिओ सध्‍या सामाजिक माध्‍यमांमध्‍ये प्रसारित होत आहे. याविषयी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी महाविद्यालयाच्‍या बाहेर आंदोलन केल्‍यानंतर त्‍या प्राध्‍यपकांना तूर्तास निलंबित करण्‍यात आले आहे.

१. महाविद्यालयाने हिंदु आणि अन्‍य धर्मीय यांच्‍या तुलनेचा अभ्‍यासक्रम स्‍वीकारला आहे का ?

अशोक ढोले

हे प्राध्‍यापक विद्यार्थ्‍यांच्‍या मनात हिंदूंच्‍या देवीदेवतांविषयी अपसमज पसरवण्‍याचा उद्योग हेतूत: करत आहेत, असे वाटते. सदर महाविद्यालयात ‘कोणता धर्म श्रेष्‍ठ आणि कोणता कनिष्‍ठ अथवा हिंदूंच्‍या देवीदेवता आणि ख्रिस्‍ती अन् मुसलमान यांचा देव असा तुलनात्‍मक अभ्‍यासक्रम अधिकृतपणे शिकवावा’, असा अभ्‍यासक्रम आखण्‍यात आला आहे का ?, याची प्रथम चौकशी करणे नितांत आवश्‍यक आहे. असा अभ्‍यासक्रम नसेल, तर संबंधित महाविद्यालयाने अभ्‍यासक्रमाबाहेरील विषय शिकवणार्‍या प्राध्‍यापकाच्‍या विरोधात योग्‍य ती कारवाई करावी. जर असा अभ्‍यासक्रम सदर महाविद्यालयाने स्‍वीकारला असेल, तर राज्‍यघटनेच्‍या कोणत्‍या कलमाद्वारे अशा प्रकारचा अभ्‍यास करून अधिकृतपणे शिकवता येतो, याविषयी खुलासा करावा.

२. अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली धर्माच्‍या विरोधात बोलणे, हे त्‍याची अपकीर्ती करण्‍यासारखेच !

श्री. दुर्गेश परुळकर

‘कोणत्‍याही धर्माच्‍या विरोधात मन मानेल, तसा विचार प्रसृत करणे’, हे अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य असू शकत नाही. असा तुलनात्‍मक विचार सांगून २ धर्मांच्‍या अनुयायांमध्‍ये वादंग निर्माण करणे आणि देशातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडवण्‍याचा प्रयत्न करणे, हा अपराध आहे. ‘तसा अपराध संबंधित प्राध्‍यापकाकडून घडला आहे’, असे म्‍हणण्‍यास पुरेसा वाव आहे. कोणताही अभ्‍यासक्रम हा दोन समाज आणि धर्मीय यांमध्‍ये वादंग निर्माण करणारा अभ्‍यासक्रम असू शकत नाही.

दुसरा महत्त्वाचा भाग असा की, हिंदु धर्माची महानता लक्षात घेतली जात नाही. हिंदु धर्माविषयी कोणत्‍याही प्रकारचे ज्ञान नसतांना त्‍याविषयी केलेली उलट सुलट विधाने, म्‍हणजे त्‍या धर्माची केलेली अपकीर्ती होय. याचा अधिकार व्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या अंतर्गत कुणालाही बहाल करण्‍यात आलेला नाही.

हिंदु धर्मामध्‍ये अनेक देवीदेवतांची पूजा करण्‍याची असलेली प्रथा ही त्‍याज्‍य (त्‍यागण्‍यास योग्‍य), गावंढळ ठरवणे अथवा त्‍याचा उपहास करणे हे समंजसपणाचे लक्षण नाही. कोणत्‍याही प्राण्‍याला एकच अवयव नाही. अनेक अवयवांनी प्राण्‍याचे शरीर बनले आहे. तसेच आजही पाठशाळांमध्‍ये केवळ एकच विषय शिकवला जात नाही. अनेक विषय शिकवण्‍यामागचा हेतू ‘ज्ञानाचे क्षेत्र विस्‍तारलेले आहे’, हे सांगण्‍याचा आहे. त्‍याचप्रमाणे अनेक देवीदेवतांची उपासना करणे, म्‍हणजे निसर्गामध्‍ये असलेल्‍या विविध शक्‍तींचा अभ्‍यास करणे होय. ‘या सर्व शक्‍तींचा स्रोत माणसाला ज्ञात असला पाहिजे’, या भावनेने विविध प्रकारच्‍या देवीदेवतांची आराधना करण्‍याचे संस्‍कार हिंदु धर्म करत आहे. परिणामी हिंदु धर्माची शिकवण ही सर्वसमावेशक आहे. ‘केवळ एकच गोष्‍ट स्‍वीकारावी आणि अन्‍य गोष्‍टींना नाकारावे’, अशी शिकवण हिंदु धर्म देत नाही. तसेच निसर्गात असलेल्‍या विविध शक्‍तींविषयी कृतज्ञतेचा भाव मानवाच्‍या मनात निर्माण करण्‍याची निकड हिंदु संस्‍कृतीला वाटते. आपल्‍याला उपकारक असलेल्‍या गोष्‍टींविषयी कृतज्ञताभाव जागवण्‍यासाठी विविध प्रकारच्‍या देवीदेवतांची उपासना करण्‍याची शिकवण हिंदु धर्माने दिली आहे.

‘चराचर सृष्‍टीत ईश्‍वराचे अस्‍तित्‍व आहे’, हा भाव मनामध्‍ये जागवण्‍याचा प्रयत्न हिंदु धर्म करतो. त्‍याकडे पाठ फिरवून या महान शिकवणीचा उपहास करणे, हे प्रगल्‍भ बुद्धीचे लक्षण नाही.

हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी महाविद्यालयाच्‍या बाहेर आंदोलन केले

३. मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांचे खरे स्‍वरूप उघड करण्‍याचे धाडस प्राध्‍यापकांमध्‍ये आहे का ?

इतिहासात डोकावल्‍यावर असे लक्षात येते की, ‘मुसलमान अथवा ख्रिस्‍ती यांच्‍यामध्‍ये असलेला ‘केवळ आमचाच देव श्रेष्‍ठ आहे आणि आम्‍ही अन्‍य कोणत्‍याही देवासमोर नतमस्‍तक होण्‍यास सिद्ध नाही’, हा विचार, ही शिकवण समाजात तेढ निर्माण करते. याचा अनुभव आपण सध्‍या घेत आहोत. ‘हिंदूंच्‍या देवीदेवतांची मिरवणूक आमच्‍या मशिदीसमोरून जाता कामा नये’; कारण आम्‍ही अल्ला वाचून अन्‍य कोणताही देव मानत नाही’, अशी अरेरावीची भाषा बोलली जाते. हिंदूंच्‍या सणांच्‍या दिवशी निघणार्‍या मिरवणुकांवर धर्मांध समाज दगडफेक करतो. अशी कृती समाजात शांतता अन् सुव्‍यवस्‍था निर्माण करते का ?

अनेक देवीदेवतांची उपासना करणारे हिंदु अल्ला आणि येशू ख्रिस्‍त यांचा द्वेष करतांना आढळतात का ? ‘दुसर्‍यांच्‍या श्रद्धास्‍थानांचा आदर करणे, हा संस्‍कार ख्रिस्‍ती आणि मुसलमान समाजाला दिला जातो’, असे आपण म्‍हणू शकतो का ? या प्रश्‍नांची उत्तरे विद्यार्थ्‍यांना सांगण्‍याचे धाडस हे प्राध्‍यापक करणार आहेत का ?

४. कायदेतज्ञ हिंदूंच्‍या मनातील शंका दूर करतील का ?

हिंदु धर्माला नष्‍ट करण्‍यासाठी हिंदु धर्मातील नव्‍या पिढीची दिशाभूल करून या पिढीला हिंदु धर्मातून फुटून बाहेर पडण्‍यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा प्रयत्न प्राध्‍यापक करत आहेत का ? प्राध्‍यापकांच्‍या अशा प्रकारच्‍या वर्तनामागचे नेमके कारण काय ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे प्राध्‍यापकांकडून अपेक्षित आहेत. तसेच हिंदु धर्माच्‍या विरोधात केले जाणारे वक्‍तव्‍य, हिंदूंच्‍या श्रद्धास्‍थानांवर होणारा आघात आणि हिंदूंच्‍या सण-उत्‍सवांच्‍या मिरवणुकीवर होणारी दगडफेक या सर्व घटना सहिष्‍णुता या वर्गात मोडतात का ?

‘सहिष्‍णुता केवळ हिंदूंनी पाळावी आणि इतरांनी असहिष्‍णुतेने हिंदूंशी वागावे’, असा भारतीय दंडविधानात एखादा निर्बंध आहे का ? राज्‍यघटनेतील कोणते कलम हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखवा आणि हिंदूंशी असहिष्‍णुतेने वागा, असे सांगते ? हिंदूंनी त्‍यांच्‍या मिरवणुका मशिदीसमारून नेऊ नयेत, असा निर्बंध आहे का ? या आणि अशा प्रश्‍नांची उत्तरे हिंदूंना अपेक्षित आहेत. अशा प्रश्‍नांची उत्तरे देऊन हिंदूंच्‍या मनातील शंका दूर करण्‍यासाठी कायदेतज्ञ, घटनातज्ञ, न्‍यायालयाचे न्‍यायाधीश यांनी नि:पक्षपातीपणाने प्रयत्न करावा, अशी माफक अपेक्षा आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (५.८.२०२३)