मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : आतंकवाद्यांकडून तिघांची हत्या

इंफाळ – मणीपूरमधील विष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता येथे ५ ऑगस्टला रात्री झालेल्या हिंसाचारात आतंकवाद्यांनी वडील, मुलगा आणि अन्य एक जण, अशा तिघा जणांची हत्या केली. हे तिघे झोपेत असतांना आतंकवाद्यांनी या तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे तिघे तात्पुरत्या छावण्यांमध्ये रहात होते; मात्र हिंसाचाराच्या स्थितीत सुधारणा झाल्यामुळे ते ४ ऑगस्ट या दिवशी क्वाक्ता येथील त्यांच्या घरी परतले होते.’’

सुरक्षादले आणि आतंकवादी यांच्यात चकमक !

पोलिसांनी सांगितले की, क्वाक्ता येथे शनिवारी सकाळी सुरक्षा दले आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या जोरदार गोळीबारात ३ जण घायाळ झाले. घायाळ झालेल्या तिघांना उपचारांसाठी इंफाळमधील रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.’ हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने इंफाळ पूर्व आणि पश्‍चिम जिल्ह्यांमधील संचारबंदी थोडी कडक केली आहे.