पिंपरी (जिल्हा पुणे) येथील कुदळवाडी बनली आहे आतंकवाद्यांचे आगार !

अन्वेषण आणि गुप्तचर यंत्रणा यांची करडी नजर !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – जर्मन बेकरी बाँबस्फोटात चिखलीतील कुदळवाडीतून एका संशयिताला पोलिसांनी कह्यात घेतल्यापासून या परिसरावर पोलिसांचे लक्ष आहे. परप्रांतीय, विशिष्ट भागातून आलेल्या स्थलांतरित लोकांची संख्या कुदळवाडीत वाढत असल्याने या भागावर स्थानिक पोलिसांसह देशभरातील अन्वेषण यंत्रणांची करडी नजर आहे. यापूर्वी शहरात ज्या कारवाया झाल्या, धरपकड झाली, त्याचा संबंध कुदळवाडीशी असल्यानेे पोलिसांना या परिसरावर विशेष लक्ष ठेवावे लागत आहे. या परिसरावर अन्वेषण यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा यांचे नेहमीच लक्ष राहिले आहे.

औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात कुदळवाडी हा भाग येतो. कुदळवाडीच्या लगत चाकण, तळेगाव दाभाडे एम्.आय.डी.सी. आहे. शहरात लहान-मोठे उद्योगधंदे आहेत. महापालिकेचा भाग असूनही शहरापासून थोडा दूर असल्यामुळे येथील घरभाडे दरही अल्प आहेत, हे येथे गुन्हेगार वास्तव्य करत असल्याचे कारण आहे. स्थानिक लोकांकडून पुरेशी चौकशी न करता घरे भाड्याने दिली जातात. या सगळ्याचा अपलाभ गुन्हेगार घेत आहेत.

आतंकवाद्यांशी संबंध !

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बाँबस्फोटातील आरोपींचे कासारवाडी रेल्वेस्थानकाजवळ वास्तव्य असल्याचे पोलीस अन्वेषणात लक्षात आले आहे. तेथेच त्यांनी बाँब बनवले होते. मुंबई आणि गुजरात येथील बाँबस्फोटातील आरोपींशी संपर्कात असल्याच्या संशयावरून काही वर्षांपूर्वी अन्वेषण यंत्रणांनी पिंपरी चौकातून एकाची चौकशी केली होती. त्याचसह अन्य काही समाजविघातक गोष्टींशी संबंध असल्याच्या संशयावरून सातत्याने पिंपरी-चिंचवडमधील दोघांची चौकशी यापूर्वी काही अन्वेषण यंत्रणांनी केली आहे.