सिंधुदुर्ग – नैराश्यामुळे आत्महत्या होत असल्या, तरी अशा घटनांमध्ये आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा प्रकार घडत असेल, तर ही प्रवृत्ती थांबण्यासाठी पोलीस निश्चितच कारवाई करतील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आत्महत्येच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांशी जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी संवाद साधला. या वेळी अधीक्षक अग्रवाल म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील काही घटनांची मी स्वतः चौकशी करणार आहे. काही युवतींनी केलेली आत्महत्या आणि त्यामागचे कारण शोधले गेले, तर आत्महत्येस प्रवृत्त करणार्या प्रवृत्तीही थांबवता येतील. त्यासाठी जिल्ह्यात झालेल्या आत्महत्यांच्या घटनांचा अभ्यास पोलीस करतील. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आत्महत्येच्या घटनांचा आढावा घेत आहोत.’’
चोरीच्या घटना थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत !
जिल्ह्यात घरे आणि मंदिरे येथे चोरीच्या घटना घडत असून यावर उपाययोजना काढण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. जिल्ह्यातील सी.सी.टी.व्ही. फूटेज, तसेच चोरीच्या ठिकाणी मिळालेले हातांचे ठसे (फिंगरप्रिंट्स) यांच्या माध्यमातूनही पोलीस दलाची ‘सायबर शाखा’ अन्वेषण करत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतंकवादी कारवाया होऊ नयेत; म्हणून पोलीस सतर्क !
आंबोली येथील जंगलात आतंकवाद्यांनी केलेल्या स्फोटांविषयी पत्रकारांनी विचारले असता पोलीस अधीक्षक अग्रवाल म्हणाले, ‘‘या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ पातळीवरून आणि अन्य यंत्रणांकडून चालू आहे; मात्र त्याविषयी आम्हाला कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून संपर्क साधला गेला नाही. जिल्ह्यात अशा कारवाया होऊ नयेत, यासाठी जिल्हा पोलीस दलाने दक्षता घेतली आहे. तशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.’’
संपादकीय भूमिकानिराशा, आत्महत्येचे विचार येणे आदी समस्यांपासून सुटका होण्यासाठी समाजाने साधना करणे आवश्यक आहे ! |