केंद्र सरकारच्‍या ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेअंतर्गत पुणे येथील आकुर्डी रेल्‍वेस्‍थानकाचा विकास !

पिंपरी (पुणे) – भारतीय स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेच्‍या अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्‍वेस्‍थानकांचा पुनर्विकास करण्‍याचे घोषित केले आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्रातील ४४ रेल्‍वेस्‍थानकांसह आकुर्डी रेल्‍वेस्‍थानकाचा पुनर्विकास करण्‍यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्‍हा भाजपचे शहराध्‍यक्ष शंकर जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी शंकर जगताप यांनी सांगितले की, आझादी का अमृत महोत्‍सव देशभर साजरा केला जात असून देशाला विकासाची नवी दिशा देण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला. आमदार उमा खापरे म्‍हणाल्‍या, ‘‘या योजनेद्वारे आकुर्डी रेल्‍वेस्‍थानकाचा विकास होईल. विकासकामांसाठी सुमारे ३३.८३ कोटी रुपयांचा निधी केंद्राने मंजूर केला आहे. आकुर्डी रेल्‍वेस्‍थानकात प्रवेशांसाठी दोन प्रवेशद्वार, दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी प्रशस्‍त वाहनतळ, प्रवासी नागरिकांसाठी प्रतिक्षा कक्ष, अतिमहत्त्वाच्‍या व्‍यक्‍तींसाठी कक्ष बांधणी, फलाटावर जाण्‍या-येण्‍यासाठी सरकते जिने, प्रसाधनगृहे, पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था, रेल्‍वेस्‍थानकाच्‍या परिसराचे सुशोभीकरण आदी विकासकामे करण्‍यात येणार आहेत, असे खाडे यांनी सांगितले.