आज ७ ऑगस्ट २०२३ या दिवशी (कै.) वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
७.८.२०२३ या दिवशी उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील (कै.) वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सौ. संगीता अजय पाटील, कोल्हापूर
१ अ. व्यवस्थितपणा : ‘एकदा सुजाताताई नोकरीनिमित्त बाहेरगावी जाणार होत्या. तेव्हा त्या करत असलेली विज्ञापनांची सेवा त्यांनी मला हस्तांतरित केली. सेवेच्या संदर्भातील सर्व नोंदवह्या व्यवस्थित असल्यामुळे मला पुढील सेेवेत कोणतीही अडचण आली नाही. मी या सेवेत नवीन असूनही त्यांनी सर्व नोंदी व्यवस्थित ठेवल्यामुळे मला ही सेवा लवकर शिकता आली.
१ आ. उत्तम नियोजनकौशल्य : कोणताही सत्संग, अभ्यासवर्ग किंवा शिबिर असो, त्यांनी अगदी योग्य पद्धतीने लेखी नियोजन केलेले असायचे. ‘सत्संगात कोणती सूत्रेे घ्यायची ? प्रत्येेक सूत्रासाठी किती वेळ द्यायचा ?’, हे सर्व ठरलेले असायचे.
१ इ. इतरांचा विचार करणे : ‘साधक सेवेसाठी पुष्कळ दुरून येतात. त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये आणि सर्वांची नीट व्यवस्था व्हावी’, असा त्यांचा भाव असायचा. त्यामुळे त्या सर्वांची मनापासून काळजी घेत असत.
१ ई. त्यांचे वक्तृत्व चांगले होते. त्यामुळे त्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि गुरुपौर्णिमा महोत्सव या वेळी सूत्रसंचालनाची सेवा करत असत.
१ उ. कोल्हापूरमधील कोडोली येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असतांना त्यांना ‘आदर्श शिक्षिका’ हा पुरस्कार मिळाला होता.
१ ऊ. मी त्यांना रुग्णालयात भेटायला गेले होते. तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या, तरीही ‘त्या गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवत होते.’
२. सौ. अनिता अरुण करमळकर आणि सौ. संगीता अजय पाटील, कोल्हापूर
२ अ. साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सेवा शिकवणे : ‘आम्ही सुजाताताईंच्या समवेत काही वर्षे विज्ञापनांची सेवा करत होतो. तेव्हा त्या आम्हाला नेहमी ‘सेवेमध्ये काही अडचण नाही ना ?’, असे विचारत असत. आम्ही विज्ञापनांची सेवा शिकत असतांना सेवेतील बारकावे आमच्या लक्षात आले नाहीत, तर ताई शांतपणे कोणतीही प्रतिक्रिया न देता पुनःपुन्हा ती सेवा आम्हाला समजावून सांगत असत.
२ आ. इतरांचा विचार करणे : आम्ही त्यांना भेटायला गेलो असता त्या आम्हाला ‘जेवूनच जा’, असे म्हणत होत्या. त्यांची बहीण सौ. सुषमा घाडगे आमच्या समवेत कोल्हापूरला परत येणार होती. ‘तिने सर्व साहित्य आणि खाऊ समवेत घेतला आहे ना ?’, याविषयी त्या विचारत होत्या. आजारी असतांनाही त्या सतत इतरांचा विचार करत होत्या. तेव्हा ‘प.पू. गुरुदेवांनी घडवलेले साधकच स्वतःला इतका त्रास होत असतांना आनंदी राहून इतरांचा विचार करू शकतात’, याची आम्हाला जाणीव झाली.
२ इ. चुकांविषयीची संवदेनशीलता
१. सुजाताताई विज्ञापनांचे मुद्रितशोधन करत असतांना त्यांच्याकडून शक्यतो कधी चूक होत नसे. एकदा त्यांच्याकडून एक चूक झाली. त्या वेळी त्यांना त्याबद्दल पुष्कळ खंत वाटली. सेवा अचूक होण्यासाठी त्या नेहमी प्रयत्न करायच्या. चूक झाल्यास त्या लगेच प्रायश्चित्त घ्यायच्या.
२. त्या आजारी असतांना आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी त्यांनी सर्वांत प्रथम विज्ञापनांची सेवा करत असतांना त्यांच्याकडून झालेल्या चुकांबद्दल आमची क्षमा मागितली. त्यांना स्वतःकडून झालेल्या चुकांबद्दल पुष्कळ खंत वाटत होती.’
३. आधुनिक वैद्य अरुण करमळकर, कोल्हापूर
३ अ. प्रेमभाव : ‘स्मरणिकेची सेवा पूर्ण झाल्यानंतर ताई त्या सेवेत असणार्या आम्हा सर्व साधकांसाठी गोड खाऊ घेऊन यायच्या.
