अहिल्यानगर जिल्ह्यातील गंगाधर गायकवाड यांनी त्यांच्या मुलीचा विवाह स्मशानभूमीत केला. गंगाधर गायकवाड हे गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमीत काम करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्यांची मुलगी मयुरी हिचे लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या माध्यमातून ‘स्मशान अशुभ नसते’, हा संदेश त्यांना द्यायचा होता.
माणूस मृत झाल्यावर त्याला स्मशानभूमीत नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करतात. अंत्यसंस्कार हा माणसाच्या आयुष्यातील शेवटचा विधी असतो. चांगली साधना करणारे किंवा संत यांच्या मृत्यूनंतर तिथे चांगल्या शक्ती येत असल्याने वातावरणात दाब जाणवत नाही; समाजातील सर्वसामान्य व्यक्तींची तेवढी साधना असतेच, असे नाही. सर्वसामान्य व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्या काही ना काही इच्छा, वासना या बाकी असतात. ‘कित्येकदा व्यक्तीचा लिंगदेह हा भूलोकात अडकतो. त्यामुळे त्या लिंगदेहाला घेण्यासाठी अन्य अनिष्ट शक्ती आलेल्या असतात’, असे धर्मशास्त्र सांगते. काहींचा अपघाताने अपमृत्यू झालेला असतो, तर काही जणांची हत्या झालेली असते. अशा अनेक कारणांमुळे स्मशानभूमीतील वातावरण रज-तमयुक्त झालेले असते. अशा वातावरणात विवाहासारखा मंगल विधी करणे योग्य कसे असू शकते ? मनुष्याच्या आयुष्यातील शेवटचा विधी जेथे होतो, तेथे वैवाहिक जीवनाचा प्रारंभ मंगलमय कसा असेल ?
सध्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे स्मशानात वाढदिवस साजरा करणे, लग्न करणे अशा चुकीच्या प्रथा पडत आहेत. विवाहनिमित्त आलेल्या व्यक्तींना येथील रज-तमाच्या वातावरणाचा त्रास होऊ शकतो. पुढारलेपणाच्या नावाखाली हिंदु संस्कृतीची खिल्ली उडवण्याचाच हा विकृत प्रकार आहे. स्मशानभूमीत विवाह करणे, म्हणजे या पवित्र विधीचा अवमान करण्यासारखे नव्हे का ? विवाह हा अत्यंत मंगलमय विधी आहे. विवाह विधीत वधू-वरांना ‘लक्ष्मी-नारायण’ समजले जाते. भावपूर्ण केलेल्या वैदिक विवाहाच्या विधींच्या ठिकाणी ईश्वरी चैतन्यही जाणवते. भारतीय संस्कृती आणि चालीरीती यांनी प्रभावित होऊन कित्येक विदेशी जोडपी भारतात येऊन विवाह करतात. आज विदेशातील लोक भारताकडे अध्यात्मामुळे आकृष्ट होऊन हिंदु संस्कृतीनुसार आचरण करू लागले आहेत; पण देशातील हिंंदूंनाच महान हिंदु धर्म कळत नाही, हे दुर्दैव आहे. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात अशा कुप्रथा नसतील !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे