१. शरिराभोवती आलेले आवरण काढण्याविषयीची सूत्रे
अ. ‘एका हाताचा तळवा समोरील दिशेने आणि दुसर्या हाताचा तळवा स्वतःच्या दिशेने’, अशी मुद्रा करून मूलाधारचक्रापासून ते सहस्रारापर्यंत खालून वर आणि वरून खाली आवरण काढावेे. आवरण काढतांना ज्या ठिकाणी त्रास जाणवतो, त्या ठिकाणी हाताची मुद्रा अधिक वेळ धरून ठेवावी. या मुद्रेमुळे आवरण लवकर न्यून होते.
आ. दोन्ही हातांची मधली बोटे एकमेकाला जोडून मनोरा मुद्रा (‘टॉवर’मुद्रा करून) करून मूलाधारचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत खालून वर आणि वरून खाली आवरण काढावेे.
इ. त्यानंतर आवरण राहिले असल्यास हाताने काढावे. हाताने आवरण काढतांना देहाच्या आतील आणि देहाच्या सभोवतालचे आवरण मुठीत पकडून काढून टाकावे.
२. डोळ्यांवरील आवरण काढण्याविषयी
२ अ. डोळ्यांभोवती असलेले आवरण काढण्याच्या पद्धती ! : डोळ्यांच्या कडेची बाजू हे वाईट शक्तींचे शरिरात येण्याचे स्थान आहे. त्यामुळे तेथे उपाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी हाताची ५ ही बोटे एकत्र करून दोन्ही डोळ्यांवरून फिरवावी. नंतर नामजप शोधतांना प्रथम शून्य, महाशून्य, निर्गुण, ॐ यांपैकी जो नामजप येईल, तो करतांना हाताचा तळवा डोळ्यांवर ठेवावा. यांपैकी कुठलाही नामजप न आल्यास अग्नि, वायु आणि आकाश यांपैकी जो नामजप येईल, तशी मुद्रा डोळ्यांच्या टोकाला करावी. अग्निदेवतेचा नामजप आला, तर मध्यमा आणि अंगठ्याचे टोक जुळवून येणारी मुद्रा करावी. वायुदेवतेचा नामजप आला, तर तर्जनी आणि अंगठ्याचे टोक जुळवून येणारी मुद्रा करावी. आकाशदेवतेचा नामजप आल्यास, तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावून येणारी मुद्रा करावी.
‘डोळ्यांवर मुद्रा करून हात फिरवतांना डोळे जड वाटत असतील, तर ‘डोळ्यांवर अजून आवरण आहे’, असे समजावे आणि पुन्हा एकदा आवरण काढावे. ‘डोळ्यांना हलकेपणा वाटत असेल, तर आवरण न्यून झाले आहे’, असे समजावे. डोळ्यांवरील आवरण काढून उपाय करतांना अल्प वेळेत आवरण निघते. डोळ्यांवरील आवरण निघाल्यावर शरीर पूर्ण हलके होते आणि थंड वाटते.
३. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने झालेले लाभ
अ. आरंभी आवरण असल्यामुळे मला आनंद जाणवत नव्हता; परंतु सद़्गुरु गाडगीळकाकांंनी वरील प्रमाणे उपाय करून घेतल्यानंतर अल्पावधीत आवरण निघून शरीर हलके झाले.
आ. मला आनंद वाटू लागला आणि माझे मनही उत्साही झाले.
इ. माझ्या मनाचा उत्साह वाढल्यामुळे दिवसभर सेवाही चांगल्या झाल्या.
ई. आवरण काढल्यामुळे साधनेचे प्रयत्न करायला दिशा मिळाली आणि त्यानंतर माझी सेवाही चांगली झाली.
साधकांना स्वतःवरील वाईट शक्तींचे आवरण काढण्यास शिकवल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद़्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०२२)
|