३ आ. सेवा करत असतांना कितीही घाई असली, तरीही ताई प्रत्येक कार्यपद्धतीचे पालन करत असत.
३ इ. मी विज्ञापनांची संगणकीय सेवा करत होतो. त्या वेळी त्यांनी मला मुद्रितशोधनाची सेवाही शिकवली.
४. अनुभूती
‘वरील सूत्रांचे टंकलेखन करतांना मला पुष्कळ हलकेपणा आणि उत्साह जाणवत होता. ‘अल्प वेळामध्ये सर्व टंकलेखन झाले’, असे मला वाटले.’
– सौ. अनिता अरुण करमळकर
५. श्री. अक्षय पाटील आणि सौ. अनन्या अक्षय पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ अ. प्रेमभाव : ‘एकदा आम्ही दोघे कोल्हापूरला गेलो असतांना मार्गातच आमची सुजाताताईंशी भेट झाली. ताईंशी पूर्वीची ओळख असल्यामुळे त्यांना भेटून आम्हाला पुष्कळ आनंद झाला होता. त्यांनी आमची प्रेमाने आणि आपुलकीने विचारपूस केली. त्यांना आमच्या विवाहाला उपस्थित रहाता आले नव्हते. त्यामुळे त्या आम्हाला आवडीचे पदार्थ खाऊ घालण्यासाठी उपाहारगृहात घेऊन गेल्या. ‘तिथे काय खाल्ले, तर आम्हाला त्रास होणार नाही ?’,
याचा विचार करून तसे पदार्थ ताईंनी मागवले होते. आम्हाला त्यांचा अल्प सहवास लाभलेला असूनही ‘त्यांनी प्रेमभावाने सर्वांना जोडून ठेवले होते’, असे आमच्या लक्षात आले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.७.२०२३)
सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब (वय ८२ वर्षे) यांना (कै.) वैद्या (कु.) सुजाता जाधव यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे !‘२१.७.२०२३ या दिवशी वैद्या (कु.) सुजाता जाधव कोल्हापूर सेवाकेंद्रात आली होती. त्या वेळी तिच्या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत. १. वैद्या सुजाता हिच्याकडे पाहून ‘ती रुग्णाईत आहे’, असे वाटत नव्हते. कर्करोगाने ग्रस्त असूनही ती आनंदी होती. २. तिच्या तोंडवळ्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव जाणवत होता. ३. ‘ती सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात आहे’, असे मला जाणवले.’ – (पू.) सदाशिव (भाऊ) परब, कोल्हापूर सेवाकेंद्र (२६.७.२०२३) |
सहसाधकांच्या समवेत आपुलकीचे नाते निर्माण करणार्या (कै.) वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव !‘(कै.) वैद्या सुजाता जाधव यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली’, ही आनंदवार्ता समजल्यानंतर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी, सुजाताताई आणि सौ. जयश्री कडोलकर, आम्ही तिघींनी ५ वर्षे विज्ञापनांची सेवा एकत्रित केली. त्या वेळी मला जाणवलेली सुजाताताईंची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. १. प्रेमळसुजाताताई ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, अशी कृती आपल्याकडून होणार नाही’, याची काळजी घेत. मितभाषी आणि प्रेमळ स्वभाव असल्यामुळे त्यांचे जसे साधकांशी आपुलकीचे नाते होते, तसेच कोडोली (जिल्हा कोल्हापूर) येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सहकारी, विद्यार्थी अन् रुग्ण यांच्याशी आपुलकीचे नाते होते. २. सहसाधिकांशी सहकार्याचे आणि आपुलकीचे मैत्रीपूर्ण नाते असणेआम्ही दोघी वयाने सुजाताताईंपेक्षा मोठ्या असूनही सेवा करत असतांना ‘आम्ही तिघी समवयस्क आहोत’, असे आम्हाला वाटायचे. आमची सेवा अतिशय आनंदात चालू असायची. ‘ती आमची जिवाभावाची मैत्रीणच आहे’, असे आम्हाला वाटायचे. देवाच्याच कृपेने आमच्यात सहकार्याचे आणि आपुलकीचे मैत्रीपूर्ण नाते निर्माण झाले होते. ताईंमुळे मला विज्ञापनांची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाली. ३. व्यष्टी साधना तळमळीने करणेनोकरी आणि विज्ञापन सेवेचे दायित्व असतांनाही ताई व्यष्टी साधना पूर्ण करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत असत. त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधनेची तळमळ पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटायची. ४. सेवेची तळमळविज्ञापनांची सेवा समयमर्यादेत आणि परिपूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. ताई सेवा वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्री जागरण करत असत आणि सकाळी नोकरीवर जात असत.’ – सौ. विद्या कदम, कोल्हापूर (२८.७.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |